‘मी फक्त सभागृहापुरतीच उपसभापती का?’ म्हणत नीलम गोऱ्हेंनी विधान परिषदेत व्यक्त केली नाराजी

विधान परिषदेच्या सभागृहात आज (ता. १६ मार्च) उपसभापतींच्या अधिककारांवरून प्रश्न उपस्थित करण्यात आले. यावेळी सभागृहाच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सुद्धा त्यांना कोणत्याही निर्णयांबद्दल विचारण्यात येत नाही, या कारणांमुळे नाराजी व्यक्त केली आहे.

Neelam Gorhe expressed his displeasure in the Legislative Council

विधानपरिषदेच्या सभागृहाला सभापती नसल्याने सध्या या सभागृहाच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना या सभागृहाच्या संदर्भातील सर्व हक्क देण्यात आले आहेत. परंतु तरी देखील विधिमंडळाच्या बऱ्याचशा निर्णयांमधून नीलम गोऱ्हे यांना डावलण्यात येत असल्याने याबाबतचा मुद्दा आज सभागृहात उपस्थित करण्यात आला. तर याबाबत स्वतः नीलम गोऱ्हे यांनी सुद्धा नाराजी व्यक्त करत माझं उपसभापती हे पद हे सभागृहापुरतेच मर्यादीत आहे का? असा प्रश्न केला.

बुधवारी (ता. १५ मार्च) विधिमंडळाच्या आवारात संगीत रजनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु या कार्यक्रमाबाबत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती. ज्याचा मुद्दा विधान परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांच्याकडून उपस्थित करण्यात आला. यावर आमदार कपिल पाटील यांनी प्रश्न उपस्थित करत सभागृहाला सभापती नसताना उपसभापती यांनाच सर्व हक्क आणि अधिकार आहेत, ज्यामुळे उपसभापती यांना डावलून निर्णय घेणे म्हणजे या सभागृहाचा अवमान करण्यासारखे आहे, असे मत व्यक्त केले.

उपसभापती यांना डावलून विधानसभेच्या अध्यक्षांकडून घेण्यात येणाऱ्या सर्व निर्णयांबाबत स्वतः विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे. विधिमंडळाच्या आवारात घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांबाबत मला कोणतीही कल्पना देण्यात येत नाही. मला सुद्धा हे कार्यक्रमांबद्दल इतर सदस्यांकडून माहिती मिळते, अशी माहिती नीलम गोऱ्हे यांच्याकडून सभागृहात देण्यात आली.

यावेळी सभागृहात बोलताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, आजपर्यंत विधिमंडळाच्या आवारात केवळ चहापान आणि जेवणाचा कार्यक्रम घेण्यात येत होते. परंतु पहिल्यांदाच एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ज्यामुळे मी सुद्धा नव्या पिढीच्या या विचारांना आणि निर्णयांना कोणताही विरोध न करता तो कार्यक्रम होऊ दिला. पण या कार्यक्रमाची कोणतीही कल्पना मला याआधी देण्यात आली नव्हती. तसेच याआधी विधीमंडळाच्या आवारात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. पण त्या कार्यक्रमात कोणते तैलचित्र लावले जाणार याबाबत फक्त विधानसभा अध्यक्षांना माहिती होती. त्यामुळे अध्यक्षांनी बाळासाहेबांच्या तैलचित्रांची कस्टडी घेतली का? असा प्रश्न मला पडला, असे देखील यावेळी उपसभापती गोऱ्हे यांच्याकडून सांगण्यात आले.

हेही वाचा – ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींच्या कुटुंबीयांची एसीबी करणार चौकशी, ‘हे’ आहे कारण 

तर अध्यक्षांकडून उपसभापती आणि विधान परिषदेला मुद्दाम की चुकून डावलण्यात येते, हे स्पष्ट करण्यात यावे, अशी भूमिका विधान परिषदेचे सदस्य शशिकांत शिंदे यांच्याकडून घेण्यात आली. तर अध्यक्षांकडून घेण्यात येणाऱ्या निर्णयांची बैठक घेण्यात यावी. अध्यक्ष घेत असलेले निर्णय हे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येतात आणि अध्यक्षांनी घेतलेले निर्णय कळवायची गरज वाटली नाही, असे उत्तर जर का मिळत असेल तर मी फक्त सभागृहापुरतीच उपसभापती आहे हे मी आता स्वीकारावे असे वाटत असल्याचे नोलां गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, अध्यक्ष राहुल नार्वेकर हे स्वतः सर्व निर्णय घेऊन यामधून विधान परिषदेच्या उपसभापती यांना डावलत असल्याने या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या माध्यमातून अध्यक्ष आणि उपसभापती यांच्यामधील कुरबुर समोर आली आहे.