घरताज्या घडामोडीशीतल भानुशाली यांच्या मृत्यूचे गूढ कायम

शीतल भानुशाली यांच्या मृत्यूचे गूढ कायम

Subscribe

२२ किमी लांब अरबी समुद्रात हाजी अलीपर्यंत गेला मृतदेह ?

ऑक्टोबरमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असताना घाटकोपर येथे राहणार्‍या शीतल भानुशाली (३५) या गृहिणीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात मुंबई महापालिकेने घाटकोपर पोलीस ठाण्यात दुर्लक्षामुळे मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार नोंदवली आहे.

४ ऑक्टोबरला मुसळधार पाऊस कोसळत असताना शीतल दळण आणण्यासाठी म्हणून पीठाच्या गिरणीत गेल्या होत्या; पण त्या घरी परतल्याच नाहीत. २४ तासांनी त्यांचा मृतदेह अरबी समुद्रात हाजी अली येथे सापडला होता. घाटकोपर असल्फा व्हिलेज येथील एका ओपन मॅनहोलजवळ शीतल यांची पिशवी सापडली. त्यामुळे मॅनहोलमध्ये पडून त्यांचा मृत्यू झाला, असा अंदाज आहे. असल्फा व्हिलेज येथील मॅनहोलमध्ये पडल्यानंतर तब्बल २२ किमी दूर अंतरावर हाजी अलीच्या समुद्रात त्यांचा मृतदेह सापडला. त्यामुळे महापालिकेचे अधिकारी देखील चक्रावून गेले. महापालिकेच्या अंतर्गत तपास अहवालातूनही या प्रकरणात कोणताही निष्कर्ष निघू शकलेला नाही.

- Advertisement -

शीतल यांचे कुटुंबीय न्याय मिळवण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्याच्या विचारात आहेत. महापालिकेने एफआयआर नोंदवला असला, तरी त्यावर आम्ही समाधानी नाही. दिवाळी सुट्टीनंतर आम्ही हायकोर्टात याचिका दाखल करण्याच्या विचारात आहोत. आम्हाला शीतल यांना न्याय मिळवून द्यायचा आहे, असे शीतल यांच्या एका नातेवाईकाने सांगितले. मॅनहोलच्या बाजूला पिशवी सापडल्यामुळे शीतल मॅनहोलमध्ये पडून वाहून गेल्या असाव्यात, असा कुटुंबीय आणि पोलिसांचा अंदाज आहे. पण असल्फामधील भूमिगत ड्रेनज खूपच अरुंद असल्यामुळे मृतदेह वाहून समुद्रापर्यंत जाणे शक्य नाही, असे महापालिकेचे म्हणणे आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या हे मुंबई महापालिका आणि मुंबई पोलिसांशी याप्रकरणात भानुशाली कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी पाठपुरावा करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -