कंटेनर चालकाला मारहाण करुन लुटणार्‍या दोघांना अटक

संधी मिळताच त्या दोघांनी चौधरी यांना पकडले व मारहाण करण्यास सुरुवात केली.

IPL Betting Racket Busted In Thane three bookies arrested rs 7.45 lakh seized

माल पोहोचविण्यासाठी आलेल्या एका कंटनेर चालकाला लोखंडी सळईने बेदम मारहाण करुन त्याला लुटणार्‍या दोघा लुटारुंना सुरक्षा रक्षकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना तळोजा एमआयडीसीत घडली. विकास पंडीत जाधव आणि लहू शट्टू जाधव अशी या दोघांची नावे असल्याची माहिती पुढे आली. या दोघा लुटारुंना तळोजा पोलिसांनी जबरी चोरीच्या गुह्याखाली अटक केली आहे.

या घटनेतील जखमी कंटेनर चालकाचे नाव चंद्रवीर चौधरी (६०) असे आहे. ते मूूळचे मध्यप्रदेश येथील असून अहमदाबाद रोड लाईन्स ट्रान्स्पोर्टमध्ये कंटेनर चालक म्हणून काम करत आहेत. चौधरी यांनी आपल्या कंटेनरमध्ये भोपाळ मध्यप्रदेश येथून माल भरला होता. त्यानंतर सदरचा माल खाली करण्यासाठी ते तळोजा धानसर येथील रौफ इंटरप्रायजेस येथे आले होते. रौफ इंटरप्रायजेस कंपनीचा पत्ता विचारण्यासाठी आपला कंटेनर रस्त्याच्या बाजूला उभा करून चौधरी हे पायी जात होते. याचवेळी दोनजण स्कुटीवरुन संशयास्पदरित्या वावरताना चौधरी यांना दिसून आले. म्हणून प्रसंगावधान राखत चौधरी अशोक लेलँड कंपनीच्या दिशेने जाण्यासाठी निघाले.संधी मिळताच त्या दोघांनी चौधरी यांना पकडले व मारहाण करण्यास सुरुवात केली.

लुटारुंच्या तावडीतून सुटत चौधरी यांनी अशोक लेलँड कंपनीच्या भिंतीवरुन आतमध्ये उडी टाकून प्रवेश केला. त्यांच्यापाठोपाठ ते लुटारुही भिंतीवरुन उडी टाकून आत शिरले व पुन्हा चौधरी यांना लोखंडी सळईने मारहाण करत, त्यांच्याजवळील रोख रक्कम लुटली. हा प्रकार सुरक्षारक्षकांच्या निदर्शनात आला असता त्यांनी दोनही लुटारुंना पकडले आणि तळोजा पोलिसांना बोलावून त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. लुटारुंनी केलेल्या मारहाणीत कंटेरन चालक चंद्रवीर चौधरी गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


हेही वाचा – Maharashtra Lockdown 2021: … तर महाराष्ट्रात पुन्हा कडक लॉकडाऊन – राजेश टोपे