Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर अर्थजगत दिवाळीच्या तेजात शेअरबाजारात तेजी, निर्देशांकात 524.51 तर, निफ्टीत 154.50ची उसळी

दिवाळीच्या तेजात शेअरबाजारात तेजी, निर्देशांकात 524.51 तर, निफ्टीत 154.50ची उसळी

Subscribe

मुंबई : कोरोना महामारीचे सावट सलग दोन वर्षे सणावारांवर होते. पण आता त्याचा धोका कमी झाल्याने सर्वत्र उत्साह दिसत आहे. सध्याच्या दिवाळीच्या तेजात मुंबई तसेच राष्ट्रीय शेअरबाजारातही तेजी पाहायला मिळाली. आज, सोमवारी झालेल्या मुहूर्ताच्या सौद्यांमुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 524.51 अंकांनी तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 154.50 अंकांनी उसळला.

- Advertisement -

सर्वत्र दिवाळीची धूम पाहायला मिळत आहे. ब्रिटनमध्ये भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे पंतप्रधानपदावर विराजमान होणार असल्याने भारतीयांच्या दिवाळीचा उत्साह द्विगुणित झाला आहे. त्यातच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेअर बाजारातही मुहूर्ताच्या सौद्यांच्यावेळी तेजी पाहायला मिळाली. बीएसई आणि एनएसई या दोन्ही शेअर बाजारांमध्ये संध्याकाळी 6.15 ते 7.15 या काळात मुहूर्ताचे सौदे झाले. हे सौदे शुभ मानले जातात. त्यामुळे गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी वधारले.

संवत 2079च्या पहिल्या दिवशी हे मुहूर्ताचे सौदे केले जातात. सिनेअभिनेते अजय देवगण याने मुंबई शेअर बाजारात तर, राष्ट्रीय शेअर बाजारात प्रसिद्ध क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याने मुहूर्ताच्या सौद्याची बेल दिल्यानंतर व्यवहारांना सुरुवात झाली. गुंतवणूकदारांनी केलेल्या जोरदार खरेदीच्या जोरावर 2602 कंपन्यांच्या शेअर्सचे भाव वधारले. तर, 727 शेअर्सच्या भावात घसरण झाली. याशिवाय, 153 कंपन्यांच्या शेअर्सचे भाव ‘जैसे थे’च राहिले. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोघांमध्येही 0.88 टक्का वाढ नोंदवली गेली. 524.51 अंकांच्या वाढीसह सेन्सेक्स 59,831.66 अंकांवर तर, 154.50 वाढीसह निफ्टी 17730.80 अंकांवर बंद झाला.

- Advertisement -

मुंबई शेअर बाजारात नेस्टले इंडिया, आयसीआयसीआय बँक, एलएनटी, एसबीआय, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, आणि डॉ. रेड्डीज् या कंपन्यांच्या शेअर्सना मागणी होती. हिंदुस्थान युनिलिव्हर आणि कोटक महिंद्रा बँक यांना फटका बसला. राष्ट्रीय शेअर बाजारात टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बँक, एशियन पेंट्स, अॅक्सिस बँक आणि टाटा स्टील यांचे शेअर वधारले. तर, हिंदुस्थान युनिलिव्हर, कोटक महिंद्रा बँक, एडीएफसी लाइफ आणि अदानी एंटरप्रायझेस यांच्या शेअर्सना फटका बसला.

गेल्यावर्षी निर्देशांक गेला होता 60 हजार पार
गेल्या वर्षी 4 नोव्हेंबर रोजी दिवाळीला मुहूर्ताचे सौदे झाले. त्या एका तासात मुंबई शेअर निर्देशांक 60 हजारांच्या वर पोहोचला होता. मुहूर्ताच्या सौद्यात निर्देशांक 60 हजार 67 तर, राष्ट्रीय शेअर निर्देशांक 17 हजार 921 अंकांवर बंद झाला होता. निर्देशांकाचा विचार केला तर, गेल्या शुक्रवारी बाजार बंद झाला तेव्हा तो 104.25 अंकांनी वधारून 59,307.15 अंकांवर गेला होता.

- Advertisment -