TRP RACKET :रिपब्लिकच्या CFO सह दोन जाहिरात कंपन्यांना समन्स

टीआरपी घोटाळाप्रकरणी अजून दोन आरोपींना अटक

arnab goswami parambir singh
रिपब्लिकचे संपादक अर्णब गोस्वामी आणि मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग

टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट (टीआरपी) घोटाळाप्रकरणी अन्य दोन आरोपींना गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. शिरीष सतीश पट्टनशेट्टी आणि नारायण नंदकिशोर शर्मा अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. यापूर्वी याच गुन्ह्यात पोलिसांनी विशाल वेद भंडारी आणि बोमपेल्ली राव मिस्त्री या दोघांना अटक केली होती. या दोघांच्या अटकेने या गुन्ह्यांतील अटक आरोपींची संख्या आता चार झाली तर विनय त्रिपाठी, दिनेश विश्वकर्मा, रॉकीसह इतरांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. दरम्यान, याच गुन्ह्यांत रिपब्लिक नेटवर्कच्या सीएफओसह दोन जाहिरात कंपनीची चौकशी होणार आहे. त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले असून त्यांच्या जबानीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता मुंबई पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.

5 ऑक्टोबरला पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना विशाल भंडारी व त्याच्या इतर सहकार्‍यांनी बीएआरसी या संस्थेने भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी इन्स्टॉल केलेल्या टीआरपी बॅरोमीटरचा गैरवापर करून काही टिव्ही चॅनेल्सचे टीआरपी वाढविण्यास मदत केली आहे, या माहितीनंतर 6 ऑक्टोबरला विशाल भंडारी आणि बोमपेल्ली मिस्त्री या दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्या चौकशीत विशाल हा हंसा रिसर्च ग्रुप कंपनीमध्ये सिलेशनशीप मॅनेजर म्हणून काम करीत होता. त्याने काही विशिष्ट टिव्ही चॅनेल्सचा टिआरपी वाढावा यासाठी इतर सहकार्‍यांच्या मदतीने ज्या घरांमध्ये टीआरपी मोजण्यासाठी बेरोमीटी बसविलेले आहे, अशा काही घरांना पैशांचे आमिष दाखवून टीव्ही चॅनेल्स पाहण्यासाठी प्रवृत्त केले आहे.

या माहितीनंतर या दोघांसह इतर आरोपींविरुद्ध पोलिसांनी 409, 420, 120 ब, 34 भादंवी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून या दोन्ही आरोपींना अटक केली होती. त्यांच्या चौकशीनंतर गुरुवारी त्यांचे दोन सहकारी शिरीष पट्टनशेट्टी आणि नारायण शर्मा या दोघांना पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत त्यांना शुक्रवारी लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. बोमपेेल्लीने चौकशीत रिपब्लिक न्यूज चॅनेल, फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा हे चॅनेल्स जास्तीत जास्त पाहण्यासाठी शिरीष आणि नारायण यांना पैसे दिले होते. दरमाह त्यांना ठराविक रक्कम याकामी कमिशन म्हणून दिले जात होते. पोलीस तपासात आलेल्या माहितीनंतर आता पोलिसांनी इतर आरोपींकडे आपला मोर्चा वळविला होता, त्याचाच एक भाग म्हणून रिपब्लिक नेटवर्कच्या सीएफओसह दोन जाहिरात कंपनीच्या मालकांना चौकशीसाठी समन्स बजाविण्यात आले आहे.

शनिवारी या तिघांची चौकशी करून जबानी नोंदविण्यात येणार आहे. या तीन चॅनेल्सला देण्यात आलेल्या जाहिरातीबाबत ही चौकशी होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या आरोापींनी आतापर्यंत किती घरांमध्ये बेरोमीटर लावले होते, त्यासाठी त्यांनी काही एजंटची नियुक्ती केली होती, हा संपूर्ण व्यवहार त्यांच्या बँक खात्यातून होत असल्याने या सर्व आरोपींच्या बँक खात्याचा तपशील तपासला जाणार आहे. त्यासाठी पोलीस फॉरेन्सिक ऑडिट करणार आहे. या ऑडीटमधून अनेक धक्कादायक खुलासे होणार आहेत. विशालच्या चौकशीत त्याला हंसा कंपनीने 83 बॅरोमीटर दिले होते, मिस्त्री हा विशालला दरमहा वीस हजार रुपये टीआरपी वाढविण्यासाठी देत होता. या गुन्ह्यात हंसाचे इतर काही अधिकारी आणि कर्मचार्‍यांचा सहभाग आहे की नाही याचाही तपास सुरू आहे.