घरताज्या घडामोडी..तर ठाकरे-तटकरे ठरणार माथेरानचे भाग्यविधाते!

..तर ठाकरे-तटकरे ठरणार माथेरानचे भाग्यविधाते!

Subscribe

सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडी आणि राजकारणात अशक्य ते शक्य करण्याची किमया यामुळे आगामी काळात ठाकरे आणि तटकरे शहराचे भाग्यविधाते ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.पर्यटकांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या या शहराचे रूपडे हळूहळू पलटण्यास सुरवात झाली आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार अस्तित्त्वात असून, मुख्यमंत्रीपद आणि पर्यटन खाते शिवसेनेकडे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या रुपाने आहे. योगायोगाने शिवसेनेचेच प्राबल्य येथील नगर परिषदेवर आहे. तर दुसरीकडे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे कार्यरत आहेत. या पर्यटन स्थळाला विशेष बाब म्हणून सुनील तटकरे यांनी पालकमंत्री आणि अर्थमंत्री असताना विकासाच्या बाबतीत नेहमीच झुकते माप दिले आहे. त्यांच्या कारकीर्दीत अनेक योजनांचा लाभ माथेरानकरांना मिळाला आहे.

सध्या शहरात सुरू असलेल्या विकास कामांसाठी आलेला १२३ कोटी रुपयांचा भरीव निधी असेल किंवा नवीन पाणी योजनेचा निधी हा सुनील तटकरे यांच्या विशेष प्रयत्नातून मिळालेला आहे. योगायोगाने महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने हातात हात घालून काम केल्यास या पर्यावरण संवेदनशील असलेल्या पर्यटन स्थळाचे भाग्य उजळले जाऊ शकते. मात्र काँग्रेसने स्थानिक पातळीवर फारकत घेऊन वेगळी चूल मांडल्याने आगामी निवडणुकीत काँग्रेसची भूमिका ‘एकला चलो’ची असणार का, की पर्याय म्हणून भाजप, शेकापसारखे पक्ष एकत्रित करून सन २००६ साला सारखी मोट बांधून निवडणूक लढविणार, हे देखील पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. २०१६ ची निवडणूक वगळता आजपर्यंत शिवसेना आणि राष्ट्रवादीची जवळीक जास्त राहिली आहे.

- Advertisement -

येणार्‍या निवडणुकीत स्थानिक शिवसेनेत किंगमेकर म्हणून भूमिका बजाविणारे प्रसाद सावंत आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजय सावंत या दोन बंधुंनी एकत्रित येण्याचे ठरविल्यास माथेरानला सुगीचे दिवस येऊ शकतात, असे जाणकारांचे मत आहे. त्याला कारणही तसेच सांगण्यात येत आहे. उद्धव ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा गटनेते असलेले प्रसाद सावंत यांच्यावर वरदहस्त असून, माथेरानवर दोघांचेही विशेष प्रेम आहे. तर दुसरीकडे खासदार तटकरे यांचा वरदहस्त लाभलेले अजय सावंत हे एक अनुभवी व्यक्तिमत्त्व असल्याने आगामी निवडणुकीत दोन्ही बंधू एकत्र आल्यास पुन्हा २००० सालची पुनरावृत्ती होऊ शकते. महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना आणि राष्ट्रवादीची सत्ता आल्यास राज्य सरकारकडून अनेक विकास कामे मार्गी लागू शकतात. सद्यस्थितीत राजकीय घडामोडींचा अंदाज कुणाला येत नसला तरी काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे आणि पालकमंत्री तटकरे यांनी एका कार्यक्रमासाठी येथे उपस्थिती लावली होती. या दरम्यान दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आगामी निवडणुकीत स्थानिक पातळीवर आघाडीचा धर्म पाळावा, असे देखील संकेत दिल्याचे बोलले जात आहे. पण सध्याचे राजकारण पाहता यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांची भूमिका सर्वात महत्त्वाची असणार आहे.

२०१६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादीला सर्वाधिक फटका बसला आणि पराजयाला सामोरे जावे लागले होते. असे असले तरी साडेचार वर्षांच्या कालावधीत सत्ताधारी शिवसेनेकडून शहरात सुरू असलेल्या विकास कामांमध्ये राष्ट्रवादीने कधीही खोडा घातला नाही. त्या उलट शिवसेनेतून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या नगरसेवकांकडुन नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव पारित करण्यासाठी प्रयत्न केले जात असताना राष्ट्रवादीने आपला आघाडी धर्म पाळत शिवसेनेला सहकार्य केले होते. राष्ट्रवादीचे सर्वच पक्षांबरोबर मैत्रीपूर्ण संबंध असल्याने स्थानिक पातळीवर सार्वत्रिक निवडणुकीच्या दरम्यान राष्ट्रवादीला अन्य पक्षांसोबत आघाडीसाठी सर्व पर्याय उपलब्ध असल्याचे सध्या तरी दिसून येत आहे. मात्र आघाडी धर्म पाळत राष्ट्रवादी शिवसेनेसोबत जाणे अधिक पसंत करेल. शिवसेना-राष्ट्रवादी युती झाल्यास ठाकरे आणि तटकरे माथेरानचे भाग्यविधाते ठरू शकतील, असे जाणकारांचे मत आहे.

- Advertisement -

    वार्ताहर :- दिनेश सुतार 


 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -