रायगडाची भेट ही माझ्यासाठी तीर्थयात्राच आहे – राष्ट्रपती रामनाथ कोविंद

रायगड किल्ल्याला भेट देणे हे प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे प्रतिपादन

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज किल्ले रायगडाला भेट दिली. यावेळी त्यांनी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीस्थळाला भेट देत पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे दुपारी १२.३० वाजता पाचाड येथे आगमन झाले. त्यानंतर राष्ट्रपती रायगड रोप वे ने किल्ल्य्यावर गेले. यावेळी रायगड किल्ल्याची भेट ही माझ्यासाठी तीर्थयात्रा असल्याचे, गौरवोद्गार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काढले.

राष्ट्रपती म्हणाले की, शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. शिवाजी महाराजांच्या समर्थ नेतृत्वाखाली, या संपूर्ण प्रदेशाच्या वैभवात वाढ झाली आणि देशभक्तीची भावना पुन्हा निर्माण झाली, असे ते म्हणाले. १९ व्या शतकातील ‘शिवराज-विजय या  संस्कृत ग्रंथामध्ये शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे अत्यंत प्रभावी वर्णन केले आहे, याचा त्यांनी उल्लेख केला. देशातील जनतेला, विशेषतः युवा वर्गाला महाराजांच्या महान व्यक्तिमत्त्वाशी परिचित होता यावे आणि महाराजांचे वैशिष्ट्यपूर्ण कार्य समजून घेता यावे यासाठी या ग्रंथाचे विविध भारतीय भाषांमध्ये भाषांतर केले जावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रायगड किल्ल्याचे कशाप्रकारे संवर्धन आणि जतन केले जात आहे, त्याचे सादरीकरण पाहिले. त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले व होळीच्या माळावरील शिवरायांचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीस अभिवादन केले.

गेल्या आठवडाभरापासून किल्ले रायगडावर राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरु होती. दिल्लीपासून तालुका पोलीस ठाण्यापर्यंतची संरक्षण यंत्रणा गडावर कार्यरत होती. किल्ले रायगडावर होळीच्या माळावर हेलिकॉप्टर उतरण्यास शिवभक्तांनी विरोध दर्शवल्यानंतर हेलिकॉप्टर पाचाड येथे उतरवण्याच्या निर्णय घेण्यात आला.

त्यानुसार आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पाचाड येथे हेलिकॉप्टर दाखल झाले. याठीकाणाहून विशेष वाहनाने राष्ट्रपती रायगड रोपवे कडे गेले. रायगड रोपवे याठिकाणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, खा.युवराज संभाजीराजे, खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री आदितीताई तटकरे, आमदार भरत गोगावले, जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी राष्ट्रापती कोविंद यांचे स्वागत केले. राष्ट्रपतींनी यावेळी राजसदर, होळीचा माळ, जगदीश्वर मंदिर, आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीस्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी छत्रपती  शिवाजी महाराज यांच्या समाधीस्थळाला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.

आपल्या अभिभाषणात रामनाथ कोविंद यांनी रायगडला भेट देणे हे प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. या भेटीला मी तीर्थक्षेत्र मानतो, असे सांगून विसाव्या शतकात गांधीजीनी स्थापन केलेले हिंद स्वराज्य हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यापासून प्रेरित होते असे सांगितले.

रायगडावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासाठी विशेष बग्गी ची व्यवस्था निमंत्रकांनी केली होती. होळीचा माळ ते जगदीश्वर मंदिर या अंतरात या बग्गीचा वापर करण्यात आला.राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी याठिकाणी आयोजित केलेल्या एका पुस्तक प्रदर्शनाला देखील भेट दिली. यावेळी त्यांनी दोन पुस्तकांचे प्रकाशन देखील केले. रायगडावर आधारित माहितीपटाचे देखील प्रकाशन करण्यात आले.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे सहकुटुंब किल्ले रायगडावर आले होते. पत्नी सविता कोविंद, आणि मुलगीने देखील रायगडावर येवून महाराजांना अभिवादन केले. तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांच्यानंतर तब्बल ३६ वर्षांनी राष्ट्रपती गडावर येण्याचा योग आला. यामुळे गडावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


हे ही वाचा – Omicron Variant: चिंतेत वाढ! मुंबईतील २ जणांना ओमिक्रॉनची लागण