अधिवेशनात जनतेचे प्रश्न आक्रमकतेने मांडा, उद्धव ठाकरे यांचा आमदारांना आदेश

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी घेतली आमदारांची बैठक

मुंबई – आगामी विधिमंडळ अधिवेशनात आपल्या मतदारसंघातील प्रश्न आक्रमकपणे मांडा, सरकारवर तुटून पडा, असा आदेश ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी आपल्या गटाच्या आमदारांना दिला. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार व्हिप लागू होणार नाही. तेव्हा व्हिपला न घाबरता प्रश्न मांडा. कायदेशीर लढाईचे मी पाहतो. तुम्ही मतदारसंघाकडे पाहा, असा सल्लाही ठाकरे यांनी दिला.

केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला निकाल, सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली लढाई आणि आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदारांना सतावणारी व्हिप लागू होण्याची भीती या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मातोश्रीवर आपल्या गटाच्या आमदारांची बैठक घेतली. या बैठकीला ठाकरे गटातील सर्व १६ आमदार उपस्थित होते. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदारांना मार्गदर्शन करताना जनतेच्या प्रश्नावर आक्रमक राहण्याची सूचना ठाकरे यांनी केली.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतरही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात एकच शिवसेना असेल, असे विधान केले आहे. त्यामुळे ठाकरे गटातील आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. या आमदारांना विश्वासात घेत उद्धव ठाकरे यांनी ही अस्वस्थता दूर केली. अधिवेशनादरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत काय होणार याचा विचार करू नका. तुम्ही मतदारसंघातील प्रश्न हिरिरीने मांडा. मी कायदेशीर लढाईचे पाहतो. तुम्ही मतदारसंघाकडे लक्ष द्या, असे ठाकरे म्हणाले. त्यावेळी विरोधी गटाने आम्हाला व्हिप बजावला आणि आमची आमदारकी पणाला लागली तरी बेहत्तर, पण आम्ही तुमच्यासोबतच राहू, अशी ग्वाही या आमदारांनी ठाकरे यांना दिली. आम्ही कुणाचाही व्हिप मानणार नाहीत. तुम्ही दिलेला आदेश हाच आमचा व्हिप असेल, असा शब्दही आमदारांनी ठाकरे यांना दिला.

दरम्यान, विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात वेगळा गट म्हणून मान्यता घेण्याबाबत विधानसभा अध्यक्षांकडे मागणी करण्याबाबत कायदेशीर सल्ला घेणार असल्याचे ठाकरे गटाचे गटनेते अजय चौधरी यांनी बैठकीनंतर सांगितले. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आमदारांना मार्गदर्शन केले. कायदेशीर लढाई आपण लढत आहोत. आपली बाजू भक्कम आहे. त्यामुळे काळजी करू नका. काहीही झाले तरी आपण ही लढाई जिंकू. तुम्ही त्याकडे फारसे लक्ष देऊ नका. येत्या अधिवेशनात तुम्ही मतदारसंघातील प्रश्न आक्रमकपणे मांडा. सरकारवर तुटून पडा, असा आदेश त्यांनी आम्हाला दिल्याची माहिती चौधरी यांनी दिली.