महाड-वारंगी रहदारी अद्याप विस्कळीत ; नवा पूल उभारण्याची गरज

महापुरात महाड-वारंगी रस्त्याचे अतोनात नुकसान झाले

The Mahad-Warangi road was severely damaged in the floods
महाड-वारंगी रहदारी अद्याप विस्कळीत ; नवा पूल उभारण्याची गरज

महाड येथे गेल्या जुलै महिन्यात आलेल्या महापुरात महाड-वारंगी रस्त्याचे अतोनात नुकसान झाले असून, वाघेरी गावाजवळ हा रस्ता वाहून गेल्याने परिसरातील नागरिकांचा महिनाभर संपर्क तुटलेला होता. स्थानिक नागरिकांनी तात्पुरता कच्चा रस्ता तयार केला आहे. ज्या ठिकाणी रस्ता वाहून गेला त्या ठिकाणी नव्या पुलाची गरज आता निर्माण झाली आहे. तालुक्यातील किल्ले रायगडाच्या पायथ्याशी वसलेल्या वारंगी गावाकडे जाण्यासाठी असलेला महाड-बिरवाडी-वारंगी रस्ता महापुरात जागोजागी बाधित झाला. बिरवाडीमधील या मार्गावरील पुलाच्या दोन्ही बाजूकडील भराव वाहून गेला, तर वाघेरी गावाजवळ जवळपास २० फूट रस्ता वाहून गेला. यामुळे या परिसरातील वारंगी, वाघेरी, पाने, छत्री निजामपूर या गावातील नागरिकांचा संपर्क तुटलेला होता. स्थानिकांनी पाण्याचा प्रवाह आणि वेग कमी झाल्यानंतर तात्पुरता कच्चा पर्यायी रस्ता तयार केला. मात्र आज देखील याच रस्त्याने वाहतूक करावी लागत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. दुचाकीस्वारांना या रस्त्यावरून जाणे नकोसे झाले आहे.

वारंगी, वाघेरी, पाने, छत्री निजामपूर ही गावे किल्ल्याच्या पायथ्याशी दुर्गम भागात वसलेली आहेत. यामुळे ऐन रात्री गंभीर रुग्णाला उपचारासाठी शहरातील दवाखान्यात नेणे किंवा आपत्कालीन स्थिती उद्भविल्यास नागरिकांना ये-जा करणे कठीण होऊन बसले आहे. अतिवृष्टीनंतर आता शहर आणि तालुक्यातील अनेक गावे पूर्वपदावर येऊ लागली असली तरी ग्रामीण भागाकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. याचा त्रास मात्र सर्वसामान्यांना होत आहे. पुरानंतर बाधित झालेल्या शासकीय इमारती आणि त्यातील डागडुजी पूर्ण होत आली असली तरी ग्रामीण भागातील रस्ते, पाणी योजनांना निधी नसल्याचे कारण पुढे केले जात आहे.

स्थानिक लोकप्रतिनिधींनी याबाबत शासन दरबारी प्रयत्नशील असणे गरजेचे असल्याची भावना वाढीस लागली आहे. पुरानंतर देखभाल दुरुस्तीकरिता तालुक्याला मोठा निधी आवश्यक आहे, ज्यामुळे परिस्थिती सुधारता येणे शक्य असल्याचे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष मोहन खांबे यांनी व्यक्त केले.

महाड-वारंगी रस्ता जुलै महिन्यापासून बेदखल असून, या परिसरातील नागरिकांना पर्यायी कच्च्या रस्त्यावरून ये-जा करणे कठीण झाले आहे. लवकर दुरुस्तीचे काम हाती घेतले पाहिजे.
– गणेश मोरे, वारंगी ग्रामस्थ

या रस्त्याच्या दुरुस्तीला लागणारा निधी अद्याप प्राप्त झालेला नाही. निधी मिळताच पक्का पूल उभा केला जाणार आहे.
– दिनेश पराते, उप कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाड


हे ही वाचा – कोरोना निर्बंधातून लहान मुलांची सुटका, १८ वर्षाखालील मुलांना पूर्ण लसीकरणाचा दर्जा