घरसंपादकीयअग्रलेखराजकीय फायदा उठवण्याचा धंदा!

राजकीय फायदा उठवण्याचा धंदा!

Subscribe

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महापुरुषांबद्दल देशवासियांच्या मनात नेहमीच आदराचं स्थान राहिलं आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही महापुरुषांचा आदर्श शालेय जीवनापासून प्रत्येक भारतीयांच्या मनात रुजवण्याचं काम होत आहे. राजकीय पक्षही आपापल्या विचारांच्या नेत्यांचे विचार पुढे नेण्याचं काम करत आहेत. राजकारण करत असताना विरोधी विचारांच्या महापुरुषांची मानहानी, त्यांचा अवमान होईल, असं कृत्य, वक्तव्य करण्याचं काम केलं जात नव्हतं, हा इतिहास आहे. पण, गेल्या दहा वर्षात स्वातंत्र्य लढ्यातील महापुरुषांचा वापर आपल्या राजकीय महत्वाकांक्षेसाठी काही पक्षांकडून केला जात आहे. त्यामुळेच देशात, प्रामुख्याने महाराष्ट्रात वादंग निर्माण होऊ लागले आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि गांधी-नेहरू मुद्दा राजकारणात कधीच चर्चेत नव्हता. पण, केंद्रात भाजपचं सरकार आल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल, स्वातंत्र्यवीर सावरकर, गांधी-नेहरू यांच्याबद्दल सातत्याने वादग्रस्त विधाने होताना दिसत आहेत. महाराष्ट्रात महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह विधाने करून वाद उकरून काढण्याचा प्रयत्न काही राजकीय नेत्यांकडून केला जात आहे. या देशासाठी योगदान देणार्‍या कोणालाही कुठल्याही पक्षानं कधीच कमी लेखलं नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांची ‘सागरा प्राण तळमळला’ ही कविता महाराष्ट्रातील प्रत्येक शाळकरी मुलांना तोंडपाठ असायची. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी माफी मागितल्याचे, इंग्रजांशी एकनिष्ठ राहिल्याचं किंवा आपल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येत त्यांचं नाव आल्याचे कधीही इतिहासाचे दाखले देत शाळांमध्ये सांगितलं गेलं नाही. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनामध्ये सावरकरांची प्रतिमा एक थोर साहित्यिक, राष्ट्र कवी आणि स्वातंत्र्यवीर अशीच कायम रुजवली गेली होती. दुसरीकडे, गांधी-नेहरू हिंदूविरोधी आणि सावरकर हिंदुत्वावादी होते, असाही इतिहास सांगितला गेला नाही.

- Advertisement -

पण, आता चित्र बदलत चाललं आहे. अचानक देशात हिंदुत्वासोबतच काँग्रेसविरोधाची मोठी लाट उसळली आहे. त्या लाटेने गांधी-नेहरू कसे हिंदूविरोधी होते आणि सावरकर हिंदुत्ववादी आणि देशभक्त होते, हे दाखवण्याचं राजकारण सुरू झालं आहे. आपल्याच नेत्याची पाठराखण करण्याच्या नादात गांधी नेहरूंची बदनामी करायला सुरुवात केली गेली. इथूनच खर्‍या अर्थाने सावरकरांच्या ‘वीर’पणाची पडझड सुरू झाली. कारण, क्रियेला प्रतिक्रिया तर येणारच. मग उत्तरादाखल आजपर्यंत माहीत नसलेले सावरकरांचे माफीनामे, इंग्रजनिष्ठा, पेन्शन आणि इतर बाजू लोकांसमोर मांडायला सुरुवात झाली. काँग्रेसच्या 70 वर्षात सावरकरांची कधी बदनामी झाली नसेल तेवढी देशात भाजप सत्तेवर आल्यापासून सुरू झाली आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आली.

ही यात्रा महाराष्ट्रात शेवटच्या टप्यात आल्यावर अचानक राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी वक्तव्ये केली. यावेळी राहुल गांधी यांनी सावरकर माफीवीर असल्याचं इतिहासातील काही कागदपत्रांचा दाखला देऊन जाहीर करून टाकलं आणि महाराष्ट्रात रणकंदन सुरू झालं. राहुल गांधी यांनी भाजपला डिवचण्यासाठीच हा मुद्दा यात्रेच्या महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यात उकरून काढला. गुजरात विधानसभेच्या तोंडावर आयतंच कोलीत मिळाल्याने भाजपने राहुल गांधी आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला. गांधी-नेहरू यांच्यावरच भाजपचे नेते तुटून पडले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा राज्यात रोखली जाईल, असा इशाराही दिला होता. वाढता दबाव पाहता उध्दव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचं अजिबात समर्थन न करता थेट सावरकरांची बाजू घेतली. त्यावरून महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं दाखवलं गेलं.

- Advertisement -

राहुल गांधींच्या शेगाव येथील सभेकडे राष्ट्रवादी आणि उध्दव ठाकरे गटाच्या नेत्यांनी पाठ फिरवली. महाराष्ट्रातील वाढता वादंग पाहून राहुल गांधी यांनी शेगावच्या सभेत सावरकरांबद्दल बोलण्याचं टाळलं. मात्र, भाजप नेत्यांकडून उध्दव ठाकरे, राष्ट्रवादीला टार्गेट करणं सुरुच राहिलं होतं. भाजपकडून वातावरण तापवलं जात असताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून भाजपला अडचणीत आणण्याचं काम केलं आहे. राज्यपाल म्हणून भूमिका पार पाडण्याऐवजी भाजपच्या कार्यकर्त्यांची भूमिका संविधानिक पदावर बसून भगतसिंह कोश्यारी सातत्याने बजावत असल्याचा आरोप करत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उध्दव ठाकरे गटाने महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केलं आहे. त्यामुळे राहुल गांधींविरोधात सुरू असलेल्या भाजपच्या आंदोलनाची पुरती हवाच निघून गेली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने वादाच्या भोवर्‍यात सापडत आहेत. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असतानाची राज्यपालांची भूमिका नेहमीच सरकारविरोधातील होती. सत्ताबद्दल झाल्यानंतर राज्यपालांच्या भूमिकेतही अचानक बदल झाला आहे. आतातर राज्यपाल सत्ताधार्‍यांच्या इशार्‍यावरच भूमिका घेत असल्याचा संशय विरोधक व्यक्त करत आहेत. त्यातच शिवाजी महाराजांबद्दल राज्यपालांनी दुसर्‍यांदा आक्षेपार्ह विधान केलं आहे. याआधी तर क्रांतीसूर्य जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल तर राज्यपालांनी केलेलं वक्तव्य अतिशय निषेधार्ह असंच होतं.

भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर अतिशय कडक शब्दात टीका केली आहे. कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी यांच्यावर कारवाईची मागणी करत असलेल्या खासदार भोसले यांनी भाजपला निर्वाणीचा इशाराच दिला आहे. संभाजीराजे छत्रपती यांनीही कडक शब्दात निषेध व्यक्त केला आहे. राज्यपाल आणि सुधांशू त्रिवेदी वादग्रस्त वक्तव्य करत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांची पाठराखण करतात, हे कोडं आहे. फडणवीस त्यांची बाजू कशासाठी घेताहेत. पाठराखण कसली करता, त्यांना माफी मागायला लावा, अशी आक्रमक भूमिका संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली आहे. कोश्यारींना महाराष्ट्राबाहेर पाठवा यामागणीसाठी महाराष्ट्र पेटून उठला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजूनही कोश्यारी आणि त्रिवेदी यांची पाठराखण करत असल्याने हा भाजपच्या वरिष्ठांचा अजेंडा तर नाही ना, अशी शंका घेण्यास वाव आहे.

एरव्ही विरोधकांच्या प्रत्येक वाक्याचा समाचार घेणारे भाजपचे मंत्री, नेते राज्यपालांची बाजू घेऊन बोलताना दिसत आहेत. बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जात असल्याचं वारंवार सांगणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदारही राज्यपाल कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी यांच्याविरोधात बोलण्याची हिंमत दाखवू शकत नाहीत. शिंदे समर्थक एका आमदाराने तोंडदेखल्या कोश्यारी आणि त्रिवेदींच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे. त्यामुळे शिंदे समर्थक भाजपच्या विचारानेच चालत असल्याचं पुन्हा एकदा सिध्द झालं आहे. शिवाजी महाराजांना दैवत मानणार्‍या शिवसेनेच्या विचारांची प्रतारणा करत तर नाही ना याचं भान शिंदे गटाला ठेवावं लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -