Monday, September 20, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी कर्नाळा व फणसाड अभयारण्यात होणार पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण उपक्रमाचा शुभारंभ

कर्नाळा व फणसाड अभयारण्यात होणार पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण उपक्रमाचा शुभारंभ

कौशल्य आत्मसात करुन त्याच्या सहाय्याने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यटन व्यवसाय व रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.

Related Story

- Advertisement -
रायगड जिल्ह्यातील कर्नाळा पक्षी अभयारण्य व फणसाड अभयारण्य परिसरातील स्थानिक आदिवासी समाजातील बेराजगार युवक-युवतींना २ ते ६ ऑगस्ट २०२१ रोजी राष्ट्रीय पातळीवरील गाईड निर्माण करणाऱ्या “आयआयटीटीएम” या भारत सरकार मान्यता प्राप्त संस्थेमार्फत प्रशिक्षण कार्यक्रम पनवेल येथील कर्नाळा पक्षी अभयारण्य येथे आयोजित केला आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी स्थानिक तरुण-तरुणींनी उत्तम प्रतिसाद द्यावा व पर्यटक मार्गदर्शक (गाईड)चे कौशल्य आत्मसात करावे, असे आवाहन पर्यटन राज्यमंत्री तथा पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.
महाराष्ट्र हे पर्यटनदृष्ट्या संपन्न राज्य आहे. पर्यटनावर आधारित विविध उद्योगधंदे पर्यटनस्थळी व तीर्थक्षेत्र स्थळी विकसित होत आहेत. त्याचप्रमाणे पर्यटनस्थळी ‘तज्ञ पर्यटक मागर्दशक'(गाईड) हा उत्तम पर्याय विकसित होत आहे. स्थानिक पातळीवरील मार्गदर्शन विषयक ज्ञान, कौशल्य आत्मसात करुन त्याच्या सहाय्याने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यटन व्यवसाय व रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, त्यासाठीचे कौशल्य आत्मसात करण्याची संधी पर्यटन विभाग स्थानिकांना देत आहे, असे मत पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी प्रशिक्षण उपक्रमाबाबत माहिती देते वेळी व्यक्त केले.
जिल्ह्यातील कर्नाळा पक्षी अभयारण्य व फणसाड अभयारण्य या ठिकाणी पर्यटक, पक्षी अभ्यासक व निसर्गप्रेमी यांची कायम पसंती असते. शालेय विद्यार्थ्यांच्या सहली, अभ्यास दौरे या दोन्ही पर्यटनस्थळी होत असतात. येथे येणाऱ्या पर्यटकांना अभयारण्यातील महत्त्वाच्या स्थळांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन मिळावे, पर्यटन मार्गदर्शक म्हणून स्थानिक आदिवासी तरुण-तरुणींना प्राधान्याने रोजगार उपलब्ध व्हावा, अशी पर्यटन राज्यमंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री  ना. कु.आदिती तटकरे यांची संकल्पना आहे. त्यानुसार भारत सरकारचा ऑनलाईन “पर्यटन सुलभ मार्गदर्शक” हा अभ्यासक्रम महाराष्ट्रातील बेरोजगार युवकांसाठी अधिकृतरित्या महाराष्ट्र शासनाने प्रमाणित करून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यातील फणसाड अभयारण्य परिसरातील ११ व कर्नाळा पक्षी अभयारण्य परिसरातील २० याप्रमाणे एकूण ३१ आदिवासी स्थानिक युवक व युवतींना गाईड प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण वर्ग पर्यटन संचालनालयामार्फत आयोजित करण्यात येणार आहेत. त्यासाठी संचालक, डॉ.धनंजय सावळकर, पर्यटन विभाग, यांनी पुढाकार घेतला आहे.

पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षणाबाबत माहिती

 

सलग ५ दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षण कार्यक्रमात ‘पर्यटनाचे सर्वसाधारण पैलू’ व ‘प्रात्यक्षिक’ अशा दोन विभागातील अभ्यासक्रम प्रशिक्षणार्थींना देण्यात येणार आहेत. ज्यामध्ये पर्यटनाची थोडक्यात ओळख, पर्यटन प्रशिक्षणाची  पायाभूत माहिती, या पर्यटन प्रशिक्षणातील करिअरच्या संधी व या उद्योगातील महत्‍त्व, व्यावसायिक आव्हाने, जबाबदारी, उत्तम प्रशिक्षण कसे बनाल, पर्यटनाचे विविध पैलू, जैवविविधता, वन्यजीव, संवाद कौशल्ये, पर्यटकांचे स्वागत, प्रथमोपचाराची  साधने, पथ-प्रात्यक्षिक, पर्यटकांच्या आवडीनुसार अवांतर चर्चा, समालोचनाचे तंत्र, व्यक्तीमत्व विकास, कर्नाळा किल्ल्यावर प्रत्यक्ष भेट व प्रात्यक्षिक अभ्यास आदीबाबत तज्ञ प्रशिक्षकांमार्फत प्रशिक्षण  देण्यात येणार आहे. प्रत्येक प्रशिक्षणार्थीला या उपक्रमातील सहभाग व प्रगतीनुसार तज्ञ प्रशिक्षकांकडून प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.

- Advertisement -