घरताज्या घडामोडीआंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांच्या नावासाठी हट्ट धरणार - केंद्रिय मंत्री कपील पाटलांची ग्वाही

आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांच्या नावासाठी हट्ट धरणार – केंद्रिय मंत्री कपील पाटलांची ग्वाही

Subscribe

कपिल पाटील यांच्या रायगड दौऱ्याला भूमीपुत्रांचा उदंड प्रतिसाद

भूमीपुत्रांचे श्रध्दास्थान असलेल्या दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू. केंद्र सरकारही यासाठी सकारात्मक आहे. मीही यासाठी हट्ट धरणार आहे. याद्वारे केंद्र भूमीपुत्रांचा आदर करेल. देशातील २ लाख ६९ हजार गावांचा विकास करण्याचा विडा आमच्या सरकारने उचलला असल्याचे त्यांनी पनवेल येथे बोलताना सांगितले. अलिबाग येथील सभेत त्यांनी राज्य सरकार भूमीपुत्रांना देशोधडीला लावत असल्याचा आरोप केला. तर पेणमध्ये त्यांनी १४ आणि १५ व्या वित्त आयोगाकरवी करण्यात येत असलेल्या गावविकासाचा दावा केला.

कपिल पाटील यांच्या रायगड जिल्ह्यातील या जनआशीर्वाद यात्रेला भाजप कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यात्रेतून अभिवादन, केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांतील लाभार्थींशी संवाद, वरिष्ठ नागरिकांशी भेट, मच्छीमार, व्यापारी, गोदाम व्यावसायिक आणि शेतकर्‍यांबरोबर संवाद, कोविड रुग्णालयाला भेट, गणेश मूर्तीकारांबरोबर बैठक, भूमिपूत्रांशी संवाद साधण्यात आला. या यात्रेच्या निमित्ताने कपील पाटील यांचे जागोजागी औंक्षण, ढोल ताशे, ब्रास बँड, फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले. या जनआशीर्वाद यात्रेला अलिबाग येथून प्रारंभ झाला. पेण, पनवेल असे मार्गक्रमण करून उरण तालुक्यातील जासई येथे यात्रेचा समारोप करण्यात आला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, माजी खासदार रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार निरंजन डावखरे, आमदार महेश बालदी, आमदार रमेश पाटील, आमदार गणपत गायकवाड, आमदार रवि पाटील, पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांचा सहभाग या यात्रेत होता.

- Advertisement -

रायगड भूमिपुत्रांचा जिल्हा आहे. या जिल्ह्यात भूमिपुत्रांचे अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्या अनुषंगाने त्यांना न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते दि.बा. पाटील यांचेच नाव दिले जावे यासाठी आपला आग्रह कायम राहील, असे सांगताना राज्य सरकारने स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या भावनांचा विचार केला पाहिजे. पुढाकार घेत सरकारने दिबांच्या नावाचा पुरस्कार करावा, असे आवाहन त्यांनी केले. माझा या नावासाठी आवर्जून हट्ट राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

दि.बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला मिळावे यासाठी नुकताच कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील व माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील कृती समितीने केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेतली. सिंधिया यांनी नामांतराचे हे प्रकरण सकारात्मक घेतले आहे. भूमिपुत्रांना न्याय देण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. नवी मुंबई विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे ही मी प्रथम मागणी लोकसभेत ३७७ प्रमाणे केली अशी आठवण त्यांनी करून दिली.

- Advertisement -

जमीन संपादनाचा हट्ट कशाला?

अलिबाग येथे बोलताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औषध निर्माण कंपनी उभारण्याची केंद्राची संकल्पना होती, असे कपील पाटील म्हणाले. राज्याला याचा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या होत्या. प्रकल्पाला केंद्राने अजून मंजूरी दिली नसताना राज्य सरकार एमआयडीसीद्वारे मुरुड आणि रोहा तालुक्यातील शेतकर्‍यांच्या जमीन संपादित करण्याचा हट्टाहास का करीत आहे? भूमीपुत्रांवर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी या निमित्त शेतकर्‍यांना दिली. जनआशीर्वाद यात्रेत त्यांनी शेतकर्‍यांची भेट घेतली.

या निमित्त अलिबागमधील चेंढरे येथे भाग्य लक्ष्मी सभागृहात सभा घेण्यात आली.यावेळी कपिल पाटील बोलत होते.रायगड जिल्ह्यामध्ये दोन हजार तीनशे एकरहून अधिक जमीन संपादित करण्यात आली आहे. गेली अनेक वर्षे होऊन देखील या ठिकाणी कोणत्याही प्रकल्पाच्या उभारणीची वीटदेखील उभी राहिली नाही. ज्या भागात सुपिक शेत जमीन आहे, मच्छीमार आपला व्यवसाय चांगल्या पध्दतीने करीत आहेत, ती जमीन नापिक करण्याचा अट्टाहास राज्य सरकार का करीत आहे, असा सवाल पाटील यांनी केला.

वित्तआयोगातून २ लाख ३६ हजार कोटींचा निधी

पेण येथे बोलताना मंत्री कपील पाटील यांनी १४व्या वित्त आयोगातून २ लाख २९२ कोटी रुपये राज्याला मिळवून दिल्याचा दावा केला. तर १५ व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींना २ लाख ३६ हजार कोटी इतका निधी दिल्याचे ते म्हणाले. केंद्राच्या योजना घराघरात पोहचवून राज्यात भाजपचे सरकार आणा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. मंत्री कपील पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची भरभरून स्तुती केली. ओबीसी समाजाला मंत्रिपद मिळाले, ही नरेंद्र मोदींची कृपा असल्याचे ते म्हणाले. भूमीपुत्रांना न्याय देण्यासाठी देशातील तरुणाई मोदींबरोबर असल्याचे त्यांनी सांगितले. कोकणचा विकास हा भाजपमुळे होत असल्याचा दावा करताना त्यांनी कोकणच्या रस्त्याला गडकरींच्या खात्याने दिलेल्या १०० कोटींचा उल्लेख आवर्जून केला.


हेही वाचा – एकनाथ खडसेंची डोकेदुखी वाढली, मंदाकिनी खडसेंना ईडीचे समन्स


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -