₹ 2000 Note : 30 सप्टेंबर 2023पर्यंतच 2000 रुपयांची नोट राहणार वैध! – आरबीआय

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांच्या नोटा (₹ 2000 Note) चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. ही प्रक्रिया मंगळवारपासून सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास (Reserve Bank of India Governor Shaktikanta Das) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विविध बँकांमधून या नोटा बदलून घेण्यासाठी मुदत 30 सप्टेंबर 2023पर्यंतची दिली असून ही नोट वैधच राहणार असल्याचे शक्तीकांत दास यांनी स्पष्ट केले आहे.

आरबीआयचा 2000 रुपयांच्या नोटा चलनात आणण्याचा उद्देश पूर्ण झाला आहे. आता 2000 रुपयांच्या नोटा बदलून जमा केल्या जातील आणि या सर्व प्रक्रियेत सर्वसामान्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. यासंदर्भात बँकांना पूर्णपणे तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही आरबीआयचे गव्हर्नर म्हणाले.

नोटाबंदीनंतर बाजारातून परत घेतलेल्या नोटांसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून 2000 रुपयांच्या नोटा चलनात आणल्या होत्या. आता बाजारात विविध मूल्यांच्या नोटांची कमतरता नसल्याने आता या दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तथापि, 2000 रुपयांच्या 30 सप्टेंबर 2023पर्यंत बँकांमध्ये सहजपणे जमा करून बदलता येतील, असे आणि तोपर्यंत त्या नोटा वैधच (Will continue as Legal Tender) असतील. या कालावधीत दुकानदार असो वा पेट्रोलपंप चालक कोणीही ही नोट स्वीकारण्यास नकार देऊ शकत नाही, असे शक्तीकांत दास यांनी स्पष्ट केले.

दोन हजार रुपयांची नोट बदलण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून या कालावधीत जनतेला शांतपणे नोट बदलता येईल. नोटा बदलून घेण्यासाठी भरपूर वेळ आहे, असे सांगून ते म्हणाले, 2000 रुपयाची नोट आणण्यामागे अनेक कारणे होती आणि धोरणांतर्गत हे पाऊल उचलण्यात आले. बँकांना 2000च्या नोटांचा तपशील ठेवावा लागेल. यासाठी बँकांमध्ये पूर्ण तयारी करण्यात आली आहे. बाजारात इतर नोटांचा तुटवडा नसल्याने लोकांनी बँकेत येण्याची घाई करू नये, असे आवाहन रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी केले.