भारत सावध राहिल्यास पुढे आर्थिक धोका नाही…

अमेरिकेला 40 टक्के आर्थिक मंदीचा इशारा देताना चीन, जपान, दक्षिण कोरिया, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आदींसारख्या देशांमध्येही आर्थिक मंदीची झळ काही प्रमाणात जाणवेल, असे ‘ब्लूमबर्ग’कडून सावध करण्यात आले आहे. जगातील सर्व आघाडीच्या देशांना आर्थिक मंदीबाबत सावधतेचा इशारा देताना ‘ब्लूमबर्ग’कडून भारताला मात्र, दिलासा देण्यात आला आहे. भारत जागतिक मंदीच्या गर्तेत सापडण्याची शक्यता जवळपास शून्य टक्के असल्याची शक्यता ‘ब्लूमबर्ग’कडून वर्तविण्यात आली आहे. याचा अर्थ भारताला आर्थिक मंदीचा फटका बसणार नाही, असे मुळीच नाही. जागतिक आर्थिक मंदी असेल पण वेळीच सावध झाल्यास पुढे धोका नाही…! असा या मागील खरा अर्थ आहे.

‘नो एन्ट्री’…पुढे धोका आहे, या सिनेमाचे शीर्षक पाहिल्यास यामध्ये सावधानतेचा इशारा देण्यात आल्याची प्रचिती येते. पुढे काही तरी विपरीत घडणार, अशी परिस्थिती असल्याने पुढे धोका असून वेळीच सावध व्हा, असा इशारा या शीर्षकातून देण्यात आला आहे. शीर्षक जरी सिनेमाचे असले तरी सध्याच्या घडीला जगातील अनेक देशांमधील आर्थिक मंदी पाहिल्यास सिनेमाचे हे शीर्षक येथेही काही प्रमाणात लागू होते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
कारण, ‘ब्लूमबर्गकडून करण्यात आलेल्या नुकत्याच आर्थिक सर्वेक्षणानुसार, जगभरातील अनेक देशांवर आगामी काळात आर्थिक मंदीचे सावट असणार आहे. वेळीच सावध न झाल्यास याचे गंभीर परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागू शकतात, असा इशारा ‘ब्लूमबर्गकडून देण्यात आला आहे. त्यामुळे सावधान, पुढे धोका आहे…! हे शीर्षक आर्थिक मंदीच्या गर्तेत जाण्याची शक्यता असणार्‍या देशांसाठी तंतोतंत लागू होते, असे म्हटल्यास कदाचित ते चुकीचे ठरणार नाही. आर्थिक महासत्ता असणार्‍या अमेरिकेसारख्या देशांमध्येसुद्धा 40 टक्के मंदीची शक्यता असल्याचे ‘ब्लूमबर्ग’कडून आर्थिक सर्वेक्षणामध्ये नमूद करण्यात आले आहे. अमेरिकेला 40 टक्के आर्थिक मंदीचा इशारा देताना चीन, जपान, दक्षिण कोरिया, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आदींसारख्या देशांमध्येही आर्थिक मंदीची झळ काही प्रमाणात जाणवेल, असे ‘ब्लूमबर्ग’कडून सावध करण्यात आले आहे. या सर्व देशांमध्ये किती प्रमाणात आर्थिक मंदीची झळ जाणवेल, याची टक्केवारीही ‘ब्लूमबर्ग’कडून जाहीर करण्यात आली आहे. जगातील सर्व आघाडीच्या देशांना आर्थिक मंदीबाबत सावधतेचा इशारा देताना ‘ब्लूमबर्ग’कडून भारताला मात्र, दिलासा देण्यात आला आहे. भारत जागतिक मंदीच्या गर्तेत सापडण्याची शक्यता जवळपास शून्य टक्के असणार असल्याची शक्यता ‘ब्लूमबर्ग’कडून वर्तविण्यात आली आहे. याचा अर्थ भारताला आर्थिक मंदीचा फटका बसणार नाही, असे मुळीच नाही. जागतिक आर्थिक मंदी असेल पण वेळीच सावध झाल्यास पुढे धोका नाही…! असा या मागील खरा अर्थ आहे.

जगात आर्थिक महासत्ता म्हणून ओळखल्या जाणार्‍या अमेरिकेसारख्या देशाला जागतिक आर्थिक मंदीची 40 टक्के शक्यता वर्तविण्यात आलेली असताना भारत मात्र शून्य टक्के आर्थिक मंदीच्या गर्तेत सापडण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने याबाबत आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे. ‘ब्लूमबर्ग’कडून करण्यात आलेले आर्थिक सर्वेक्षण चुकीचे असल्याचा निष्कर्षही विविध देशांतील अर्थतज्ज्ञांनी काढण्यास सुरुवात केली. हे तर होणारच होते. परंतु, अमेरिका, चीन, जपान आदींसारख्या देशांना ‘ब्लूमबर्ग’चे सर्वेक्षण इतक्या मोठ्या प्रमाणात जागतिक आर्थिक मंदीचा फटका बसण्याची शक्यता वर्तविते आणि दुसरीकडे भारत मात्र जागतिक आर्थिक मंदीच्या गर्तेत शून्य टक्के सापडण्याचा अंदाज व्यक्त करते यामागील कारणे जाणून घेणे येथे फार महत्वाचे आहे. यासाठी सर्वात प्रथम म्हणजे जागतिक आर्थिक मंदी म्हणजे काय, हे जाणून घेणे क्रमप्राप्त ठरते.

जागतिक आर्थिक मंदी ही विविध राष्ट्रांच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या दरावर (जीडीपी) ठरत असते. एखाद्या देशाचा जीडीपी सलग दोन तिमाहीमध्ये (उणे) निगेटीव्ह राहिल्यास म्हणजे जीडीपीचा दर वाढण्याऐवजी त्यात घसरण झाल्यास मंदीची परिस्थिती निर्माण झाली आहे, असे अर्थशास्त्राच्या परिभाषेत बोलले जाते. उदाहरण घ्यायचे झाल्यास जर सलग दोन दुसर्‍या तिमाहीमध्ये भारताचा जीडीपी दर जर उणे असेल तर देशात मंदी आली, असा त्याचा अर्थ होतो. मंदीचा अर्थ म्हणजे देशाचा अर्थचक्र धावण्याऐवजी रुतून बसण्यासारखा होतो. मंदीची अवस्था फार भीषण असतात. महागाईचा भस्मासूर वाढीस लागतो. देशातील रोजगार कमी होतात. बेरोजगारीचे प्रमाण देशात प्रचंड प्रमाणात वाढते. बेरोजगारीचे प्रमाण वाढल्यास देशामध्ये गुन्हेगारीचे प्रमाणही वाढते. देशातील नागरिकांकडे बचत करण्यासाठी पैसे उरत नाहीत. परिणामी आर्थिक व्यवहार ठप्प होतात आणि अर्थव्यवस्था कोलमडते. नागरिकांचे उत्पन्न, औद्योगिक उत्पादन, घाऊक आणि किरकोळ विक्री आणि रोजगार या सर्वांमध्ये मोठी घसरण होते. आर्थिक मंदी दीर्घकाळ सुरू राहिल्यास उद्योग-व्यवसाय आणि बँकांनाही त्याचा मोठा फटका बसतो. आर्थिक मंदीतून बाहेर पडणे देशाला पुन्हा कठीण होऊन बसते. या परिस्थितीतून सावरणे म्हणजे शून्यातून सुरुवात करण्यासारखे असते, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.

कोरोना महामारीनंतर जगातील आर्थिक परिस्थिती बिघडेल, अशी शक्यता याआधीच अनेक अर्थतज्ज्ञांनी वर्तविली होती. जगातील अनेक देशांना पुढील काळात आर्थिक मंदीचा सामना करावा लागण्याची दाट शक्यता वर्तविताना त्यांनी वेळीच सावध होण्याचा इशाराही दिला होता. श्रीलंका, पाकिस्तान यांसारख्या देशांमधील सद्यस्थिती पाहता आर्थिक तज्ज्ञांचे हे म्हणणे खरे होत असल्याचे पाहायला मिळत आहे. केवळ श्रीलंका, पाकिस्तानच नाही तर जगातील अनेक छोटे देश आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहेत. येत्या काळात ही परिस्थिती वाढणार असून अनेक देशांमध्ये ही परिस्थिती उद्भवल्यास जागतिक आर्थिक मंदी आल्याशिवाय राहणार नाही, असा दाखला केवळ ‘ब्लूमबर्ग’च नाही तर अनेक सर्वेक्षणामधून यापूर्वीही देण्यात आला आहे.

जगाने केवळ कोरोना महामारीचाच सामना केला असे नाही. कोरोना महामारीनंतर डेल्टा, झिका, ओमायक्रॉन आणि सध्या मंकीपॉक्स आदींसारख्या विविध आजारांचा प्रादुर्भाव अनेक देशांमध्ये वाढीस लागल्याचे पाहायला मिळाले होते. किंबहुना, अद्यापही काही देश विविध आजारांच्या प्रादुर्भावांना तोंड देत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अद्यापही जगभरातील अनेक देश आपली विस्कटलेली आर्थिक घडी सावरण्यावरच भर देत असल्याचे चित्र आहे. एकेकाळी हेच सर्व देश आपली आर्थिक प्रगती करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे चित्र होते. या सर्व देशांमध्ये यासाठी स्पर्धा होती. परंतु, कोरोना महामारीनंतर जगभरात विविध नवनव्या आजारांनी डोके वर काढण्यास सुरुवात केल्यानंतर जगातील अनेक देशांमध्ये आर्थिक टंचाईचे गंभीर स्वरूप निर्माण झाले. साथरोगांच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यातच सर्व शक्ती पणाला लागत असल्याने सध्या अनेक देश त्यात गुंतलेले आहेत. आपली आर्थिक स्थिती सुधारण्याकडे ज्या पद्धतीने ताकद लावण्याची गरज आहे, त्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाही. परिणामी आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस ढासळली जात असून अनेक देश आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे अनेक देशांतील ही परिस्थिती पाहता जगात लवकरच आर्थिक मंदीची शक्यता असल्याचे ‘ब्लूमबर्ग’च्या आर्थिक सर्वेक्षणाचे वृत्त नाकारता येत नाही.

आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असणार्‍या अनेक देशांमध्ये सध्या महागाई गगनाला भिडली आहे. अनियंत्रित महागाईला लगाम लावण्यासाठी जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून आक्रमकपणे व्याज दरवाढीचे धोरण अवलंबिले जात असल्याने अमेरिकेसह बहुतांश देशांवर आर्थिक मंदीचे सावट असल्याचे ‘ब्लूमबर्ग’कडून आपल्या सर्वेक्षणामध्ये नमूद करण्यात आले आहे. केवळ अमेरिकाच नव्हे तर आशिया खंडातील अर्थव्यवस्थांनाही मंदीचा धोका वाढत आहे. मात्र, भारत मंदीच्या गर्तेत सापडण्याची शक्यता जवळपास शून्य टक्के असल्याचा ‘ब्लूमबर्ग’ने केलेल्या सर्वेक्षणाचा निष्कर्ष आहे.

आशिया खंडातील बहुतांश देश राजकीय, सामाजिक आणि आर्थिक अस्थिरतेचा सामना करत असून, महागाईने अनेक वर्षांचे उच्चांक मोडीत काढल्याचे ‘ब्लूमबर्ग’चे आर्थिक सर्वेक्षण सांगते. म्हणूनच पुढील वर्षभरात मंदी येण्याचा दावा केला जात आहे. श्रीलंका आधीच मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत असून पुढील वर्षभरात तेथे मंदी येण्याची तब्बल ८५ टक्के शक्यता आहे. तसेच न्यूझीलंड, तैवान, ऑस्ट्रेलिया आणि फिलिपाइन्समध्ये मंदीची शक्यता अनुक्रमे ३३ टक्के, २० टक्के, २० टक्के आणि ८ टक्के आहे. सर्वेक्षणात चीनसारखा बलाढ्य देशदेखील मंदीत जाण्याची २० टक्के शक्यता दर्शविली आहे. दक्षिण कोरिया व जपान मंदीच्या गर्तेत बुडण्याची शक्यता २५ टक्के आहे. जागतिक पातळीवर महागाई नियंत्रणात आली नाही तर पुढील वर्षांत संपूर्ण जग आर्थिक मंदीच्या गर्तेत जाऊ शकते, अशी भीती ‘ब्लूमबर्ग’च्या सर्वेक्षणामध्ये व्यक्त करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे अमेरिकेसारखा अर्थिक महासत्ता असलेला देश आर्थिक मंदीत प्रवेश करण्याची ३८ ते ४० टक्के शक्यता आहे. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीपर्यंत जागतिक आर्थिक मंदीच्या गर्तेमध्ये अमेरिका सापडण्याची शक्यता शून्य असल्याचे विविध अंदाज अर्थतज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत होते. परंतु, ‘ब्लूमबर्ग’कडून नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये ही परिस्थिती आता विपरित असल्याची दाखवण्यात आली आहे. अमेरिकेत 40 टक्के मंदीची शक्यता नोंदवण्यात आली आहे. तर, सद्यस्थितीत भारत मात्र जागतिक आर्थिक गर्तेत सापडण्याची शक्यता शून्य टकके इतकी वर्तविण्यात आली आहे. तर, संपूर्ण युरोपात ५० ते ५५ टक्के जागतिक आर्थिक मंदीची जोखीम आहे. कारण ऊर्जेच्या वाढत्या किमतीचा जर्मनी आणि फ्रान्ससारख्या देशांना सर्वाधिक फटका बसला आहे, ज्याचा युरोपातील इतर भागावर परिणाम झाला आहे.

भारताच्या संदर्भात सांगायचे झाल्यास स्वातंत्र्यानंतर आपल्या देशात आतापर्यंत दोनदा जागतिक आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. 1991 मध्ये भारताला पहिल्यांदा भयानक जागतिक आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. भारताला जागतिक आर्थिक मंदीचा फटका बसला जरूर. पण, भारत त्यातून वेगाने सावरला, हेदेखील तितकेच खरे. त्यानंतर भारताला 2008मध्ये दुसर्‍यांदा आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागला. त्या संकटाला बाह्य घटक जबाबदार होते. तेव्हा भारतात आर्थिक मंदी नव्हती, पण अमेरिकेसह इतर देशांच्या संकटाने भारतालाही मंदीच्या झळा सहन कराव्या लागल्या. परंतु, याही वेळेस भारताने तितक्याच वेगाने प्रगती करत जागतिक आर्थिक मंदीच्या सावटातून बाहेर पडण्यात यश मिळविले. ‘ब्लूमबर्ग’कडून भारताला जरी जागतिक आर्थिक मंदीच्या सावटाबाबत सावधतेचा इशारा देण्यात आला नसला तरी ही वेळ गाफील राहण्याची नाही. मंदी ही कधीच अल्पकाळासाठी राहिलेली नाही. संपूर्ण दशकभरापर्यंत तिचा प्रभाव जाणून येतो. त्यामुळे आज ना उद्या धोका आहेच. म्हणून वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. जागतिक आर्थिक मंदीच्या कचाट्यात न सापडता आपली आर्थिक परिस्थिती आणखीन भक्कम कशी करता येईल, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवल्यास भारताला पुढे धोका नाही…!

– रामचंद्र नाईक