दिघोडे – गव्हाणफाटा महामार्गावर अवजड वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांची कारवाई

वाहतूक कोंडीमुळे प्रवासी हैराण झाले आहेत.

Traffic police action on heavy motorists on dighode gawanphata highway
दिघोडे - गव्हाणफाटा महामार्गावर अवजड वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांची कारवाई

उरणच्या जे एन पी टी बंदर परिसरातून ठाणे,नवी मुंबई आदि ठिकाणी येणाऱ्या अवजड वाहनांना वेळेची मर्यादा घालून दिली आहे. ठाणे जिल्ह्यात होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या वाहनांवर सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत रस्त्यावर उतरवण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.या नियमांचे उल्लंघन कंटेनर ट्रेलर चालकांकडून केले जात आहे. उरण तालुक्यातील दिघोडी-गव्हाणफाटा महामार्गावर नियमित होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे प्रवासी हैराण झाले आहेत. नवी मुंबईचे पोलिस आयुक्त बिपीन कुमार सिंह यांनी २७ सप्टेंबर २०२१ पासून सकाळी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिसरात अवजड कंटेनर ट्रेलर वाहतुकीला बंदी घातली आहे. त्याचे पालन न करणाऱ्या अवजड वाहनांवर उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. दिघोडे – गव्हाणफाटा महामार्गावर दिघोडे,वेश्वि,जांभुळपाडा,वाढधोंडी खिंड या रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने उभी करून महामार्ग ठप्प कारीत असल्याने तासतास या मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे.

 नवी मुंबई पोलिस आयुक्तांच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करीत वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या अवजड वाहनांवर जोरदार कारवाईची मोहीम उरण वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक संजय पवार, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय जाधव, पोलिस नाईक रविंंद्र पार्टे  व पोलिस नाईक विशाल भिसे यांनी सुरू केल्याने आत्ता वाहतूक कोंडी सुरळीत होत असल्याने प्रवासी आणि सामान्य नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.