Maharashtra Curfew: ठाण्यासह कल्याणमध्ये संचारबंदीच्या नियमांना केराची टोपली

ठाण्यासह कल्याणमध्ये संचारबंदीच्या नियमांनाचे उल्लंघन.

Violation of curfew rules in Thane and Kalyan
Maharashtra Curfew: ठाण्यासह कल्याणमध्ये संचारबंदीच्या नियमांना केराची टोपली

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने राज्यात पुन्हा एकदा नवे निर्बंध लागू केले. १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजल्यापासून हे नियम लागू करण्यात आले आहेत. मात्र, एकीकडे राज्य सरकार कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी नव्या नियमांची अमलबजावणी करत असताना त्या नियमांचे प्रत्यक्षात पालन केले जात आहे का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण लोकल ट्रेनमधल्या गर्दीमध्ये या नव्या नियमांचा फारसा फरक दिसून आलेला नाही. ठाण्यासह कल्याण स्थानकात प्रवेशासाठी कोणतेही निर्बंध लावलेले दिसून आले नाही. तसेच यापूर्वी ज्याप्रमाणे स्थानकात बॅरिकेट्स लावण्यात आले होते, त्याचे देखील नियोजन दिसून आले नाही. त्यामुळे ठाण्यासह कल्याण स्थानकात संचारबंदीचे नियम पायदळी तुडवताना नागरिक दिसत आहेत.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच अत्यावश्यक सेवा करणाऱ्यांना लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी दिली आहे. परंतु, सर्वसामान्यांना प्रवास करण्यास मुभा देण्याबाबत राज्य सरकाने यासंदर्भात लेखी आदेश रेल्वेला दिलेले नाहीत. तसेच यावेळी निर्बंध लावताना रेल्वेच्या अधिकाऱ्यांना देखील बैठकीला बोलावण्यात आले नव्हते. त्यामुळे रेल्वे स्थानकात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला परवानगी दिली जात आहे. तसेच तिकिट खिडक्यांवर येणाऱ्यांना तिकिट देखील दिले जात आहे. कारण राज्य सरकारकडून रेल्वेला कोणत्याही प्रकारचे आदेश अजूनही प्राप्त झालेले नाही.

दरम्यान, रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या दोन दिवसात गर्दीचे निरीक्षण करुन त्यानंतरच लोकल फेऱ्या कमी करायच्या की तशाच ठेवायच्या याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.


हेही वाचा – SSC Board Exam: दहावीच्या परीक्षांचे होणार तरी काय? ऑनलाईन घेणे शक्य आहे का?