घरक्राइममुलुंड: मोटारीत घुसून तरुणीला शस्त्राचा धाक दाखवून पळवली सोनसाखळी

मुलुंड: मोटारीत घुसून तरुणीला शस्त्राचा धाक दाखवून पळवली सोनसाखळी

Subscribe
मुलुंड पूर्व द्रुतगती महामार्गावर मित्राची वाट पाहत मोटारीत बसलेल्या तरुणीवर सोनसाखळी चोराने शस्त्राने हल्ला करून सोनसाखळी खेचून पोबारा केल्याची धक्कादायक घटना बुधवारी उघडकीस आली आहे. या हल्ल्यात जखमी झालेली तरुणी ही फॅशन डिझायनर असून सायन चुनाभट्टी परिसरात राहण्यास आहे. काही आठवड्यापूर्वीच मुलुंड पूर्वेत वृद्धावर हल्ले करून सोनसाखळी चोरीच्या दोन घटना घडल्या आहेत. मुलुंड पूर्वेत वाढत्या सोनसाखळी चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 
 
सायन चुनाभट्टी येथे राहणारी २४ वर्षांची फॅशन डिझायनर असणारी तरुणी बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मुलुंड पूर्व द्रुतगती महामार्ग येथील सरदार तारासिंग तलाव या ठिकाणी मित्राची वाट पाहत एकटीच आपल्या कारमध्ये बसली होती. कारचे दरवाजे अनलॉक असल्याचे फायदा घेत सोनसाखळी चोराने कारमध्ये प्रवेश करून या तरुणीच्या गळयावर चाकूचे पाते लावत तरुणीचा मोबाईल, पर्स आणि गळ्यातील सोनसाखळी काढून दे अशी धमकी दिली. 
 
अचानक झालेल्या या प्रसंगामुळे घाबरलेल्या तरुणीने आरडाओरड करताच या सोनसाखळी चोराने तिच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र या तरुणीने विरोध करण्यासाठी हात पुढे करताच तिच्या डाव्या हाताच्या एका बोट जखमी झाले. या चोराणे या तरुणीच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून कारमधून बाहेर धाव घेऊन झाडाझुडुपातुन पळ काढला. याप्रकरणी या तरुणीने मित्रांसोबत नवघर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. नवघर पोलिसांनी याप्रकरणी अनोळखी सोनसाखळी चोरांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. 
 
काही आठवड्यापूर्वी एकाच दिवशी नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी चोरीच्या दोन घटना घडल्या होत्या. या दोन्ही घटनेत सोनसाखळी चोरांनी वयोवृद्धावर हल्ला करून सोनसाखळी खेचून पोबारा केला होता या दोन्ही घटनेचे सीसीटीव्ही मुलुंड पूर्वेत व्हायरल झाले असून लागोपाठ तिसरी घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या घटनेची माहिती देण्यास नकार दिला असून तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. 
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -