घरताज्या घडामोडीकोविड सेंटरमधून तरुणी गायब

कोविड सेंटरमधून तरुणी गायब

Subscribe

२७ दिवसांपासून घरच्यांशी संवाद नाही, तरुणीच्या आईचे कोविड सेंटरबाहेर धरणे

पुण्यातील शिवाजी नगरमध्ये उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड सेंटरमधील असुविधांबाबत वारंवार माहिती उजेडात येत असताना एक धक्कादायक प्रकार तेथे घडला आहे. या ठिकाणी उपचार घेत असलेली एक तरुणी गायब झाली असून गेल्या २७ दिवसांपासून तिचा घरच्यांशी संवाद नाही. कोविड सेंटरचे प्रशासन ही तरुणी आमच्याकडे नसल्याचे सांगत कानावर हात ठेवत आहेत. त्यामुळे या तरुणीच्या आईने कोविड सेंटरबाहेर धरणे आंदोलन सुरू केले आहे. माझी मुलगी आहे कुठे, असा सवाल या तरुणीच्या आईने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे.

पुण्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर शहरातील शिवाजीनगर भागात जम्बो कोविड केअर सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. या कोविड सेंटरमध्ये प्रिया गायकवाड नामक तरुणी उपचारासाठी दाखल झाली होती. मात्र, आज २७ दिवस उलटून गेले तरी देखील या मुलीशी तिच्या कुटुंबियांचा संवाद झालेला नाही. यामुळे शंका निर्माण झाल्याने तसेच प्रशासन याबाबत व्यवस्थित माहिती देत नसल्याने या मुलीच्या कुटुंबियांनी कोविड सेंटरबाहेर धरणे आंदोलन सुरू केले आहे.

- Advertisement -

कोविड सेंटरमधून गायब झालेल्या तरुणीची आई रागिणी सुरेंद्र गमरे यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या, माझी मुलगी रागिणी हिला २९ ऑगस्ट रोजी शिवाजीनगर येथील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर संध्याकाळी येथून फोन आला की, तुमची मुलगी काहीही ऐकत नाही. त्यामुळे तुम्ही येथे यावे. त्यानंतर मी येथे आल्यानंतर माझे डॉक्टरांशी बोलणे झाले. त्यावेळी ते म्हणाले की, मुलीला १३ सप्टेंबरला डिस्चार्ज देण्यात येणार आहे, तेव्हा तुम्ही रुग्णालयात यावे. त्यानुसार मी १३ तारखेला येथे मुलीला नेण्यासाठी आले असता तुमची मुलगी आमच्याकडे उपचारासाठी नाही, असे उत्तर देण्यात आले. त्यानंतर तेथील सर्वांशी चर्चा केली. मात्र, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. माझ्या मुलीचे काय झाले असेल हा प्रश्न मला सारखा सतावत आहे. आज २७ दिवस झाले तरी माझे माझ्या मुलीशी बोलणे झालेले नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनीच यामध्ये लक्ष घालून माझी मुलगी मला मिळून द्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

या प्रकरणावर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल म्हणाल्या, संबंधित मुलीच्या प्रकरणाची माहिती आम्ही घेतली असून कोविड सेंटरचे काम त्यावेळी लाईफ लाईन संस्थेकडे देण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्याकडून माहिती मागविली आहे. तसेच महिलेच्या कुटुंबियांसोबत अधिकारी चर्चा करीत आहेत. या प्रकरणाचा अहवाल प्रशासन आणि पोलिसांना देखील पाठविण्याच्या सूचना संस्थेला देण्यात आल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -