मुंबईच्या नालेसफाईला मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात, सरकारची विधानसभेत माहिती

eknath shinde

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नालेसफाईच्या कामांकरिता निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, ही कामे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडयात सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. त्यानुसार पावसाळ्यापूर्वीची सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे नियोजित आहे, असे मुंबई महानगरपालिकेने कळविले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.

मुंबईतील नालेसफाईच्या कामांच्या निविदांना विलंब झाल्याकडे लक्ष वेधत भाजपा आमदार आशिष शेलार, पराग अळवणी, तमिल सेलवन यांनी विधानसभेत प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचे लेखी उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मुंबईतील नालेसफाईची कामे नियमितपणे पावसाळ्यापूर्वी करण्यात येतात. तथापि, नाल्याचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक असलेली नालेसफाईची किरकोळ स्वरुपाची कामे पावसाळ्यात करण्यात येतात.

बृहन्मुंबईतील शहर, पूर्व व पश्चिम विभागातील मोठे व छोटे नाले तसेच पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्गावरील विविध छोटे-मोठे नाले, पेटीका नाले तसेच रस्त्यालगतच्या पर्जन्य जलवाहिन्या व मिठी नदीमधील गाळ काढण्याच्या कामांकरिता मुंबई महानगरपालिकेमार्फत एकूण 31 निविदा मागविण्यात आल्या असून, या निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहेत. ही कामे मार्च 2023च्या पहिल्या आठवडयात सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. त्यानुसार पावसाळ्यापूर्वी करावयाची कामे वेळेत पूर्ण करण्याचे नियोजित आहे, असे मुंबई महानगरपालिकेने कळविले आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.

मुख्यमंत्र्यांचा अजित पवारांना शाब्दिक चिमटा
शेती, उत्पादन, नुकसानभरपाईच्या मुद्द्यांवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं आहे. यावरूनच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भर सभागृहात अजित पवारांना टोला लगावत हे सरकार दोन्ही हाताने देणारे सरकार आहे, घेणारे नाही. तसंच, आम्ही फक्त बोलत नाही तर देतोही, असे म्हणत त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना चिमटा काढला.

अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान, नियमित कर्जफेड करणाऱ्यांना प्रोत्साहन लाभ आणि इतर नुकसान भरपाईपोटी मिळणारी रक्कम अद्यापही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. यावरुन विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज, मंगळवारी लक्षवेधी मांडली. तसेच, ही सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार याची तारीख जाहीर करावी, अशी विनंतीही अजित पवारांनी केली होती. 31 मार्चपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात सर्व रक्कम जमा होईल, असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.