घरताज्या घडामोडीपोलादपूरचा ग्रामीण भाग तापाने फणफणला!

पोलादपूरचा ग्रामीण भाग तापाने फणफणला!

Subscribe

एसटीच्या संपामुळे हालात भर

अवकाळी पाऊस, दमट आणि कोंदट वातावरण, तर कधी उकाडा अशा बदलत्या विचित्र हवामानामुळे भात झोडणीच्या ऐन मोसमात तालुक्यातील गावोगावी, वाड्यावस्त्यांवर लहान मुले, महिला, पुरुष तापाने फणफणू लागले आहेत. त्यातच एसटी संपामुळे उपचार घेण्यासाठी दुर्गम भागातून शहरात येणे अवघड होत असल्याने हालात आणखी भर पडली आहे.

तापाप्रमाणे सर्दी, खोकला या साथीनेही डोके वर काढले आहे. मात्र दळणवळणाची सोय नसल्याने गोरगरिबांना दुखणे अंगावर काढावे लागत आहे. परिणामी आजार बळाविण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तालुका आरोग्य विभागामार्फत गावोगावी पहाणी करण्यात येऊन रुग्णाला त्याच्या घरी तपासणीसह औषधे द्यावी, अशी मागणी ग्रामीण जनतेकडून करण्यात येत आहे. बदलत्या हवामानामुळे ताप, सर्दी, खोकला, तसेच हगवण या साथीच्या रोगाचे प्रमाण हळूहळू वाढले आहे. अशा परिस्थितीत डोंगराळ दुर्गम भागातील जनतेसाठी आणि दर्‍याखोर्‍यातील गोरगरिबांसाठी वरदान ठरलेल्या एसटीच्या कर्मचार्‍यांचा बेमुदत संप चालू आहे. त्यामुळे खासगी वाहनातून अवा ते सवा भाडे देऊन वैद्यकीय उपचाराकरीता शासकीय ग्रामीण रुग्णालयात येणे शक्य नाही.

- Advertisement -

स्वाभाविक बळावलेला आजार रुग्णाला अंगावर काढावा लागत आहे. या संदर्भात कोंढवी मतदारसंघाच्या पंचायत समिती सदस्य दीपिका दरेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, तालुका आरोग्य विभागांतर्गत गावोगावी आशा कार्यरत आहेत. तसेच आरोग्य सेवक आणि समुदाय अधिकारी आहेत. त्यामुळे तातडीने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गुलाबराव सोनावणे यांच्याशी संपर्क साधून गाववाड्यांत आजारी असलेल्या व्यक्तीला वैद्यकीय उपचार मिळतील याकडे लक्ष दिले जाईल.

पितळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र हे शहरापासून ८ किलोमीटर अंतरावर असून, या आरोग्य केंद्राच्या १५ किलोमीटर परिघाच्या डोंगर रांगात ४५ गावे, वाडया आहेत. तेथील जनतेला वैद्यकीय उपचाराकरिता किंवा अन्य कामास्तव पितळवाडी येथे येण्यासाठी कोणतेही साधन नाही. यायचेच झाले तर भरमसाठ भाडे द्यावे लागते किंवा धोका पत्करून नाईलाजास्तव घरीच रहावे लागत आहे. दरम्यान, रुग्णांचे हाल लक्षात घेऊन शासनाने एसटी संपाबाबत लवकर तोडगा काढावा, अशी प्रतिक्रिया देवळे सरपंच बबिता दळवी यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

                                                                                             वार्ताहर- बबन शेलार

 


हे ही वाचा – इसिस काश्मीरकडून गौतम गंभीरला धमकी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -