रायगडमध्ये वारे सुसाट, उरणमध्ये अनेक ठिकाणी पूर परिस्थिती

Winds blow in Raigad, flood situation in many places in Uran
रायगडमध्ये वारे सुसाट, उरणमध्ये अनेक ठिकाणी पूर परिस्थिती

रायगड जिल्ह्याला सलग दोन दिवस झोडपून काढल्यानंतर गुरुवारी पावसाचा जोर काहीसा कमी झाला, परंतु जोरदार वारे वाहत होते. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. घरांचेही नुकसान झाले. ३ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. २४ तासांत जिल्ह्यात सरासरी २०९.०५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. १ ऑगस्टपासून आजपर्यंत सरासरी २ हजार ०२२.९८ मिलिमीटर पाऊस पडला. आतापर्यंत वार्षिक पर्जन्यमानाच्या ६२.९० टक्के पाऊस पडला आहे. तसेच उरणमध्ये देखील सोमवारपासून सुरू झालेल्या पावसाने मंगळवारी दुपारी १ वाजल्यापासून वादळी वार्‍यासह सलगपणे बरसायला सुरुवात केल्याने वादळाच्या तडाख्यात जेएनपीटीच्या तीन क्युसी क्रेन कोसळून २०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तर तालुक्यातील अनेक गावांत पूर परिस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यात पाणी साचल्याने वाहतूक वारंवार ठप्प होत असून, अनेक ठिकाणचा वीज पुरवठाही खंडित झाला आहे.

सलग चार दिवस धुवाधार बरसणार्‍या पावसाने गुरुवारी रायगड जिल्ह्यात थोडीशी विश्रांती घेतली. दोन दिवस पडलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. रस्त्यांवरून पाणी वाहत असल्यामुळे काही काळ वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. जिल्ह्यात मागील दोन दिवसांमध्ये ३ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. घरांचे देखील नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. दोन दिवस दक्षिण रायगडात पावसाचा जोर होता. बुधवारी उत्तर रायगडमध्ये पावसाने थैमान घातले. उरणमध्ये सर्वाधिक ३२३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. रोहे येथे ३०४ मिलिमीटर पाऊस पडला. दक्षिण रायगडात देखील पावसाचा जोर होता. गुरुवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत सरासरी २०९.०५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यात अलिबाग १८७ मिलिमीटर, पेण २२०, मुरुड २११, पनवेल २१७, उरण ३२३, कर्जत १०७.६०, खालापूर ९०, माणगाव २२२, रोहे ३०४, सुधागड २११, तळे २३७, महाड १८१, पोलादपूर १८२, म्हसळे २००, श्रीवर्धन २३८ आणि माथेरान २१४.२० मिलिमीटरचा समावेश आहे.

दरम्यान जुलै महिना यथातथाच गेल्यानंतर उरणमध्ये पावसाने पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारली आहे. पावसासोबत वेगात वारेही वाहत असल्याने झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. घरांवरील पत्रे, कौले उडण्याबरोबर काही ठिकाणी घरांचीही पडझड झाली आहे. पुराचे पाणी घरात शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वादळाच्या तडाख्याने देशाच्या आयात-निर्यातीत महत्त्वाच्या असलेल्या जेएनपीटच्या तीन क्युसी क्रेन समुद्रात कोसळल्याची घटना घडली. वीज पुरवठा खंडित झाल्याने काही गावे दोन दिवस अंधारात आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी ज्या आपत्कालीन यंत्रणेचा वारंवार उल्लेख होतो त्या यंत्रणेच्या तथाकथित कार्यक्षमतेचा बुडबुडा पुन्हा एकदा फुटला आहे. संकटात सापडलेल्या रहिवाशांना धीर देण्यासाठी किंवा मदतीचा हात पुढे करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी, कर्मचारी फिरकले नसल्याने संतापाची भावना निर्माण झाली आहे. चिरनेर, केळवणे, कोप्रोली, विंधणेसह इतर अनेक गाव परिसरातील भातशेती पाण्याखाली गेली आहे. तालुक्यातील जनतेला प्रकल्पांना पाणी पुरवठा करणार्‍या रानसई धरण परिसरात पडणार्‍या मुसळधार पावसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून, धरणाच्या सुरक्षिततेसाठी दरवाजे उघडल्याने दिघोडे, विंधणे ग्रामपंचायत हद्दीतील रहदारीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले. चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम आहे.


हेही वाचा – पावसाचा जोर नसल्याने भातसा धरणातील पाणीसाठा निम्यावरच!