घरताज्या घडामोडीकाळ नदीतील दूषित पाणी पक्षांसाठी ठरला ‘काळ’ ; बगळे मृत पावल्याची घटना...

काळ नदीतील दूषित पाणी पक्षांसाठी ठरला ‘काळ’ ; बगळे मृत पावल्याची घटना उघड

Subscribe

महाड येथील औद्योगिक क्षेत्रामधील प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून, या क्षेत्रातील काळ नदीचे पाणी प्रदूषित झाल्याने परिसरात सुमारे २५ ते ३० बगळे मृतावस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. दोन दिवस पडणार्‍या पावसामुळे हे प्रदूषित पाणी काळ नदीमध्ये मिसळले आहे. आठवड्यापूर्वी हे बगळे मृत पावल्याची घटना घडली आहे.

औद्योगिक क्षेत्रामध्ये बहुतांश रासायनिक कारखाने आहेत. या कारखान्यांच्या प्रदूषणाचा फटका टेमघर नाला, काळ नदी आणि सावित्री नदीला सातत्याने बसत असतो. पावसाळ्यामध्ये अनेक कारखानदार साठवून ठेवलेले सांडपाणी सोडून देण्याचे प्रयोग करीत असतात.औद्योगिक क्षेत्रातील सर्व सांडपाणी वाहून बाहेर येते. गेल्या आठवड्यामध्ये सावित्री नदीचे पाणी प्रदूषित झाल्याने कारखाने, निवासी वसाहती, शहराचा काही भाग आणि इतर सुमारे १४ गावांतून पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली होती. ही समस्या दूर झाल्यानंतर आता पुन्हा आसनपोई गावच्या हद्दीत काळ नदीचे पाणी काळ्या रंगाचे झाले आहे.

- Advertisement -

पाणी नक्की कोणकोणत्या कारखान्यांच्या सांडपाण्यामुळे प्रदूषित झाले ते अद्यापही स्पष्ट झालेले नाही. परंतु या प्रदूषणामुळे नदीच्या काठी सुमारे २५ ते ३० बगळे मृतावस्थेत सापडले. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. नदीच्या पाण्यामध्ये परिसरातील ग्रामस्थांची गुरेढोरे डुंबत असतात. तसेच पाणी देखील पीत असतात. त्यामुळे या जनावरांनाही धोका निर्माण होऊ शकतो, या शक्यतेने ग्रामस्थ चिंतातूर आहेत. औद्योगिक क्षेतातील प्रदूषणामुळे मासे मृत होण्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. परंतु बगळे मृतावस्थेत सापडल्याने प्रदूषणाची परिस्थिती आता गंभीर झाली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने आता तरी जागे व्हावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

प्रदूषित पाणी नदीतील पाण्यात जाऊ नये यासाठी बंधारा घालण्यात आलेला आहे. अचानक पडलेल्या पावसामुळे ही समस्या निर्माण झाली असावी. या ठिकाणची प्रत्यक्ष पाहणी केली जाईल.
– जयदीप कुंभार, क्षेत्रीय अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

- Advertisement -

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -