मुंबई : प्रत्येक महिन्याला आर्थिक बाबींमध्ये काही ना काही तरी बदल होत असतात. परंतु, सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या बदलांकडे सामान्य माणसांचे जास्त लक्ष असते. कारण या महिन्यात होणाऱ्या बदलांचा परिणाम स्वयंपाकघरापासून ते शेअर बाजारापर्यंत होत असतो. तसेच आर्थिक बाबींशी निगडीत असणाऱ्या काही कामांमध्ये बदल करण्यासाठी देखील सप्टेंबर महिना हा अखेरचा आहे. त्यामुळे जाणून घेऊयात की उद्यापासून म्हणजेच 1 सप्टेंबरपासून नेमक्या कोणत्या गोष्टीत नेमके काय बदल होणार आहेत. (Financial Significance of September; Many things will change in the country from tomorrow)
हेही वाचा – बॉलीवूडसाठी ऑगस्ट महिना ठरला ऐतिहासिक; केली ‘इतक्या’ कोटींची कमाई
साधारणतः 3 महिन्यांपूर्वी 2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय केंद्राकडून घेण्यात आला. ज्यामुळे ज्या नागरिकांकडे 2 हजारांच्या नोटा आहेत, अशांना सप्टेंबर महिन्यापर्यंत त्या नोटा बदलण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे आता 30 सप्टेंबरपर्यंत नागरिकांना त्यांच्याकडील नोटा या बँकांमध्ये जाऊन बदलणे बंधनकारक असणार आहे.
देशातील तेल आणि गॅस वितरण कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅसच्या किमतींमध्ये बदल करतात. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत मोठा दिलासा देत केंद्र सरकारने दोन दिवस अगोदर 14.2 किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या दरात 200 रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे. तसेच, एलपीजीच्या किंमतीसोबतच, तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एअर फ्युएलच्या (एटीएफ) किंमतीत बदल करत असता. त्यामुळे यावेळी सुद्धा सप्टेंबरच्या पहिल्या दिवशीच बदल होण्याची शक्यता आहे. याशिवाय उद्यापासून देशात सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतीतही बदल केला जाऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे.
1 सप्टेंबर 2023 पासून अॅक्सिस बँकेचे मॅग्नस क्रेडिट कार्डच्या अटी व शर्तींमध्ये मोठे बदल होऊ शकतात. बँकेच्या वेबसाइटवर शेअर केलेल्या माहितीनुसार, पुढील महिन्यापासून ग्राहक काही व्यवहारांवर विशेष सवलतीचा लाभ घेऊ शकणार नाहीत. त्यामुळे मोठ्या संख्येने वापरण्यात येणाऱ्या या कार्डमध्ये काही महत्त्वाचे बदल झाले तर नागरिकांकडून याबाबत नेमका कोणता निर्णय घेण्यात येतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्याचप्रमाणे सेबीने सांगितल्यानुसार, पब्लिक इश्यू बंद झाल्यानंतर सिक्युरिटीज (शेअर्स) लिस्ट करण्यासाठी लागणारा वेळ 6 कामकाजाच्या दिवसांवरून तीन कामकाजाच्या दिवसांवर (T+3 दिवस) कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सव, दहीकाला त्याचप्रमाणे इतर काही महत्त्वाचे सण असल्याने या महिन्यात तब्बल 16 दिवस बँकांना सुट्टी असेल. RBI कडून सुट्टींची यादी जाहीर करण्यात आली असून वेगवेगळ्या राज्यांमध्ये ज्या प्रमाणे सण आले आहेत, त्याप्रमाणे सुट्ट्यांचे नियोजन करण्यात आले आहे. आरबीआयने जाहीर केलेल्या 16 दिवसांच्या सुट्टीच्या यादीमध्ये दुसऱ्या आणि चौथ्या आठवड्यातील शनिवार आणि रविवारच्या सुट्टीचा देखील समावेश आहे.