अवकाळीसह धुक्यामुळे अलिबागचा कांदा रुसणार?

unseasonal rain fog Alibag onion

तालुक्यातील कार्ले, खंडाळे आणि अन्य परिसरात पांढर्‍या कांद्याची लागवड सुरू झाल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. अवकाळी पावसासह धुक्यामुळे कांद्यावर मर आणि करपासारख्या रोगाचा धोका कायमच असल्यामुळे यावर्षी तालुक्यात कांद्याच्या उत्पादनावर 50 टक्क्यांपेक्षा अधिक परिणाम होण्याची भीती शेतकर्‍यांकडून व्यक्त केली जात आहे.

अलिबागचा कांदा आकाराने मध्यम असून, चविष्ट आणि औषधी असल्याने या कांद्याला ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असते. पांढर्‍या कांद्याला मागणी वाढू लागल्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांची संख्याही दिवसेंदिवस वाढू लागली आहे. कार्ले, खंडाळे, नेहुली, बामणगाव आणि रामराज परिसरात कांद्याची लागवड केली जाते. सर्वाधिक कार्ले परिसरात प्रत्येक घरातील शेतकरी पांढर्‍या कांद्याची लागवड करतात. तर रोहे तालुक्यातील खांब आणि देवकान्हे या गावांमध्ये काही प्रमाणात कांद्याची लागवड केली जाते. एकरी सुमारे 6 टन, तर हेक्टरी 15 टन उत्पादन मिळते. दरवर्षी सुमारे 3 कोटींची उलाढाल या कांद्यापासून होते. लागवडीपासून दीड हजार शेतकर्‍यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो.

भौगोलिक मानांकनामुळे अलिबागच्या कांद्याची एक वेगळी ओळख निर्माण होणार आहे. कांद्याला भौगोलिक मानांकन मिळणार असल्याने शेतकर्‍यांनी यंदा कांद्याचे अधिक बियाणे घेऊन त्याची लागवड करण्यास सुरुवात केली होती. भात कापणीची कामे संपल्यानंतर नोव्हेंबरमध्ये कांदा लागवडीला सुरुवात होते. दोन ते अडीच महिन्यांत कांदा तयार होतो. त्यानंतर त्याच्या माळा तयार करून तो बाजारात येतो. परंतु डिसेंबरमध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे कांद्याची रोपे पाण्यात कुजली. त्यानंतरही शेतकर्‍यांनी दुबार लागवडीचा प्रयत्न केला. मात्र, अवकाळी पावसानंतर जिल्ह्यामध्ये धुक्याचे वातावरण सुरू झाले. या धुक्याचा परिणाम कांदा पिकावर होण्याची भीती शेतकर्‍यांकडून व्यक्त होत आहे. धुक्यामुळे करपासारख्या रोगाचा धोका वाढू लागला असल्याचे शेतकर्‍यांकडून सांगण्यात आले आहे. परिणामी सर्वांना हवाहवासा वाटणारा पांढरा कांदा यंदा रुसणार की काय, अशी शंका उपस्थित केली जात आहे.