रक्तासाठीची धावाधाव थांबणार ; रायगड हॉस्पिटलमध्ये रक्तपेढी मंजूर

कर्जतमध्ये रक्तपेढीला मंजुरी मिळाल्याने ऐनवेळी रक्तासाठी करावी लागणार धावाधाव आता थांबणार आहे.

The rush for blood will stop; Blood bank approved in Raigad Hospital
रक्तासाठीची धावाधाव थांबणार ; रायगड हॉस्पिटलमध्ये रक्तपेढी मंजूर

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रासह आरोग्य क्षेत्रात अल्पावधीत आपला ठसा उमटविणारे डॉ. नंदकुमार तासगावकर यांनी रायगड हॉस्पिटलच्या माध्यमातून गेले ६ वर्षे गोरगरीब, गरजू आणि मुख्यतः आदिवासी समाजासाठी अत्यंत माफक दरात बर्‍याचदा मोफत अशी निरंतर आरोग्य सेवा पुरवली आहे. त्या दरम्यान बर्‍याच वेळा शस्त्रक्रियेवेळी आणि कोरोना संक्रमण कालखंडात रुग्णांना होणारा कमी प्रमाणातील रक्त पुरवठा लक्षात घेऊन त्यांनी एक गरुडझेप घेत कर्जतकरांना दिलासा दिला आहे. कारण नुकताच डॉ. तासगावकर यांच्या नव्याने परवानगी मिळालेल्या रायगड हॉस्पिटल रक्तपेढीचे येत्या काही दिवसांत लोकार्पण होणार आहे.

डॉ. तासगावकर यांनी रुग्णांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी, तसेच कल्याण, डोंबिवली, खोपोली, पनवेल येथील रक्तपेढ्यांपर्यंत करावी लागणारी पायपीट थांबविण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलत जुलै २०२१ मध्ये नवीन सुसज्ज अशी रक्तपेढी सुरु करण्याची संपल्पना सादर केली होती. त्यानंतर या विषयी सातत्याने पाठपुरावा करीत राज्य आणि केंद्र सरकार यांचे सर्व निकष, नियम यांची पूर्तता करीत अंमलबजावणी केल्यानंतर १५ नोव्हेंबर रोजी सदर रक्तपेढीला नवी दिल्लीस्थित मुख्य औषध नियंत्रकांची मान्यता मिळाली आहे.

नव्याने मंजूर झालेल्या रायगड हॉस्पिटल रक्तपेढीचे येणार्‍या महिन्यात उद्घाटन होणार असून, ही रक्तपेढी सर्वसामान्यांच्या सेवेत दाखल होत असल्याने रुग्णांसह त्यांचे नातेवाईक यांचा वेळ आणि अर्थिक बचत मोठ्या प्रमाणात होणार आहे. या सोयीचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ करून घ्यावा.

– डॉ. नंदकुमार तासगावकर, चेअरमन, रायगड हॉस्पिटल