एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निकाली निघणार; भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची माहिती

नेहमी उशिराने होणाऱ्या पगारामुळे मेटाकुटीला आलेल्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने मंगळवारी मोठा दिलासा दिला. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी जेवढ्या रकमेची तूट आहे, ती रक्कम यापुढे राज्य सरकार दर महिन्याच्या पाच तारखेला देईल. म्हणजेच महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा पगार ७ तारखेला होईल.

issue of salary of ST employees will be settled; Information of Gopichand Padalkar

नेहमी उशिराने होणाऱ्या पगारामुळे मेटाकुटीला आलेल्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने मंगळवारी मोठा दिलासा दिला. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी जेवढ्या रकमेची तूट आहे, ती रक्कम यापुढे राज्य सरकार दर महिन्याच्या पाच तारखेला देईल. म्हणजेच महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा पगार ७ तारखेला होईल, असे आश्वासन राज्य सरकाने दिल्याची माहिती भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधानभवनात दिली. या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या नियमित वेतनाचा प्रश्न निकाली निघणार आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात आज विधानभवनातील मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सदाभाऊ खोत, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, परिवहन विभागाचे सचिव, कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. एसटी गाड्यांचा तुटवडा पाहता एसटीच्या ताफ्यात नवीन बसेस घेण्यासंदर्भात निर्णय झाला आहे, असेही त्यांनी सांगितले.

या बैठकीतील चर्चेची माहिती पडळकर यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना दिली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांनाही वेतन मिळायला हवे, अशी मागणी करण्यात आली. त्यासंदर्भात राज्य सरकारवर आर्थिक किती भार पडेल याची माहिती देण्याचे निर्देश एसटीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले असून यासंदर्भात पुन्हा बैठक घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे पडळकर यांनी सांगितले.

कोरोनाकाळात एसटीची परिस्थिती फारच बिकट झाली होती. सध्या एसटीतून दररोज ५० ते ५२ लाख प्रवासी प्रवास करतात. पूर्वी ही संख्या ६५ लाखांपर्यत होती. मात्र, येत्या दोन-तीन महिन्यांत एसटी रूळावर येईल, असा आशावाद एसटीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी व्यक्त केला आहे, असे सांगतानाच एसटीच्या आगाराची प्रचंड दुरावस्था आहे. प्रवासी तसेच कर्मचाऱ्यांसाठी सुविधा नाहीत. त्यामुळे आगारात चांगल्या सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी एसटीच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत, असेही पडळकर यांनी सांगितले.

३८ हजार ईटीआयएम मशिन्स मिळणार
एसटीच्या ताफ्यात ईटीआयएम मशीन्सचा तुटवडा आहे. अनेक मशिन्समध्ये बिघाड झालेला आहे. अशावेळी त्यामध्ये काही दोष निर्माण झाला तर वाहकावर कारवाई केली जाते. त्यामुळे राज्यातील आगारांना ३८ हजार नवीन ईटीआयएम मशीन्स देण्याच्या सूचना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आजच्या बैठकीत केल्याचे पडळकर यांनी सांगितले. येत्या तीन महिन्यांत या मशिन्स मिळणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.


हेही वाचा – जितेंद्र आव्हाडांच्या जामीन अर्जावरील युक्तिवाद पूर्ण; ३ मार्चपर्यंत निकाल ठेवला राखून