मारुती सुझुकीने केली १ हजार कर्मचार्‍यांची कपात

गेल्याच आठवड्यात भारतीय अर्थव्यवस्था घसरल्याचे वृत्त आल्यानंतर ऑटोमोबाईल क्षेत्रातील आर्थिक मंदीही उघड व्हायला सुरुवात झाली आहे. वाहन क्षेत्रात आलेल्या मंदीमुळे गेल्या आठवड्यात टाटा मोटर्सने उत्पादन थांबविल्याने खळबळ माजलेली असताना आता भारताची सर्वात मोठी कंपनी मारुतीनेही 1000 कर्मचार्‍यांची कपात केली आहे. यामुळे या मंदीचा विळखा वाढू लागल्याचे संकेत मिळत आहेत.

मारुती सुझुकीने कंत्राटी कर्मचार्‍यांना कामावरून कमी केले आहे. तसेच नवीन भरतीवरही बंदी आणली आहे. तसेच मंदीपासून वाचण्यासाठी कंपनी विविध उपाययोजना करत आहे. गेल्या काही महिन्यांपासून मारुतीसह अन्य वाहन कंपन्यांच्या विक्रीने ऐतिहासिक घसरण नोंदविली आहे. जेव्हा मंदी येते तेव्हा कंत्राटी कामगार यांना पहिला फटका बसतो. मात्र, कंपनीने या प्रकरणावर कोणतेही भाष्य केलेले नाही. केवळ मारुतीलाच नाही तर अन्य ऑटो कंपन्यांनाही उत्पादन कमी करावे लागले आहे. यामुळे अतिरिक्त कर्मचार्‍यांना कमी केले जात आहे.

दर महिन्याला विक्रीमध्ये वाढ पाहणार्‍या मारुतीला यंदा वर्षाच्या सुरुवातीपासूनच उतरता आलेख पहायला मिळाला आहे. जुलै महिन्यात मारुतीने गेल्या वर्षीच्या तुलनेत 35.1 टक्के घट नोंदविली आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये कंपनीने 154,150 कार विकल्या होत्या. तर यंदा कंपनीने 100,006 कार विकल्या आहेत. एप्रिल ते जुलै दरम्यान कंपनीच्या 474,487 कार विकल्या गेल्या आहेत. याच कालावधीत मारुतीने गेल्या वर्षी 617,990 एवढ्या कार विकल्या होत्या.