Eco friendly bappa Competition
घर संपादकीय ओपेड वसईच्या किनारपट्टीवर धडकताहेत अनाचाराच्या लाटा!

वसईच्या किनारपट्टीवर धडकताहेत अनाचाराच्या लाटा!

Subscribe

वसईच्या किनारपट्टीवर काही अपवाद वगळता सरकारी जागांवर अतिक्रमण करून फोफावलेल्या रिसॉर्ट, लॉजेसमुळे अनेक गावांतील सामाजिक स्वास्थ धोक्यात येऊ लागले आहे. स्थानिक, भूमिपुत्रांच्या रोजीरोटीचे कारण पुढे करत काही मूठभर व्यक्तींनी, त्यातही बड्या राजकीय नेत्यांनी आपल्या बेकायदा, अनैतिक धंद्यांना वाचवण्याचे सुरू केलेले प्रयत्न गावकर्‍यांसाठी डोकेदुखी ठरणार आहे.

मुंबईच्या वेशीवर असलेल्या वसई तालुक्याला सुंदर समुद्रकिनारा लाभलेला आहे. अर्नाळा आणि वसई किल्ला यासह विविध पर्यटनस्थळांमुळे एकदिवसीय सहलीसाठी वसईला पसंती मिळाली. बघता-बघता पर्यटकांची रिघ लागली. मग, हळूहळू रिसॉर्ट, लॉजेस, हॉटेल व्यवसायाला बरकत आली. काही मूठभर व्यावसायिक बुद्धीच्या लोकांनी या व्यवसायात उडी घेतली. अर्नाळा, नवापूर, वटार, कळंब, भुईगाव या गावांमध्ये रिसॉर्टचे पीक आले. पर्यटकांना आकृष्ट करण्यासाठी मग वॉटर पार्क निर्माण झाले. दारूशिवाय रिसॉर्टमध्ये मज्जाच येत नसल्याची पर्यटकांची हौस ओळखून रिसॉर्टमध्ये बेकायदा दारूविक्रीचा धंदा राजरोसपणे सुरू झाला. काही सन्माननीय अपवाद वगळता रिसॉर्ट आणि लॉजेसमध्ये अनैतिक धंद्यांनी शिरकाव केला. यातून दररोज बक्कळ पैसा हाती पडू लागल्याने मग गावागावात लहान-सहान रिसॉर्ट, लॉजेस आणि हॉटेल्स उभी राहिली आणि गेल्या 10 वर्षांत रिसॉर्ट, लॉजेस, हॉटेल्सनी वसईची किनारपट्टी व्यापून टाकली.

काही मूठभर गावकर्‍यांचा रोजीरोटीचा प्रश्न निकाली निघाला, पण गावागावातील सामाजिक स्वास्थ बिघडवणार्‍या घटना आता घडू लागल्या आहेत. काही अपवाद वगळता वसई तालुक्यातील 90 टक्के रिसॉर्ट, लॉजेस, हॉटेल्स बेकायदा आहेत. कोणत्याही परवानगीविना त्याठिकाणी सर्वप्रकारचे धंदे राजरोसपणे सुरू आहेत. वसईच्या किनारपट्टीवरील शेकडो एकर सरकारी जागांवर अतिक्रमण करून बेकायदा रिसॉर्ट, हॉटेल्स, लॉजेस बिनदिक्कतपणे अनैतिक धंदे करत आहेत. सरकारने कसायला दिलेल्या सरकारी जमिनींवर काही गावकर्‍यांनी थेट बेकायदा रिसॉर्ट, लॉजेस, हॉटेल्स सुरू करून सरकारची फसवणूक करण्याचे काम केले आहे. त्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना पोलीस, महसूल, महापालिका, महावितरण, राज्य उत्पादन शुल्क विभागाचा छुपा पाठिंबा मिळत आहे. भाजपच्या एका बड्या नेत्याने तर थेट समुद्रातच गोवा टाईप रेस्टॉरंट उघडले असून त्याठिकाणी खुलेआम दारूविक्री होत आहे. मध्यंतरी राज्य उत्पादन विभागाच्या पथकाने त्याच्या बेकायदा रेस्टॉरंटमध्ये टाकलेल्या धाडीत गोवा बनावटीची हजारो रुपयांची दारू आढळून आली होती, पण कारवाईनंतरही त्याचा धंदा तसाच सुरू आहे.

- Advertisement -

भाजपच्या वरिष्ठांशी अगदी घनिष्ट संबंध असल्याने या नेत्याच्या रिसॉर्ट आणि रेस्टॉरंटवर कारवाई करण्याचे धाडस पोलीस, राज्य उत्पादन शुल्क किंवा संबंधित सरकारी विभाग दाखवत नाहीत. उलट त्या नेत्याच्या इशार्‍यावर इतरांच्या रिसॉर्टवर अधूनमधून कारवाई करणारे राज्य उत्पादन शुल्क खाते वशिलेबाजांना मात्र पाठीशी घालत असल्याने इतर रिसॉर्टचालकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा, हा हेतू जरी योग्य असला तरी त्यामुळे अनाचार फोफावणे योग्य नाही. कारण तोच उद्या स्थानिकांना त्रासदायक ठरू शकतो.

गेल्या दीड महिन्यांपूर्वी कळंबमधील एका बेकायदा रिसॉर्टमध्ये वर्षभरापासून चक्क बेकायदा कॉल सेंटर सुरू असल्याचे पोलीस कारवाईत उजेडात आले होते. खरेतर या कॉल सेंटरची माहिती एका पोलीस अधिकार्‍याला होती. त्यातून मलिदा मिळत असल्याने तो अधिकारी त्याकडे कानाडोळा करत होता, असे माहीतगार सांगतात. वरिष्ठांकडून बोगस कॉल सेंटरवर कारवाई होणार असल्याची कुणकुण लागताच त्या अधिकार्‍याने प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून पुढाकार घेत धाड टाकून बेकायदा कॉल सेंटर उद्ध्वस्त केल्याचे नाटक अगदी व्यवस्थित पार पाडले. या कॉल सेंटरमध्ये परराज्यातील 49 तरुण-तरुणी काम करत होते. या कॉल सेंटरमधून ऑस्ट्रेलियन बँकेची फसवणूक केली जात होती. ऑस्ट्रेलियाच्या ‘पे पाल’ या बँकेच्या ग्राहकांचे पैसे परस्पर वळवून त्यांची आर्थिक फसवणूक केली जात होती. बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केलेले मुख्य आरोपी मात्र अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.

- Advertisement -

शनिवारी, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी अर्नाळा ते कळंबपर्यंतची रिसॉर्ट, लॉजेस पर्यटकांनी गजबजलेली असतात. बहुतेक रिसॉर्टमध्ये पर्यटकांना खुलेआम दारू पिण्याची सोय केली जाते. त्यामुळे अनेक अपघात होत असतात. हाणामार्‍याही होतात, पण प्रकरण चार भिंतीच्या आतच दडपून टाकण्याचे काम केले जात असते. रिसॉर्टमध्ये सुरक्षिततेची कोणतीही काळजी घेतली जात नाही. लाईफ गार्डचीही व्यवस्था नसते. त्यामुळे रिसॉर्टमधील स्विमिंग पूलमध्ये बुडून दर महिन्याला एखाद-दुसर्‍या पर्यटकाचा मृत्यू होण्याची घटना घडतच असते, पण पोलीस प्रशासन रिसॉर्टचालकांवर कडक कारवाई करत नसल्याने तेही अशा घटना फारशा गंभीरपणे घेत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.

अनैतिक धंदेही सध्या वाढीस लागल्याने अनेक प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे. काही अपवाद वगळता बहुतांश रिसॉर्ट, लॉजेसमध्ये अनैतिक धंदे सुरू असलेले पहावयास मिळतात. मुंबई आणि परिसरातून मुली आणून अनैतिक धंद्यासाठी त्यांचा वापर करण्याचा प्रकार वाढीस लागला आहे. त्यातूनच या परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा वावरही वाढताना दिसत आहे. लॉजेसमध्ये सर्व नियमांना फाटा देऊन अगदी कमी पैशात रूम दिल्या जात असल्याने अगदी शाळकरी मुले-मुलीही शाळा-कॉलेज बुडवून याठिकाणी येत असतात. अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही रिसॉर्ट, लॉजेस येतात. अर्नाळा पोलीस ठाण्यात 6 महिन्यांत दाखल असलेले सर्वाधिक गुन्हे हे बलात्काराचे आहेत. तेही एखाद्या लॉजेसमध्ये घडलेले असल्याचे पीडितेच्या तक्रारीवरून सहज लक्षात येते. यातून अनेक गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याकडे लॉजेस मालक किंवा पोलीस प्रशासन गंभीरपणे पहात नाहीत.

सर्व सोयीसुविधा अगदी सहजपणे उपलब्ध होत असल्याने दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात आंबटशौकीन पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. शनिवारी व रविवारी होणारी पर्यटकांची प्रचंड गर्दी यामुळे जवळपासचे मुख्य रस्ते व गावपाड्यातील रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या उग्र बनत असते. त्यामुळे स्थानिक नागरिकांना घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. केवळ दिखाऊ व वरचेवर कारवाई करणारे राज्य उत्पादन शुल्क विभागामुळे स्वस्त व बनावट दारूची विक्री राजरोसपणे होत आहे. अतिमद्यप्राशन केलेले पर्यटक रस्त्यावर बेफिकीरपणे वाहने चालवतात. त्यामुळे अपघात होऊन नाहक सर्वसामान्य नागरिकांवर अपघाताची नामुष्की ओढवते. दुचाकीवर तीन-चार जण बसत असतात. रिक्षा, टमटम व फोर व्हीलर, बसेसमध्ये प्रमाणाबाहेर पर्यटक कोंबून भरले जातात. यावर वाहतूक पोलिसांकडून कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही.

शेकडो एकर सरकारी जागा अतिक्रमण करून बेकायदा बांधकामे केली गेली आहेत. सरकारी जागांवर अतिक्रमण झाले असतानाच सरकारी यंत्रणेचा भाग असलेले विभाग घरपट्टी आकारत आहेत. महावितरण अशा बेकायदा धंद्यांना वीज पुरवठा करत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग तर जास्तीच मेहेरबान आहे. त्यामुळे सरकारचा महसूल बुडत आहे. सरकारी जागांवरील अतिक्रमण करून त्या ताब्यात घेण्याचे कोर्टाचे निर्देश असताना महसूल विभाग कोणतीच कारवाई करत नाही. म्हणूनच की काय आता तर थेट समुद्रातच ढाबे उघडून खुलेआम बेकायदा धंदे उघडून बिनधास्तपणे दारू विकण्याचेही काम सुरू झाले आहे. 2 दिवसांपूर्वी एका तक्रारदाराने केलेल्या पाठपुराव्यामुळे महसूल विभागाला नाईलाजाने 4 रिसॉर्टवर कारवाई करणे भाग पडले, पण तीही दिखाऊ कारवाई ठरली. अनैतिक धंद्यांना ऊत आला असताना पोलीस प्रशासन कठोर कारवाई करताना दिसत नाही. सरकारी यंत्रणा कारवाई करत नाहीत, याचा अर्थ त्यांचे आर्थिक लागेबांधे आहेत, हे सहजपणे लक्षात आल्याशिवाय रहात नाही. या धंद्यात काही मूठभर व्यक्ती गुंतल्या आहेत. गावकर्‍यांच्या आडून ही मंडळी भूमिपुत्रांच्या व्यवसायावर संकट येत असून त्यांची रोजीरोटी हिसकावली जात असल्याची आवई उठवून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. एखादी कारवाई सुरू झाली की शेकडो लोक रस्त्यावर उतरवून ती रोखण्याचेही काम केले जाते.

मुंबईवर अतिरेकी हल्ला झाला त्यावेळी अतिरेकी बोटीने समुद्रामार्गे मुंबईत दाखल झाले होते. मुंबईला जाताना त्यांच्या वाटेत वसईचाही भाग आला होता. सध्याची परिस्थिती पाहता येथील रिसॉर्ट, हॉटेल्स, लॉजेसमध्ये अतिरेकी आणि गुन्हेगारी प्रवृत्तींच्या लोकांना सहजपणे आसरा घेणे अगदीच सहजसोपे आहे. याचे भान सरकारी यंत्रणांना ठेवण्याची गरज आहे. अनैतिक धंद्यांमुळे गावातील तरुण-तरुणींवर विपरित परिणाम होतील, याचे भान बेकायदा लॉजेस उघडून अशा धंद्यांना खतपाणी घालणार्‍यांनी ठेवण्याची गरज आहे. स्थानिकांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी व्यवसाय केला पाहिजे, यावर कुणाचेही दुमत असण्याचे कारण नाही, पण व्यवसायाच्या आडून अनैतिक धंदे करत असताना त्याचे होणारे दुष्परिणाम आपल्या गावातील सामाजिक स्वास्थ बिघडवण्यास कारणीभूत ठरू नयेत, याची काळजी घेतली पाहिजे. अगदी शंभर टक्के रिसॉर्ट, लॉजचालक अनैतिक धंद्यांमध्ये गुंतले आहेत, अशातला भाग नाही. प्रामाणिकपणे व्यवसाय करणारेही आहेत, पण पैशांच्या लालसेपोटी अनैतिक धंद्यांचा मार्ग निवडणार्‍या काही लोकांमुळे प्रामाणिकपणे व्यवसाय करणारेही बदनाम होत आहेत.

वसईच्या किनारपट्टीवर धडकताहेत अनाचाराच्या लाटा!
Shashi karpehttps://www.mymahanagar.com/author/shashi-karpe/
गेली २५ वर्षे मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पत्रकारिता. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण. वृत्तपत्र क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव.
- Advertisment -