घरताज्या घडामोडीउर्मिला मातोंडकर सेनेच्या आमदार

उर्मिला मातोंडकर सेनेच्या आमदार

Subscribe

प्रवक्ते संजय राऊत यांच्याकडून दुजोरा

राष्ट्र सेवा दलाचे संस्कार झालेल्या, मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढलेल्या सिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेकडून राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेव पाठवले जाणार आहे. उर्मिला मातोंडकर यांचे नाव शिवसेनेकडून निश्चित करण्यात आले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे उर्मिला मातोंडकर यांच्याशी बोलणे झाले असल्याचे शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी सांगितले. विशेष म्हणजे उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेकडून विधान परिषदेवर जाण्यास होकार कळवल्याचे समजते. अभिनेत्री कंगना रानौत विरुद्ध ठाकरे सरकार या संघर्षात उर्मिला यांनी सडेतोड भूमिका घेत कंगनाला चांगलेच फटकारले होते. त्यातूनच शिवसेनेतून उर्मिला यांचे नाव विधान परिषदेसाठी पुढे आल्याचे कळते. राज्यपाल नियुक्त शिवसेनेच्या चार आमदारांपैकी मिलिंद नार्वेकर, सचिन अहिर, उर्मिला मातोंडकर यांची नावे आता निश्चित झाली असून शिवसेनेच्या एका जागेचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे.

उर्मिला मातोंडकर या शिवसेनेकडून विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य होणार, याबाबतचे वृत्त दै. आपलं महानगरने गुरुवार, ३० ऑक्टोबर २०२० रोजीच्या अंकात प्रसिद्ध केले होते. हे वृत्त खरे ठरले असून संजय राऊत यांनी उर्मिला यांना शिवसेनेकडून विधान परिषदेवर पाठवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

उर्मिला मातोंडकर यांनी २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी उत्तर मुंबईतून निवडणुकही लढवली.मात्र भाजप उमेदवार गोपाळ शेट्टींनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर पक्षातील अंतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी काही महिन्यातच सदस्यत्वाचा राजीनामा दिला. मात्र त्यानंतरही काँग्रेसनं त्यांना राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी उमेदवारी देऊ केली होती. मात्र आपल्याला विधानपरिषदेच्या जागेसाठी रस नाही, असं उत्तर उर्मिला मातोंडकर यांच्याकडून मिळाल्याची माहिती समोर आली होती.

राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी कला, साहित्य, समाजसेवा आणि सहकार असा निकष आहे. या निकषांची पूर्तता न झाल्यास राज्यपाल त्या नावांना आडकाठी करू शकतात किंवा ही नावं फेटाळली जाऊ शकतात. महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे संबंधही तसे फारसे सलोख्याचे नाहीत. त्यामुळे या प्रकरणात कोर्टात जाण्याची वेळ आल्यास काय तयारी ठेवावी लागेल या सर्वच बाबींवर महाविकास आघाडीमध्ये खलबते सुरू आहेत. त्यामुळे नाव ठरवण्यास वेळ लागत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

- Advertisement -

राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर पाठवायच्या १२ सदस्यांची नावे निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही नावे राज्यपालांकडे पाठवण्याआधी सर्व ती खबरदारी घेतली जात आहे. राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी कला, साहित्य, समाजसेवा आणि सहकार असे निकष असल्याने सगळ्या बाजू तपासल्या जात आहेत. यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांकडून प्रत्येकी ४ जणांची वर्णी लागणार असून शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर हे नाव आता निश्चित झाले आहे. यासोबत उर्मिला यांचा शिवसेना प्रवेशही निश्चित झाला असून त्यांना प्रवक्तांच्या पॅनेलमध्येही संधी देण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -