घरताज्या घडामोडीमाथेरान पेब कील्ला ट्रेकिंगसाठी गेलेल्या डोंबिवलीच्या तरुणांचा रस्ता चुकल्याने मदतीसाठी धावा...

माथेरान पेब कील्ला ट्रेकिंगसाठी गेलेल्या डोंबिवलीच्या तरुणांचा रस्ता चुकल्याने मदतीसाठी धावा…

Subscribe

नेहमीच्या  मार्गावरुन ट्रेकिंग साठी येणाऱ्या या तरुणांना ही दरड रेल्वे मार्गावर  दिसून आल्याने थोडे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

थंड हवेचे प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानच्या डोंगराला लागूनच असलेला पेब कील्ला अर्थात विकट गड हा पावसाळी पर्यटनासाठी प्रचलित आहे.अनेक हौशी महाविद्यालयीन तरूण तरुणी विकेंडमध्ये या निसर्गरम्य परिसरातील कड्यावरील गणपती तसेच पेब कील्ल्याला भेट देत असतात. ३१ जुलै रोजी डोंबिवली येथील १२ जणांचा ग्रुप ट्रेकिंग साठी पेब किल्ला येथे आला होता.या ग्रुपमध्ये ९ तरुणी ३ तरुण असा एकूण १२ जण रस्ता चुकल्याने घाबरलेल्या अवस्थेत पोलीसांकडे  दूरध्वनी वरून मदतीसाठी धावा करत होता.
सदर तरूण तरुणी फणसवाडी मार्गे ट्रेक करत करत सर्वजण पेब किल्ल्यावर पोहोचले होते. किल्ल्यावर मजा मस्ती करत ट्रीपचा मनसोक्त आनंद घेतल्यानंतर सायंकाळी घरी परतण्यासाठी परतीचा प्रवास त्यांनी सुरू केला. वॉटर पाईप रेल्वे ट्रॅकच्या मार्गाने ते सर्वजण मार्गस्थ होत असताना दोन आठवडयापूर्वी अतिवृष्टीच्या तडाख्यामुळे येथे दरड कोसळल्याची घटना घडली होती. नेहमीच्या मार्गावरुन ट्रेकिंग साठी येणाऱ्या या तरुणांना ही दरड रेल्वे मार्गावर  दिसून आल्याने थोडे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. समोर फक्त मोठमोठे दगड, बाजूला दरी आणि संपूर्ण चिखलाचे साम्राज्य त्यात अंधार काळाकुट्ट व आजूबाजूला घनदाट जंगल असल्याने मार्ग सापडेना त्यात महीलांची संख्या जास्त असल्यामुळे खुपचं भयावह परिस्थिती त्यांच्यावर ओढवली होती. या संकट काळात एकमेकांना धीर देत साधारण ७:४५ वाजता मदतीसाठी त्यांनी कर्जत व नेरळ पोलीसांना फोन केला होता. या अनुषंगाने कर्जत वरून माथेरान पोलीस ठाणे तसेच माथेरान सहयाद्री आपत्कालीन संस्थेचे अध्यक्ष वैभव नाईक यांना संपर्क करण्यात आला. यानंतर लगेचच मदतकार्यासाठी चक्र फीरली गेलीत.
माथेरान पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री रेस्क्यु टीमचे वैभव नाईक ,चेतन कळंबे, सुनिल ढोले महेश काळे यांसह संपूर्ण टीम, पत्रकार दिनेश सुतार हे दरड कोसळलेल्या त्या रेल्वे मार्गावर चिखलातुन तसेच मोठमोठ्या दगडांवरून मार्ग काढत या रस्ता चुकलेल्या तरुणांपर्यंत पोहोचले. हे सर्व तरुण अनपेक्षित घडलेल्या  प्रकारामुळे भयभीत झाले होते.यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांनी सर्वांना धीर देत त्यांच्यातील भीती घालवण्यासाठी थट्टामस्करी करत रेस्क्यू टिमीच्या मदतीने अखेर अडकलेल्या १२ जणांच्या ग्रुपला जवळपास रात्री १० वाजताच्या  सुमारास सुखरूप बाहेर काढले.  पोलीस अधिकारी तसेच रेस्क्यु टिमचे या ग्रुपने आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली.तर सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे यांनी नेरळ – माथेरान टॅक्सी चालकांच्या सहकार्याने जास्त रात्र व उशीर झाल्याने या सर्वांची घरी जाण्याची व्यवस्था देखील करून दिली.
मित्रांनो ट्रेकिंग ला जाताय खुशाल जा पण आपण ज्या ठिकाणी जातोय तेथील परिस्थितितीची संपूर्ण माहिती घेऊन जा.आपले आई वडील,परीजन घरी आपली  वाट बघत असतील यासाठी निघताना वेळेचे देखील थोडे भान ठेवा कारण अतिउत्साही हा कधी कधी तुमच्या जीवावर देखील बेतू शकतो.
                                                                                                        -दिनेश सुतार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -