जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावरून विधान परिषदेत सदस्य आक्रमक; विरोधकांकडून सभात्याग

राज्यातील १८ लक्ष कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावरून अनिश्चित काळासाठी संप पुकारलेला असताना हाच मुद्दा विरोधकांकडून विधानपरिषदेत उपस्थित करण्यात आला. ज्यानंतर सभागृहात झालेल्या गदारोळामुळे विरोधकांकडून आज दिवसभरासाठी कामकाजावर बहिष्कार टाकण्यात आला आहे.

Members are aggressive in Legislative Council over the issue of old pension

जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावरून राज्यातील सरकारी कर्मचारी हे आजपासून बेमुदत संपावर गेले आहे. राज्यातील तब्बल १८ लाख सरकारी कर्मचारी यांनी बेमुदत संप पुकारला आहे. या संपामुळे राज्यातील अनेक महत्वाची कामकाज ठप्प पडण्याची शक्यता आहे. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या या जुन्या पेन्शनचा मुद्दा आज विरोधकांकडून विधानपरिषदेत उपस्थित करण्यात आला. पण यावर राज्य सरकारकडून कोणतीच भूमिका मांडण्यात येत नसल्याने विरोधकांनी सभागृहात गदारोळ घातला. त्यानंतर विरोधकांकडून आजच्या दिवसभराच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.

आजच्या विधानपरिषदेच्या कामकाजावर बहिष्कार टाकत विरोधकांनी सभात्याग केला. यानंतर विरोधकांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. प्रसार माध्यमांशी बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, “हे राज्य सरकार अत्यंत असंवेदशील आहे. सरकारने खरं तर या संपकरी कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधने हे गरजेचे होते. एकदा बोलून किंवा याबाबत बैठक घेऊन काहीही होत नाही. सरकारने सर्व गोष्टींची तपासणी करून जुन्या पेन्शनबाबत सकारात्मक भूमिका घेणे हे गरजेचे आहे, परंतु सरकारकडून असे करण्यात आलेले नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सर्व सदस्यांनी कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.”

सरकारी कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे राज्याचा संपूर्ण करभार हा ठप्प झालेला आहे. याची राज्य सरकारने गंभीर दाखल घेणे गरजेचे होते. जुन्या पेन्शन बाबतची भूमिका राज्य सरकारने स्पष्ट करावी, याबाबत मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांनी सभागृहात येऊन आपले मत मांडावे. पण असे करण्यात आले नाही. सातत्याने आम्ही याबाबत प्रश्न उपस्थित केल्याने आज दोनवेळा कामकाज स्थगित करण्यात आले. पण याबाबतची कोणतीही दखल न घेता कामकाज सुरु ठेवण्याचा अट्टहास या सरकारने केला. त्याचा निषेध करून आज दिवसभरासाठी कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांच्याकडून प्रसार माध्यमांना देण्यात आली.

दरम्यान, या मुद्द्यावरून विधानपरिषदेतील सभागृहात विरोधकांनी सुरुवातील गोंधळ घातला. ज्यामुळे उपसभापतील नीलम गोऱ्हे यांनी सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला. १० मिनिटानंतर कामकाज पुन्हा सुरु झाल्यानंतर विरोधकांनी पुन्हा एकदा जुन्या पेन्शनचा मुद्दा उपस्थित केला. सरकारने सोमवारी जुन्या पेन्शनच्या संदर्भात बैठक घेतली. पण या बैठकीमध्ये कोणताही निर्णय घेण्यात आला नाही, त्यामुळे सरकारने याबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी, असे वारंवार विरोधकांकडून राज्य सरकारला सांगण्यात येत आहे.


हेही वाचा – जुन्या पेन्शनवरून अजित पवार सभागृहात काय म्हणाले? पाहा