स्वस्तात सोने खरेदीची सुवर्णसंधी, गोल्ड बाँड योजना २० जूनपासून सुरू

आरबीआयने सांगितले की, गोल्ड बॉण्ड्ससाठी ऑनलाइन किंवा डिजिटल पद्धतीने अर्ज करणाऱ्या आणि पेमेंट करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 50 रुपयांनी कमी असेल. अशा गुंतवणूकदारांसाठी गोल्ड बाँडची इश्यू किंमत 5,041 रुपये प्रति ग्रॅम आहे.

तुम्हीही स्वस्त सोने (gold) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. केंद्र सरकार तुम्हाला पुन्हा एकदा स्वस्त सोने खरेदी करण्याची संधी देत ​​आहे. तुम्ही देखील सरकारच्या 2022-23 च्या सार्वभौम गोल्ड बाँड योजनेच्या (Sovereign Gold Bond Scheme 2022-23) पहिल्या मालिकेअंतर्गत सोने खरेदी करू शकता.

योजना पाच दिवसांसाठी सुरू 

सोने (gold) खरेदीची ही योजना 20 जूनपासून पाच दिवसांसाठी सुरू राहणार आहे. यासाठी सोन्याची किंमत 5,091 रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने ही माहिती दिली. सरकारी गोल्ड बाँड योजना 2022-23 (Sovereign Gold Bond Scheme 2022-23) ची पहिली मालिका 20 ते 24 जून 2022 दरम्यान खरेदीसाठी उघडली जाईल.

ऑनलाइन पेमेंटवर 50 रुपये प्रति ग्राम लाभ

आरबीआयने सांगितले की, गोल्ड बॉण्ड्ससाठी ऑनलाइन किंवा डिजिटल पद्धतीने अर्ज करणाऱ्या आणि पेमेंट करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 50 रुपयांनी कमी असेल. अशा गुंतवणूकदारांसाठी गोल्ड बाँडची इश्यू किंमत 5,041 रुपये प्रति ग्रॅम आहे. स्वर्ण बाँड योजना 2022-23 ची दुसरी मालिका 22 ते 26 ऑगस्ट दरम्यान  उपलब्ध असेल.

कोणाला गुंतवणूक करता येणार?

सार्वभौम गोल्ड बाँड आठ वर्षांसाठी दिले जातात. पाचव्या वर्षानंतर या बाँड योजनेतून बाहेर पडण्याचा पर्याय मिळेल. भारतीय नागरिक, ट्रस्ट, विद्यापीठे आणि सेवाभावी संस्था या बाँड खरेदी करू शकतात. आरबीआयच्या भारत सरकारच्या वतीने बाँड जारी करते. मागील आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये एकूण 12,991 कोटी रुपयांचे गोल्ड बाँड 10 हप्त्यांमध्ये जारी करण्यात आले होते.

किती बाँड खरेदी करता येणार?

या योजनेंतर्गत एखादी व्यक्ती किमान एक ग्रॅम सोन्याचे बाँड खरेदी करू शकतो.  आर्थिक वर्षात जास्तीत जास्त चार किलोग्रॅमपर्यंत सोन्याचे बाँड खरेदी करता येतात. सोन्याची भौतिक मागणी कमी करण्याच्या उद्देशाने गोल्ड बॉण्ड योजना नोव्हेंबर 2015 मध्ये प्रथम सुरू करण्यात आली होती.