अधिवेशन १४, १५ डिसेंबरला मुंबईत, सरकार पळ काढतेय – फडणवीस

Devendra Fadnavis tour nashik

मुंबईत होणारे हिवाळी अधिवेशन देशातील कोरोना संसर्गाची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन एक आठवडा पुढे ढकलण्याचा निर्णय कामकाज सल्लागार समितीने घेतला आहे. आता हे अधिवेशन १४ आणि १५ डिसेंबरला घेतले जाणार आहे. दरम्यान, केवळ दोन दिवसांचे अधिवेशन केल्याबद्दल विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. हे सरकार पळ काढतेय, असे फडणवीस म्हणाले.

विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर ऐवजी मुंबईत घेण्याचा निर्णय कामकाज सल्लागार समितीने गेल्या आठवड्यात संमती दिली होती. आता संसर्गाची देशभर निर्माण झालेली लाट लक्षात घेऊन हे अधिवेशन पुढे ढकलण्याचे संकेत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले होते. काल कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत हिवाळी अधिवेशन मुंबईत १४ आणि १५ तारखेला घेण्याचे निश्चित करण्यात आले.

अधिवेशन काळात संसर्गाचा कोणताही धोका घेता योग्य नाही हे लक्षात घेत अधिवेशनात उपस्थित राहणार्‍यांसाठी १२ आणि १३ तारखेस कोरोनाची रॅपिड टेस्ट घेतली जाणार आहे.

दोन दिवसांचे अधिवेशन मान्य नाही
14 आणि 15 तारखेला होणारे दोन दिवसीय अधिवेशन मान्य नाही, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

दोन दिवसांचे अधिवेशन होत आहे, आमचा आग्रह होता की महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत. शेतकरी अडचणीत आहेत, कापूस, सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. ओबीसींमध्ये भीतीचे वातावरण आहे. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाकडून राज्य सरकारला खडे बोल सुनावले जात आहेत. विधान भवन हे महत्त्वाचे स्थान असताना दोन दिवसांचे अधिवेशन म्हणजे पळ काढणे एवढाच विषय असल्याची घणाघाती टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.