Mahad : महाड औद्योगिक क्षेत्रात पाणी दूषित

Water contamination in Mahad industrial area
Mahad : महाड औद्योगिक क्षेत्रात पाणी दूषित

महाड येथील औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांच्या सांडपाण्यामुळे नदीचे पाणी दूषित झाल्याने जॅकवेलमधून होणारा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. यामुळे कारखाने, निवासी संकुल, तसेच इतर १८ गावांना होणारा पाणी पुरवठा बंद झाल्याने हजारो नागरिकांवर पिण्याच्या पाण्याचे संकट ओढवले आहे. हे पाणी प्रदूषित करणार्‍या कारखान्यांवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

सावित्री पुलाजवळ एमआयडीसीची जॅकवेल आहे. नदीवर एमआयडीसीकडून काळ आणि सावित्री नदीवर बंधारा बांधण्यात आला आहे. यात रानबाजीरे धरणातून सोडण्यात येणारे पाणी, तसेच पावसाचे पाणी साठवले जाते आणि ते शुद्ध करून कारखाने, निवासी संकुल, तसेच शहराचा काही भाग आणि इतर १८ पुरविण्यात येते. त्यामुळे या जॅकवेलवर हजारो नागरिकांच्या पाणी पुरवठ्याबरोबरच कारखान्यातील उत्पादनही अवलंबून आहे. परंतु दोन दिवसांपूर्वी या जॅकवेलमध्ये संपूर्ण पाणी दूषित झाले आहे. औद्योगिक क्षेत्रातील काळ नदी, तसेच टेमघर नाला या ठिकाणाहून येणारे पाणी या जॅकवेलमध्ये येत असते. टेमघर नाला दूषित झाल्याने या जॅकवेलमधील पाणी दूषित झाले आहे.

कारखान्यांनी सोडलेल्या दूषित पाण्यामुळे हा प्रकार घडल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे लाखो लीटर पाणी प्रदूषित झाले असल्याने एमआयडीसीकडून त्वरित पाणी पुरवठा खंडित करण्यात आला आहे. एमआयडीसीमधील काही गावे, तसेच शहराचा नवे नगर परिसरातील भाग, याशिवाय सव, मुठवली, गोठे, दादली, शिरगाव, किंजळकर, चोचिंदे, कोंडीवते, राजेवाडी, वडवली, नडगाव, बिरवाडी, कांबळे आदी गावांचा पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना पाणी-पाणी करण्याची वेळ आली आहे. नगर पालिकेने शहरातील काही भागांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केला आहे. परंतु इतर ग्रामपंचायती आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये मात्र पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.

काही कारखानदारांनी आपले उत्पादन बंद करणे अशक्य आणि धोकादायक असल्याने पाणी पुरवठा सुरू ठेवावा, अशी विनंती केल्यामुळे एमआयडीसीने हे पाणी पिण्यासाठी वापरू नये, केवळ आपल्या जबाबदारीवर उत्पादनासाठी वापरावे, अशी सूचना केली आहे. वापरासाठी पाणी पुरवठा दिला जात आहे, परंतु इतर नागरिकांना मात्र पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

दरम्यान, पावसाळ्यात पाणी दूषित होणे हे नित्याचेच आहे. मात्र पावसाळ्यानंतर अशी स्थिती गेल्या तीन महिन्यांत अनेक वेळा झाली आहे. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळ ठोस भूमिका आणि शोध मोहीम राबवत नसल्याने पाणी सोडणार्‍यांना रान मोकळे झाले आहे. याचा फटका मात्र सर्वसामान्यांसह औद्योगिक क्षेत्रातील नागरिकांना होत आहे. कारखान्यांनी सांडपाणी सोडले असेल तर ठोस कारवाई होणे गरजेचे आहे. सांडपाण्यामुळे परिसरातील १८ गावांचा पाणी पुरवठा ठप्प आहे. यामुळे एमआयडीसीने तात्काळ याचे नियोजन करून गावांना पाणीपुरवठा केला पाहिजे, असे मत काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस धनंजय देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केले. जर प्रदूषण थांबले नाही तर पक्ष आंदोलन करेल, असा इशारा देखील दिला. यावेळी त्यांच्या समवेत तालुकाध्यक्ष राजेंद्र कोर्पे, जगदिश पवार हे उपस्थित होते.

एमआयडीसीतील प्रदूषित पाण्याचे नमुने घेण्यात आले आहेत. या ठिकाणी पाणी कोणत्या ठिकाणाहून मिसळले गेले असेल याचा तपास देखील घेतला जात आहे.

-जयदीप कुंभार, क्षेत्र अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाड

 

                                                                                                 वार्ताहर : निलेश पवार


हे ही वाचा : रायगड जिल्ह्यात १०५९ कुपोषित बालके