JNPT School : जेएनपीटी शाळेत शिक्षणाचा बाजार ; २ हजार ७०० विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात

The future of 2,700 students is in danger in JNPT schools
JNPT School : जेएनपीटी शाळेत शिक्षणाचा बाजार ; २ हजार ७०० विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात

जेएनपीटीने खर्च कमी होण्याच्या हेतूने आधीच्या जुन्या शिक्षण संस्थेकडून २ वर्षांपूर्वी नव्याने १५ वर्षांच्या करारावर आर. के. फाऊंडेशनला शाळा चालविण्यासाठी दिली आहे. मात्र या फाऊंडेशनच्या व्यवस्थापनातील अनागोंदी कारभारामुळे शाळेतील तब्बल २ हजार ७०० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येण्याची वेळ येऊन ठेपली आहे. यामुळे पालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.जेएनपीटीच्या कामगार वसाहतीमध्ये केजी ते १० वीपर्यंत इंग्रजी आणि मराठी माध्यमाची शाळा आहे. यात २ हजार ७०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या आधी गेल्या सलग २० वर्षे जेएनपीटीने इंडियन एज्युकेशन सोसायटी (मुंबई) ला ही शाळा करारावर चालविण्यास दिली होती. शाळेच्या शैक्षणिक बाबींसाठी जेएनपीटी वर्षाकाठी सुमारे ४ कोटी रुपये खर्च करीत होती. वाढता शैक्षणिक खर्च कमी करण्याच्या हट्टापायी सोसायटीचा करार संपुष्टात आल्यानंतर निविदा काढण्यात आल्या होत्या.

दोन वर्षांपूर्वी काढण्यात आलेल्या निविदानंतर १ कोटी ९० लाख इतक्या वार्षिक खर्चावर तयार झालेल्या मालाड (मुंबई) येथील रुस्तमजी केरावाला तथा के. आर. फाऊंडेशनला ही शाळा १ जुलै २०१९ पासून चालविण्यासाठी देण्यात आली आहे.याच्या अनागोंदी कारभाराचा पहिला फटका बसला तो शाळेत गेल्या ३० वर्षांपासून काम करीत असलेल्या ११४ शिक्षकांना! वेतन कपात, निलंबन नाट्याविरोधात शिक्षकांचा दोन वर्षांपासून फाऊंडेशनच्या विरोधात संघर्षं सुरू आहे.
‘आरके’च्या मनमानी आणि नियमबाह्य कारभाराचे चटके शिक्षकांबरोबरच आत्ता २ हजार ७०० विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनाही बसू लागले आहेत. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांना नाईलाजाने दुसर्‍या शाळेत प्रवेश घ्यावा लागणार आहे. तसेच मान्यतेअभावी या शाळेत शिक्षण घेत असलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांना गेल्या दोन वर्षांपासून जुन्या संस्थेच्या शाळेकडून परीक्षेचे फॉर्म भरून परीक्षा देण्याची वेळ आली असल्याचे सांगण्यात येत आहे. शाळेत २५ टक्के गरीब-गरजू विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात येतो.

मात्र अशा विद्यार्थ्यांनाही प्रवेशासाठी दुसर्‍या शाळेची वाट धरावी लागणार आहे. फक्त खर्च वाचविण्यासाठी जेएनपीटीने दुसर्‍या संस्थेला शाळा चालवायला दिली खरी, मात्र जेएनपीटी व्यवस्थापनाच्या मनमानी कारभारामुळे २ हजार ७०० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या प्रकरणी जेएनपीटी वर्कर्स युनियनने चेअरमन संजय सेठी यांच्याकडे ६ सप्टेंबर २०२१ रोजी तक्रार करून या संस्थेच्या मनमानी, अनागोंदी कारभराला पायबंद घालून विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्याची मागणी केली असल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस तथा जेएनपीटीचे माजी कामगार विश्वस्त रवींद्र पाटील यांनी दिली आहे.

दरम्यान, जेएनपीटी अंतर्गत असलेल्या आणि सध्या रुस्तुमजी केरावा फाऊंडेशनच्या अखत्यारित असलेल्या या जेएनपीटी शाळा व्यवस्थापनाच्या विरोधात विविध बाबींवर मुंबई उच्च न्यायालयात खटला दाखल असून, सदरचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे सांगत फाऊंडेशनच्या प्रशासनाने अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे.

जेएनपीटी शाळेचे कामकाज नियमानुसार आणि योग्य प्रकारे सुरू आहे. जेएनपीटीचे काही कामगार आणि शिक्षक, पालक चुकीचे आरोप करीत जेएनपीटी प्रशासन आणि शाळेची नाहक बदनामी करीत आहेत. गेल्या दोन वर्षांत कोविड दरम्यान शाळा बंद असल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ते सोडविण्यासाठी जेएनपीटी प्रयत्नशील आहे.
-जयंत ढवळे, मुख्य प्रबंधक, जेएनपीटी  

वार्ताहर :- राजकुमार भगत


हे ही वाचा – Gadchiroli Encounter : पोलिसांचे प्रत्यक्ष भेटून कौतुक करणार- एकनाथ शिंदे