ठाण्यात खासगी ट्रॅव्हल्सच्या बसने अचानक घेतला पेट!

Private travels bus caught fire near jupiter hospital thane
बसने अचानक पेट घेतला आणि क्षणार्धात आख्खी बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली!

शिर्डी येथून प्रवाशांना घेऊन बोरिवलीकडे निघालेल्या एका खासगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसला ठाण्यातील माजिवडा येथे आग लागल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीत बस पूर्णपणे जाळून खाक झाली असून बससोबत प्रवाशांच्या सामानाचा देखील कोळसा झाला आहे. चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे २१ प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाने ही आग विझवली असून आगीचे कारण अद्याप कळून आलेले नाही.

शिर्डी येथून २१ प्रवाशांना घेऊन बोरिवली येथे निघालेली साई राज ट्रॅव्हल्सची स्लीपरकोच बस क्रमांक एम.एच. १५ – ईएच- ९९०९ ही दुपारी शिर्डी येथून निघाली होती. दरम्यान, सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास बस ठाण्यातील पूर्व द्रुतगती महामार्ग येथील ज्युपिटर हॉस्पिटल समोर येताच बस मधून धूर येत असल्याचे बस चालक राजू बावके याच्या लक्षात आले. त्याने ताबडतोब बस रस्त्याच्या कडेला घेऊन प्रवाशांना बसमधून उतरण्यास सांगितले. घाबरलेल्या अवस्थेत प्रवासी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सामनाशिवाय बसच्या बाहेर पडले. प्रवासी बाहेर पडताच बसने पेट घेतला आणि काही क्षणातच संपूर्ण बस आगीच्या भक्षस्थानी पडली.

ठाणे वाहतूक विभाग, राबोडी पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी २१ प्रवाशांचे सामान मात्र संपूर्ण जळून खाक झाल्याची माहिती ठामपा आपत्ती कक्षेचे प्रमुख संतोष कदम यांनी दिली. केवळ बसचालकाच्या प्रसंगावधानामुळे २१ प्रवाशांचे जीव वाचले असून ही बाब चालकाच्या वेळीच लक्षात आल्यामुळे त्याने बस बाजूला घेतल्यामुळे मोठी दुर्घटना टळली अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आलेली असून अधिक तपास सुरु असल्याची माहिती राबोडी पोलीस ठाण्याचे वपोनि. शिरतोडे यांनी दिली आहे.