गृहनिर्माण स्वयंपुनर्विकास समितीवर प्रवीण दरेकर यांची नियुक्ती

Praveen Darekar

भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रविण दरेकर यांची गृहनिर्माण स्वयंपुनर्विकास समितीवर तज्ज्ञ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने ही समिती स्थापन केली आहे. प्रविण दरेकर हे मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष असून त्यांनी गृहनिर्माण सहकारी संस्थांनी बिल्डरकडे न जाता स्वयंपुनर्विकास करावा या करीता व्यापक अभियान उभे केले. त्या अनुषंगाने जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्ज धोरण ही तयार केले त्या धोरणानुसार मुंबईत ४ ते ५ गृहनिर्माण संस्थांनी इमारती ही उभ्या करुन सभासदांना मोठ्या सदनिका उपलब्ध झाल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्वयंपुनर्विकासास चालना मिळण्यासाठी अनेक सवलतीकरीता गृहनिर्माण संस्थांच्यावतीने आग्रही मागणी प्रविण दरेकर यांनी केली होती. यानुसार मुख्यमंत्र्यांनी गृहनिर्माण संस्थेतील सर्वसामान्य सभासदांसाठी कॅबिनेटच्या निर्णयाव्दारे अनेक सवलती देवून या योजनेला प्रोत्साहन दिले. तसेच दिलेल्या सवलतीलची अंमलबजावणी करण्यासाठी आणि नियमावली बनविण्यासाठी एक समिती गठीत केली. ही समिती गृहनिर्माण विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली असून अप्पर मुख्य सचिव, महसुल, नगरविकास, सहकार हे सनदी अधिकारी सदस्य आहेत. सहकार, गृहनिर्माण व बँकीग याचा अनुभव असणारे विधान परिषदेचे सदस्य प्रविण दरेकर यांची या समितीवर तज्ज्ञ म्हणून नियुक्ती केली आहे.