१५ सनदी अधिकार्‍यांची बदल्या

राज्य सरकारने सोमवारी पुन्हा एकदा राज्यभरातील १५ ज्येष्ठ सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या असून त्यामध्ये फडणवीस सरकारच्या काळात क्रीम पोस्टिंगवर असणार्‍या तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील समजल्या जाणार्‍या सनदी अधिकार्‍यांना साइड पोस्टिंगला पाठवून पुन्हा एकदा विजनवासात धाडण्यात आले आहे. त्यामध्ये ज्येष्ठ सनदी अधिकारी अश्विनी जोशी, प्रवीण दराडे तसेच पल्लवी दराडे या फडणवीस धार्जिण्या सनदी अधिकार्‍यांचा समावेश आहे.

सी. के. डांगे यांची नियुक्ती संचालक महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई रिक्त पदावर, ए. आर. काळे यांची नियुक्ती आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, मुंबई या पदावर, डॉ. एम. एस. कळशेट्टी यांची नियुक्ती संचालक, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा, पुणे या पदावर, डॉ. अश्विनी जोशी यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स महामंडळ मर्यादित, मुंबई या पदावर, प्रवीण दराडे यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळ, मुंबई या पदावर तर पल्लवी दराडे यांची नियुक्ती सहसचिव, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई अपील व सुरक्षा या रिक्त पदावर, जयश्री भोज यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ, मुंबई या पदावर, महेंद्र वारभुवन यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, महात्मा फुले जन आरोग्य योजना, मुंबई या पदावर, एच. पी. तुम्मोड यांची नियुक्ती आयुक्त, दुग्धविकास, मुंबई या रिक्त पदावर करण्यात आली आहे. आर. बी. भोसले यांची नियुक्ती जिल्हाधिकारी अहमदनगर या पदावर आणि डॉ. के. एच. कुलकर्णी, संचालक, नगर परिषद प्रशासन, मुंबई या पदावर करण्यात आली आहे. आर. एस. क्षीरसागर यांची बदली मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अहमदनगर या पदावर, बी. बी. दांगाडे यांची बदली सचिव, फी नियमिन प्राधिकरण, मुंबई, पदावर, आर. के. गावडे यांची बदली मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नंदूरबार या पदावर तर सुधाकर शिंदे यांची बदली उपसचिव, सामान्य प्रशासन खाते, मंत्रालय, मुंबई या पदावर करण्यात आली आहे.