आता बँकाही करताहेत नोकरकपात

Bank

आर्थिक मंदीमुळे जगभरात सगळ्याच क्षेत्रांतल्या नोकर्‍यांवर संकट आलं आहे. बँकिंग क्षेत्रातही अशीच स्थिती आहे. डॉइश बँकेच्या पाठोपाठ आता HSBC नेही नोकरकपात करण्याचं जाहीर केलं आहे. डॉइश बँकेने जगभरातल्या शाखांमध्ये सुमारे 18 हजार कर्मचार्‍यांना नोकरीतून काढून टाकलं आहे. आता ब्रिटिश मल्टीनॅशनल कंपनी HSBC सुद्धा कंपनीच्या खर्चात कपात करणार आहे.

HSBC ने भारतात तांत्रिक विभागात काम करणार्‍या 150 कर्मचार्‍यांना नोकरीतून काढून टाकलं आहे. यामध्ये पुणे आणि हैदराबादमधल्या कर्मचार्‍यांचा समावेश आहे. HSBC मध्ये 2 लाख 38 हजार कर्मचारी आहेत. यामध्ये आता काही कर्मचार्‍यांच्या नोकरीवर गदा येणार आहे. भारतात पुणे आणि हैदराबादमध्ये तांत्रिक विभागात 14 हजार कर्मचारी आहेत.
कंपनीच्या प्रवक्त्याच्या म्हणण्यानुसार, HSBC आपल्या ग्राहकांना चांगल्यातली चांगली सर्व्हिस देण्यासाठी कंपनी कर्मचार्‍यांच्या कामगिरीचं मूल्यांकन करत असते. कंपनीचे CEO जॉन फ्लिंट यांनी दीड वर्षं काम करून राजीनामा दिला. आता त्यांची जागा नोअल क्विन यांनी घेतली आहे. आर्थिक मंदीमुळे Cisco आणि Cognizant या कंपन्याही कर्मचार्‍यांची कपात करत आहेत. याआधी पार्ले प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनेही बिस्किटांची विक्री घटल्यामुळे 10 हजार कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकलं आहे.

आर्थिक मंदी आणि बेरोजगारीच्या संकटाला तोंड देण्याचं आव्हान पूर्ण जगासमोर आहे. त्यातच भारतात मोठ्या प्रमाणावर नोकरकपात होत असल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे.