संजय राऊतांचे वक्तव्य म्हणजे संपूर्ण विधिमंडळावर केलेला आरोप : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संजय राऊत यांनी विधिमंडळाला चोरमंडळ म्हंटल्यामुळे विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहात एकच गोंधळ पाहायला मिळाला. यामुळे या दोन्ही सभागृहांचे दिवसभराचे कामकाज स्थगित करण्यात आले आहे. विधानपरिषदेत देखील याचे पडसाद उमटले असून याविरोधात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आक्रमक झालेले पाहायला मिळाले.

You stay in BJP or stay anywhere, action will be taken Fadnavis pointing

ठाकरे गटाचे खासदार आणि प्रमुख प्रवक्ते संजय राऊत यांनी कोल्हापूर येथे प्रसार माध्यमांशी बोलताना विधिमंडळाचा चोरमंडळ म्हणून उल्लेख केला, याचे पडसाद आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात पाहायला मिळाले. विधानपरिषदेमध्ये संजय राऊत यांच्या या वक्तव्याविरोधात सत्ताधारी आमदारांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

विधानपरिषदेच्या सभागृहात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संजय राऊत जे बोलले ते मी देखील ऐकले. चोर मंडळात काम करण्यापेक्षा घरी गेलेलं बरे आहे. कशाला या चोर मंडळात काम करायचे? सगळे जण आपापल्या भूमिका मांडत असल्याने कोणी कोणाला राष्ट्रदोही किंवा महाराष्ट्रदोही देखील म्हणू नये. त्यामुळे त्या भूमिकांची आपली एक परिस्थिती असते. सत्तापक्ष, विरोधीपक्ष, आरोप-प्रत्यारोप हे सगळ होत असतं. पण हा सत्तापक्षावर आरोप नाही तर हा पूर्ण विधानमंडळावर आरोप आहे. संपूर्ण विधानमंडळाला चोर म्हणणे हे सहन करण्यासारखे नाही, अशी आक्रमक भूमीका यावेळी फडणवीसांकडून मांडण्यात आली.

ज्या विधानमंडळाची परंपरा ही यशवंतराव चव्हाणांपासून आहे, इतके मोठे नेते या विधानमंडळाने पाहिले आहे. देशातील सर्वोत्तम विधानमंडळ म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. त्यामुळे जर आपण कोणाला विधानमंडळाला चोर म्हणण्याचा अधिकार दिला, तर कोणाचा या विधानमंडळावर विश्वास राहणार नाही, असे मत यावेळी फडणवीसांकडून व्यक्त करण्यात आले.

हेही वाचा – संजय राऊत हक्कभंगप्रकरणी सभागृहात राडा, विधिमंडळाचे दोन्ही सभागृह स्थगित

तसेच, उद्या या विधानमंडळाच्या विरोधात कोणीही काहीही बोलेल त्याविरोधात कारवाई करण्यासाठी हक्कभंग ठेवला आहे. हा प्रश्न विरोधी किंवा सत्ताधाऱ्यांचा नाही. उद्धव ठाकरे देखील चोरमंडळाचे सदस्य आहेत, असे म्हणत फडणवीसांनी विरोधकांची कानउघाडणी केली. राऊत हे साधे नेते नाही. उद्या हजारो संजय राऊत उठून विधानमंडळाचा अपमान करतील, पण आपण निर्णय घ्या. मी सरकार म्हणून काही मागणी करू शकत नाही. माजी आपल्याला विनंती आहे की जो निर्णय घ्यायचा आहे तो घ्या पण मी याबाबत नाराजी व्यक्त करत निषेध करतो, असेही देवेंद्र फडणवीस यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.