कांदा दराच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन

कांदा आणि कापसाच्या मुद्द्यावरून अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांकडून गदारोळ करण्यात आला. यावेळी विरोधकांनी घोषणाबाजी करत विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली.

Opposition protest on the steps of the Legislature over the onion tariff issue

गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठांमध्ये कांद्याचे भाव कमालीचे घसरले आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झालेला पाहायला मिळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याला 500 किलो कांदा विकल्यानंतर एका शेतकऱ्याला अवघे दोन रुपये मिळाले होते, असेच काहीसे प्रकार राज्यातील इतर भागांमध्ये घडल्याची देखील माहिती समोर आली आहे. त्यामुळे कांद्याचे उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पाहायला मिळत आहे. याच मुद्द्यावरून विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर गदारोळ केला.

महाविकास आघाडीमध्ये असलेल्या घटक पक्षाच्या नेत्यांनी कांदा आणि लसनाच्या माळा घालून विधानभवनाच्या पायऱ्यांवर उभे राहून जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी विरोधकांकडून सरकारच्याविरोधात पोस्टर देखील दाखवण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ, पृथ्वीराज देशमुख, अनिल देशमुख तसेच विरोधी पक्षातील इतर आमदार सुद्धा यावेळी उपस्थित होते.

कांदा कापूसचे हाल काय, शिंदे फडणवीस हाय हाय’, ‘कांद्याला भाव मिळालाच पाहिजे’, ‘कांदा खरेदी केंद्रे सुरु झालीच पाहिजेत’, अशा घोषणा यावेळी विरोधकांकडून सरकारच्या विरोधात देण्यात आल्या. तर “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही सध्या प्रचारातच मग्न आहेत. या दोघांना सामान्य जनता आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. शिंदे-फडणवीस सरकार सध्या केवळ 40 आमदारांना खुश ठेवण्यात मग्न आहे. जनतेच्या समस्यांकडे त्यांचे साफ दुर्लक्ष झाले आहे,” अशी टीका यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याकडून करण्यात आली.

हेही वाचा – कांद्याच्या दरावरून विधानसभवन परिसरात आंदोलन

दरम्यान, गेल्या काही दिवसांत कांद्याला मिळणारे दर अचानक घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. घाऊक बाजारपेठांमध्ये कांद्याला कवडीमोल दर मिळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे काही ठिकाणी तर शेतकऱ्यांनीच व्यापाऱ्याला पैसे दिले आहे. कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्याने बाजारपेठांमध्ये कांद्याची आवक प्रचंड वाढली आहे. ज्यामुळे कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे. ज्यामुळे आता अर्थसंकल्पीय अधिवेशात विरोधकांनी या मुद्द्याला धरून सरकारवर चांगलीच टीका केली आहे. तर कांद्याच्या दराचा प्रश्न सभागृहात उपस्थित करताच विरोधकांनी सभागृहात सुद्धा गदारोळ केल्याचे पाहायला मिळाले.