कल्याण कोळशेवाडीत तरुण तरुणीला जमावाकडून बेदम मारहाण

कल्याण कोळशेवाडीत दोन तरुण आणि एका तरुणीला जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अद्याप याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.

Two young men and a young woman was beaten by people in kalyan
कल्याण कोळशेवाडीत तरुण तरुणीला जमावाकडून बेदम मारहाण

कल्याण कोळसेवाडीत परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याण कोळसेवाडी विभागात दोन तरुणांना आणि एका तरुणीला जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना मध्यरात्री घडली. राहुल गडेकर आणि बंटी प्रधान, असे मारहाण झालेल्या तरुणांची नावे आहेत. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

नेमके काय घडले?

उल्हासनगर येथे राहणारे राहुल गडेकर आणि बंटी प्रधान यांची मैत्रीण रिक्षाने प्रवास करत होती. त्या दरम्यान रिक्षा चालकांने त्या तरुणीची छेडछाड काढली. ही घटना घडताच तरुणींने राहुल आणि बंटीला फोनवरुन या घटनेची माहिती दिली. ही माहिती मिळताच तरुणीचे दोन्ही मित्र घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांची रिक्षा चालकासोबत बाचाबाची झाली. दरम्यान, रिक्षाचालक आणि गावातील लोकांनी या तरुणांना जोरदार मारहाण केली. अक्षरश: त्यांना पट्ट्याने मारहाण करण्यात आली. एवढेच नाही तर आरोपींनी संबंधित तरुणीचे केस पकडून तिलाही बुक्क्यांनी मारहाण केली आहे. दरम्यान, तेथून जाणाऱ्या एका व्यक्तीनं या घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याचबरोबर त्यानं या पोस्टमध्ये ठाणे पोलिसांना देखील टॅग केले आहे. दरम्यान, व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर ही घटना समोर आली आहे. मात्र, ९ तास उलटूनही अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.


हेही वाचा – कल्याणात ‘तो मी नव्हेच’चा वास्तव प्रयोग