घरगणेशोत्सव २०२०उकडीच्या मोदकांप्रमाणेच 'हे' हटके नैवेद्यही यंदा नक्की करा!

उकडीच्या मोदकांप्रमाणेच ‘हे’ हटके नैवेद्यही यंदा नक्की करा!

Subscribe

गणेशोत्सवामुळे सगळ्यांच्याच घरात आनंदाच वातावरण आहे. कारण या आपल्या लाडक्या बाप्पाची लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्व मंडळी दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतात. आता बाप्पा घरी आले म्हटल्यावर घरी पारंपरिक चमचमीत पदार्थाची रेलचेल असते. बाप्पाचे आवडते मोदक तर घरोघरी तयार केले जातातच. पण दररोज वेगळा नैवेद्य काय करायचा असा प्रश्न गृहिणींना पडतो. तर आज आम्ही तुम्हाला असेच हटके पण खास नैवेद्य सांगणार आहोत.

१. दुर्वामृत

गणपती बाप्पाला मोदकांप्रमाणेच दुर्वा आणि जास्वंदीच लाल फुलंही प्रिय आहे. असं म्हटलं जातं की गणपतीला मोदक आवडायचे आणि ते खाऊन-खाऊन त्याचे पोट खराब होऊ नये म्हणून दुर्वासुद्धा खायचे. त्यामुळे त्यांच्यासाठी खास दुर्वामृत तयार करू शकता. दुर्वामृत हे एक हटके पेय आहे. पारंपरिक पंचामृत तीर्थाला हा योग्य पर्याय आहे. हे पेय तुम्ही पाहुण्यांना मूसच्या रूपात देखील सव्‍‌र्ह करू शकता.

- Advertisement -

साहित्य : दुर्वा २ वाटय़ा, पुदिन्याची पाने अर्धी वाटी, अर्ध्या लिंबाचा रस, मीठ २ चिमूट, साखर चिमूटभर.

कृती : २ वाटय़ा दुर्वा, अर्धी वाटी पुदिना, अर्धा लिंबाचा रस एकत्र करुन मिश्रण मिक्सरवर बारीक करा. नंतर त्यात चवीनुसार मीठ व साखर घाला. साखरेचे प्रमाण मात्र मिठापेक्षा कमी ठेवा. नंतर हे मिश्रण गाळून फ्रीजमध्ये थंड करून प्यायला द्या.

- Advertisement -

२. श्रीखंड-खजूर लाडू

साहित्य – १ वाटी दही, १ वाटी दूध, १ वाटी साखर, १ वाटी किसलेले काजू-बदाम, खजूर, चारोळी, केशर, जायफळ-वेलची पावडर

कृती – प्रथम गॅस पेटवून कढईत दही, दूध, साखर एकत्र करावे. या मिश्रणाचा घट्ट गोळा होईपर्यंत हलवावे. नंतर त्यात काजू-बदाम पावडर, चारोळी, दुधात भिजवलेले केशर टाकून हलवावे. हे मिश्रण कढईपासून सुटू लागले की कढई गॅसवरून उतरवून हलवावे. जायफळ-वेलची पूड व खजूर घालून गार होण्यापूर्वी तुपाचा हात लावून त्याचे लाडू बनवावे.

३. टोमॅटो वडी

साहित्य : टोमॅटो १ किलो, नारळाचा कीस ३ वाटय़ा, साखर अडीच वाटय़ा.

कृती – टोमॅटो वाफवून त्याचा रस काढून घ्या. त्यात साखर व नारळाचा कीस मिसळून मिश्रण गॅसवर ठेवा. मिश्रण घट्ट झाल्यावर खाली उतरवून त्यात पिठी साखर घाला. एका ताटाला तूप लावून मिश्रण त्यात ओतून घ्या. मिश्रण थंड झाल्यावर त्याच्या वडय़ा कापून खायला द्या.

४. पंजिरी

साहित्य- दोन वाटी कणिक, एक वाटी साखर, एक वाटी तूप, मनुके, बदाम, काजू.

कृती- प्रथम एक कढई घ्या. त्यात काजू, बदाम कमी आचेवर भाजून घ्या. हे झाल्यानंतर बाजूला ठेवा. आता कढई कमी आचेवर ठेवून गव्हाचं पीठ भाजून घ्या. पिठाला तांबूस रंग येत नाही तोपर्यंत भाजत राहा. गॅस बंद करून त्यात पिठी साखर आणि भाजून घेतलेला सुका मेवा घालून मिश्रण परतवून घ्या. थंड झाल्यावर पंजिरी सर्व्ह करा.

५. कणकेचे लाडू

साहित्य- तूप, कणिक, साखर, सुका मेवा, वेलची पूड, सुकं खोबरं

कृती- प्रथम एका कढईत कणिक भाजून घ्या. नंतर कढईत अर्धी वाटी तूप घ्या. त्यात भाजून घेतलेलं गव्हाचं पीठ घाला. तुम्ही जर एक वाटी गव्हाचं पीठ घेत असाल तर एक वाटी साखर घाला. साखरेचं प्रमाण कमी ठेवू शकता. हे मिश्रण तीन मिनिटं हलवत राहा. तुमच्या आवडीनुसार त्यात सुका मेवा घाला आणि गॅस बंद करा. लाडूचं हे मिश्रण एका ताटात काढून थंड होऊ द्या. नंतर त्यात वेलची पूड घालून परत एकदा मिश्रण एकजीव करा आणि लाडू वळून घ्या. तुम्हाला हवं असल्यास त्यात सुकं खोबरं देखील घालू शकता.

६. पनीरची खीर

साहित्य : पनीर पाव किलो, दूध २ लिटर, कॉर्नफ्लोअर १ चमचा, केवडा इसेन्स पाव चमचा, साखर १ वाटी, कदाम-पिस्ते ४ चमचे.

कृती : पाव किलो ताजे पनीर घेऊन त्याचे छोटे छाटे चौकोनी तुकडे करावेत. दोन लिटर दूध आटवायला ठेवा. त्यात १ चमचा कॉर्नफ्लोअर घालून निम्मे होईस्तोवर आटवावे, नंतर साखर घालून एक उकळी येऊ द्या. साखर विरघळली की खाली उतरवून थंड करावे. नंतर त्यात पनीरचे तुकडे, केवडा इसेन्स घालून फ्रीजमध्ये थंड करायला ठेवावे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -