घरसंपादकीयओपेडराष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षाची निवड वाटते तितकी सोपी नाही!

राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षाची निवड वाटते तितकी सोपी नाही!

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील मातब्बर आणि वैविध्यपूर्ण असे नेतृत्व आहे. लहानपणापासून त्यांची संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांच्या प्रभावाखाली वाढ झालेली असल्यामुळे समाजातील विविध स्तरातील लोकांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची कार्यशैली आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर असे दिसेल की पवार नाहीत असे एकही क्षेत्र दिसणार नाही. मग ते राजकारण असो, सांस्कृतिक असो, साहित्य मंडळ असो, क्रीडा असो, शरद पवार सगळीकडे दिसतील. त्यामुळे असे म्हटले जाते की, पवारांशिवाय महाराष्ट्रात पान हलत नाही. पवारांच्या गेल्या अनेक वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांच्यावर अनेक आरोप झाले. प्रसारमाध्यमांतून अनेकदा त्यांच्याविरोधात छापून आले, पण त्याकडे पवारांनी फारसे लक्ष न देता आपले सामाजिक कार्य सुरू ठेवले. राजकारणात टिकून राहायचे असेल तर माणूस मनाने खंबीर असावा लागतो, त्याशिवाय त्याचा टिकाव लागणे अवघड असते. ते खंबीर मन पवारांकडे आहे. त्यामुळेच ते अनेक राजकीय आणि आरोग्यविषयक आव्हानांमध्ये टिकून राहिले आहेत.

पवारांनी वयाची ऐंशी पार केली असली तरी त्यांचा काम करण्याचा हुरूप अजूनही ओसरलेला नाही. कुठल्याही कामासाठी लोकांना एकत्र करण्याची क्षमता पवारांमध्ये आहे. गेल्या अनेक वर्षांत त्यांनी आपले संस्थात्मक महत्त्व निर्माण केले आहे. सहकाराशिवाय नाही उद्धार, या सूत्राचा अवलंब करून अनेक सहकारी सोसायट्या, सहकार तत्त्वावर निर्माण झालेले अनेक उद्योग, कारखाने त्यांनी उभे केले आहेत. कृषी क्षेत्रातही त्यांची प्रयोगशीलता वाखाणण्यासारखी आहे. सतत कार्यरत राहणारा नेता अशीच त्यांची प्रतिमा आहे. शरद पवार हे गेल्या अनेक वर्षांत असे सगळीकडे पसरलेले असल्यामुळेच जेव्हा त्यांनी स्थापन केलेल्या पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले, तेव्हा त्यांच्या पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला. खरेतर पवारांनी याअगोदर विशेषत: महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वेळा धक्कातंत्राचा वापर करून विरोधात असलेल्यांबरोबर त्यांच्या सोबत असलेल्यांनाही अचंबित केले आहे. त्यामुळे पवारांच्या विश्वासार्हतेलाही धक्के बसलेले आहेत.

- Advertisement -

शरद पवारांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या पक्षातील नेते आणि पदाधिकार्‍यांनी त्याला विरोध केला आहे. त्यानंतर पवारांनी या सगळ्या नेत्या आणि कार्यकर्त्यांना दोन ते तीन दिवसात आपण आपल्या निर्णयावर फेरविचार करू, असे सांगून तुम्ही शांत व्हा, असे आवाहन केले आहे, पण तरीही कार्यकर्ते काही शांत व्हायला तयार नाहीत. आता शरद पवारांनी आपला राजीनामा मागे घ्यावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यभर आंदोलन करण्यात येणार, अशीही चर्चा आहे. म्हणजे काहीही करून पवारांनी आपला राजीनामा मागे घ्यावा, अशी नेते आणि कार्यकर्त्यांची मागणी आहे. खरेतर आपला देश लोकशाही शासन प्रणाली मानणारा आहे, तरी व्यक्तीपूजा हा आपल्याकडे मोठा प्रकार आहे. एखाद्या व्यक्तीचे वय झाले किंवा अन्य कुठल्या कारणासाठी त्याने पदावरून दूर व्हायचे ठरवले तर कार्यकर्त्यांच्या मनाला ते पटत नाही. त्यामुळे शरद पवारांनी राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्याला विरोध करणार्‍या कार्यकर्त्यांना खडसावताना अजित पवार म्हणाले की, एका अध्यक्षाच्या जागी दुसरा अध्यक्ष आला तर तुम्हाला काय समस्या आहे. तुम्ही इतके आक्रमक का होताय. याच वेळी सुप्रिया सुळे यांनीही कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

आतापर्यंत ठीक होते, पण ही वेळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कधीतरी येणारच होती. कारण शरद पवारांचे आता वय झालेे आहे. काही गंभीर व्याधींचा त्यांनी सामना केलेला आहे. वयाप्रमाणे शरीरही थकत जाते. फार धावपळ करणे शक्य होत नाही. त्यामुळे पक्षाचा पुढील कारभार चालवण्यासाठी आपल्या जागी पर्यायी व्यवस्था करावी लागते. नाहीतर ऐनवेळी मोठा पेचप्रसंग निर्माण होऊ शकतो. कारण आपण सगळे मर्त्य मानव आहोत हे त्रिकालाबाधित सत्य आहे. शरद पवारांनी राजीनामा दिल्यानंतर एक समिती स्थापन करण्याची सूचना करून त्यासाठी काही नेत्यांची नावे सुचविली आहेत. ती समिती पुढील अध्यक्षाचा निर्णय घेणार आहे, पण अजूनही नेमका काय निर्णय घ्यायचा याबाबत राष्ट्रवादी पक्षामध्ये मुख्य नेते संभ्रमात आहेत. कारण त्यांना परिस्थितीचा अंदाज घ्यावा लागणार आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादीतील काही ज्येष्ठ नेत्यांच्या मतानुसार शरद पवार हे जर पुन्हा अध्यक्षपद स्वीकारणारच नसतील, तर मग सुप्रिया सुळे यांना पक्षाची राष्ट्रीय पातळीवरील जबाबदारी देऊन त्यांना अध्यक्ष करण्यात यावे, तर अजित पवार यांच्याकडे पक्षाची राज्यातील जबाबदारी द्यावी, पण पक्षाचा अध्यक्ष हा वरिष्ठ नेता असतो. सुप्रिया सुळे यांना अध्यक्ष बनवले तर उद्या वयाने आणि अनुभवाने मोठे असलेले अजित पवार सुप्रिया सुळे यांच्या हाताखाली काम करतील का, असाही प्रश्न आहे. त्याचसोबत राष्ट्रवादीमध्ये सुप्रिया सुळे यांच्यापेक्षा अनुभवाने मोठे असलेले अन्य नेते आहेत, त्यांचे काय? पण जेव्हा पक्ष एका व्यक्तीने स्थापन करून तो वाढवलेला असतो, तेव्हा पक्षाच्या अनेक आर्थिक गोष्टी त्या व्यक्तीशी निगडित असतात. त्याची योग्य ती व्यवस्था लावावी लागते. कारण पक्ष सगळ्यांचा असतो, पण आर्थिक गोष्टी या सगळ्यांच्या नसतात, त्याला विशिष्ट मालक असतो. त्यामुळे आपल्या देशात जे असे एका व्यक्तीने स्थापन केलेेले पक्ष आहेत, तिथे मुख्य नेता बाजूला झाल्यावर त्यांच्या उत्तराधिकार्‍यांमध्ये मोठे वाद निर्माण झाले आहेत. शिवसेना हा अगदी जवळचे उदाहरण आहे. त्यामुळे शरद पवारांनी अध्यक्षपदावरून बाजूला झाल्यानंतर पुढील घडी बसवणे वाटते तितके सोपे नाही.

कारण अजित पवार आणि सुप्रिया सुळे ही दोन प्रमुख सत्ताकेंद्रे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पवारांचे वारसदार असताना सुप्रिया सुळे यांना राजकारणात आणण्याची काय गरज होती, हा प्रश्न अनेकांना पडलेला होता. त्याचे उत्तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे राज ठाकरे हे उत्तराधिकारी मानले जात असताना उद्धव ठाकरे यांना पुढे आणण्याची काय गरज होती, यात आहे. आज जर राज ठाकरे हे शिवसेनेचे प्रमुख असते तर त्या पक्षाची आज जी अवस्था झाली आहे, तशी झाली असती का, हाही एक गूढ प्रश्न आहे. त्यामुळेच सुप्रिया सुळे यांच्या हाती पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे देऊन राष्ट्रवादीचा प्रश्न चुटकीसरशी सुटणार नाही याचा अंदाज खुद्द शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनाही आहे. दादा आणि ताईंचे तसे जिव्हाळ्याचे संबंध असले तरी ताईंना पुढे आणून आपल्याला डावलण्यात येत आहे ही भावना अजित पवारांच्या मनात आहे, अन्यथा राष्ट्रवादीतील एवढ्या ज्येष्ठ नेत्याने भाजपसोबत पहाटे शपथ घेऊन स्वत:ची बदनामी करून घेतली नसती.

ठाकरे आणि पवार ही महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी घराणी आहेत. त्यांचे वैयक्तिक पातळीवर चांगले संबंध आहेत, पण ते राजकीय विरोधक राहिलेले आहेत, मात्र महाविकास आघाडीच्या माध्यमातून ते एकत्र आले. ठाकरे आणि पवार यांना बहुमतावर आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवता आला नाही, जे अन्य राज्यातील प्रादेशिक पक्षांना शक्य झाले. याची ममता बॅनर्जी, जयललिता, चंद्राबाबू नायडू अशी बरीच उदाहरणे आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांना अन्य पक्षांशी युती किंवा आघाडी करून राज्यातील सत्ता मिळाली. त्यामुळे पक्ष म्हणून त्यांच्या मर्यादा आहेत हेही दिसून आले आहे. त्यामुळे शरद पवार यांनी जर पक्षाचा राजीनामा दिला तर पक्षाची काय अवस्था होईल, हाही प्रश्न आहे. त्यामुळे त्यांचे नेते आणि कार्यकर्ते यांना चिंता सतावत आहे. पवारांचे वय झाले असल्यामुळे पक्षाला नव्या अध्यक्षाची गरज आहे यात शंकाच नाही. हा पक्ष पवारकेंद्रित असल्यामुळे त्याचे उत्तर काढणे वाटते तितके सोपे नाही. शरद पवार यांच्यासमोर हेच मोठे आव्हान आहे. कारण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आपल्या डोळ्यासमोर त्यांचे उत्तराधिकारी मानले जाणारे राज ठाकरे त्यांनी वेगळा पक्ष स्थापन केलेला पाहावे लागले होते. आपल्या बाबतीतही तसे होऊ नये यासाठी शरद पवारांना आपले सगळे राजकीय कौशल्य पणाला लावावे लागणार हे मात्र नक्की.

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -