Uran : इको पार्क प्रकल्प रद्द करून कांदळवनाचे क्षेत्र अखेर वन विभागाकडे ; पर्यावरणप्रेमींच्या मागणीला यश

प्रकल्पाचा विकास करताना अनेक ठिकाणी खारफुटी आणि पाणथळ जागांना हानी

uran kandal forest area finally handed over to forest department after cacellation of eco park project

पर्यावरणप्रेमींच्या मागणी आणि वारंवार होणार्‍या तक्रारींमुळे पर्यावरण संवर्धनासाठी जेएनपीटीने आता आपल्या अखत्यारीतील ९१३ हेक्टर वन क्षेत्र (कांदळवन) वन खात्याकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला आहे. जेएनपीटीने यापूर्वी पर्यावरण रक्षणासाठी जेएनपीटीच्या जवळील बेलपाडा येथे कांदळवन पार्क करण्याचा निर्णय घेतला होता. आता मात्र हे कांदळवन पार्क रद्द करून जेएनपीटीच्या हद्दीतील सर्व कांदळवन वन विभागाकडे हस्तांतरीत करण्यात येणार असल्याचे पर्यावरणप्रेमींना दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे. जेएनपीटीने नॅटकनेक्ट या पर्यावरणवादी संस्थेला तिच्या आरटीआय प्रश्नाच्या उत्तरादाखल हे सूचित केले आहे की, फॉरेस्ट डेव्हलपमेंट ऑफ महाराष्ट्रसोबत (एफडीसीएम) सल्लामसलत करून येथे कांदळवन इको पार्क स्थापन करण्यासाठी अभ्यास करण्याचा प्रस्ताव केला होता. आता मात्र तसे न करता हे सर्व कांदळवन क्षेत्रच वन विभागाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे.

पर्यावरण कार्यकर्त्यांनी जेएनपीटी प्रकल्पाचा विकास करताना अनेक ठिकाणी खारफुटी आणि पाणथळ जागांना हानी पोहचवली असल्याच्या तक्रारी केल्या होत्या आणि त्यांच्या या विकास कामांना विरोध केला होता. जेएनपीटीने चौथ्या टर्मिनलसाठी ४५०० खारफुटीची झाडे तोडल्याबद्दल १ लाख रुपयांचा दंड देखील ठोठावला होता. नॅटकनेक्ट आणि श्री एकवीरा आई प्रतिष्ठानाने शासनाला जेएनपीटी आपल्या सेझ प्रकल्पासाठी खारफुटी नष्ट करत असल्याची तक्रार केली होती. येथील निसर्ग आणि हिरवेगार समुद्र किनारे वैराण मैदानांमध्ये रुपांतरीत झाल्याची छायाचित्रे देखील त्यांनी सादर केली होती. महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अ‍ॅथॉरिटी (एमसीझेडएमए) ने देखील याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.
सुरुवातीला जेएनपीटीने आपल्याकडे किती हेक्टर क्षेत्रात खारफुटी आहे. याची माहिती पर्यावरण प्रेमींपासून दडविण्यात आली होती. मात्र इको कांदळवन पार्कबाबत माहिती विचारल्यानंतर जेएनपीटीने आपली भूमिका स्पष्ट केली असून, जेएनपीटीकडे जवळ-जवळ ९१३ हेक्टर क्षेत्र असल्याचे स्पष्ट केले आणि हे सर्व क्षेत्र आता वन विभागाकडे हस्तांतरित करणार असून, यापुढे वन विभाग कांदळवनाचे रक्षण आणि संवर्धन करणार असल्याचे सांगितले. एफडीसीएमच्या ठाणे प्रभागीय अधिकार्‍यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

जेएनपीटीच्या अंतर्गत असलेल्या खारफुटींचे आता संवर्धन होणार असल्यामुळे नॅटकनेक्टचे बी. एन. कुमार यांनी आनंद व्यक्त केला आहे. महाराष्ट्र मॅनग्रोव्ह फाऊंडेशनचे कार्यकारी संचालक विरेंद्र तिवारी म्हणाले, आम्ही जेएनपीटीच्या अंतर्गत असलेल्या खारफुटींच्या सुरळीत आणि तात्काळ स्थानांतरणाची संरक्षित वनांच्या स्वरुपात संवर्धनासाठी अपेक्षा करीत आहोत. तर जेएनपीटीने खारफुटी आणि मडफ्लॅटसची हानी केल्यामुळे मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले आहे. आता मात्र पर्यावरण आणि मच्छीमारांना याचा फायदा होईल, असे मत नंदकुमार पवार यांनी व्यक्त केले.


हे ही वाचा – Maharashtra Corona Update: राज्यात कोरोना रुग्णसंख्येत विक्रमी घट, १४ जिल्ह्यांत शून्य रुग्ण