घरताज्या घडामोडीपाली-खोपोली मार्गावरील पुलांचे काम रखडले ; वाहतूकीचा खोळंबा कायम

पाली-खोपोली मार्गावरील पुलांचे काम रखडले ; वाहतूकीचा खोळंबा कायम

Subscribe

प्रवासी आणि वाहन चालकांची खूप गैरसोय होत आहे.

वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गाच्या रूंदीकरणाचे काम तब्बल ५ वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे. या मार्गावरील पालीसह भालगुल आणि जांभुळपाडा येथील अंबा नदीवरील नवीन पुलांचे कामही रखडले आहे. परिणामी जुन्या धोकादायक पुलांवरून सध्या वाहतूक सुरू आहे. याशिवाय पावसाळ्यात पुलांवरून पाणी गेल्याने वाहतूक देखील खोळंबत आहे. त्यामुळे प्रवासी आणि वाहन चालकांची खूप गैरसोय होत आहे. या ठिकाणी तब्बल २५ कोटींच्या निधीतून अधिक क्षमता, रूंदी आणि उंचीचे पूल तयार होत आहेत. या तिन्ही ठिकाणचे एका बाजूचे पूल जून महिन्यात पूर्ण होऊन तेथून वाहतूक सुरू होणे अपेक्षित होते. मात्र कामगार उपलब्ध नसणे, ठेकेदाराचे दुर्लक्ष अशा अनेक कारणांमुळे पुलांचे काम ८ महिन्यांपासून जैसे थे आहे.

धोकादायक आणि असुरक्षित

पाली, जांभुळपाडा आणि भालगुल येथील पुलांची केवळ १९ टन वजन पेलण्याची क्षमता आहे. मात्र या पुलांवरुन ६० टनांची वाहतूक होत आहे. त्यामुळे हे पूल दिवसेंदिवस कमकूवत आणि धोकादायक होत आहेत. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील पावसाळ्यात पाली आणि जांभुळपाडा पुलावरून पाणी गेले. यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली. तसेच पुलावरील सिमेंटचे आणि लोखंडी संरक्षक कठडे (रेलिंग) वाहून गेले आहेत. खड्डे पडले आहेत. याबरोबरच क्षमतेपेक्षा अधिक वजनाची वाहने जाणे, पुलावरील खड्डे यामुळे हे तीनही पूल वाहतुकीसाठी असुरक्षित झाले आहेत. नवीन पुलामुळे येथून प्रवास करणे सुरक्षित आणि सुलभ होणार आहे. मात्र हे काम रेंगाळले असल्याने प्रवासी, वाहनचालक संतप्त झाले आहेत.

- Advertisement -

महत्त्वाचा मार्ग

वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्ग पुणे-मुंबई येथून खोपोलीमार्गे कोकणाकडे जाण्यासाठी वाहतूक आणि प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. हा मार्ग मुंबई-गोवा महामार्गाला पर्याय मानला जातो. तसेच मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि मुंबई-गोवा महामार्गाला जोडतो. त्याचबरोबर येथून विळे मार्गे पुणे आणि माणगावलाही जाता येते. त्यामुळे मुंबई, पुणे, तसेच कोकणासाठी हा मार्ग महत्त्वाचा आहे. परिणामी हे तीनही पूल लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे.

असे आहेत नवीन पूल

पालीच्या अंबा नदीवरील नवीन पुलाची उंची १६ मीटर असणार आहे. तर लांबी ११० मीटर, तसेच जांभुळपाडा पुलाची उंची १६ मीटर, लांबी ७० मीटर इतकी आहे. भालगूल पुलाची उंची देखील १६ मीटर, तर लांबी ५५ मीटर असणार आहे. हे सर्व पूल ४ मार्गिकेचे होणार आहेत.

- Advertisement -

तीनही पूल कमकुवत होऊन वाहतुकीसाठी असुरक्षित झाले आहेत. पावसाळ्यात तर पुलांवरून पाणी गेल्यामुळे प्रवासी आणि विद्यार्थ्यांची खूप गैरसोय होत आहे. त्यामुळे वेळीच नवीन पुलाची निर्मिती होणे गरजेचे होते. हे नवीन होणारे पूल दर्जेदार आणि लवकर पूर्ण झाले पाहिजेत अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष जन आंदोलन करेल.
– काशीनाथ ठाकूर, सरचिटणीस, प्रहार जनशक्ती पक्ष, रायगड

पुलांचे काम गेल्या काही महिन्यांपासून थांबले आहे. याबद्दल संबंधित ठेकेदाराला नोटीस देखील बजाविण्यात आली आहे. सध्या पावसाळा असल्याने काम बंद आहे. १५ ऑक्टोबरपासून पुलांच्या कामास सुरुवात होईल. तीन महिन्यात पुलांची एक बाजू पूर्ण होईल. तेथून वाहतूक सुरू करून त्यानंतर जुने पूल पाडून त्या जागी पुलाच्या दुसर्‍या बाजूचे काम सुरू करण्यात येईल.
-रमेश खिस्ते, कार्यकारी अभियंता, एमएसआरडीसी


हे ही वाचा – धार्मिक स्थळांसाठी ५० टक्के क्षमतेची मर्यादा, मुंबई पालिकेची नवी नियमावली


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -