घरअर्थजगतम्युच्युअल फंडाचे प्रकार

म्युच्युअल फंडाचे प्रकार

Subscribe

नेमके पैसे कधी गुंतवावे? त्याला काही वेळेचे मुदतीचे बंधन असते का? की आपण आपल्या सोयीने सुरु करू शकतो? असे काही प्रश्न - शंका यांची उत्तरे या लेखात पाहणार आहोत.

म्युच्युअल फंडात कोणी गुंतवणूक करावी याची माहिती आपण मागील भागात पाहिली. पण नेमके पैसे कधी गुंतवावे? त्याला काही वेळेचे मुदतीचे बंधन असते का? की आपण आपल्या सोयीने सुरु करू शकतो? असे काही प्रश्न – शंका यांची उत्तरे या लेखात पाहणार आहोत. नेमके कोणामार्फत गुंतवू शकतो? की थेट म्युचअल फंड कंपनीशी व्यवहार करता येतो? अशा काही मूलभूत पैलूंचा हा आढावा…

पैसे गुंतवण्याचा नेमका कोणता काळ सोयीचा? वेळेची मर्यादा असते का?
उत्तर :- आपण जर म्यु.फंड कंपन्यांच्या जाहिराती किंवा माहितीपत्रक पाहिले तर आपल्याला नेमकी योजना कशी आहे हे कळू शकते. मुख्य दोन प्रकार आहेत – खुली योजना आणि बंद योजना अशा स्कीम्सची मूलभूत माहिती आपण आता पाहणार आहोत

- Advertisement -

म्यु.फंड युनिट्स कसे व कोठून घेता येतात?

१) म्यु.फंड कंपनीत जावून किंवा त्यांच्या वेबसाइटमार्फत करता येते
२) म्यु.फंड कंपनीचे एजंट असतात, त्यांच्यामार्फत खरेदी करता येते.
३) शेअर्सची खरेदी-विक्री करणार्‍या ब्रोकरकडूनही घेता येतात.

त्याआधी म्यु.फंडातील काही मूलभूत संज्ञा-संकल्पना आपण पाहणार आहोत-

युनिट – म्युच्युअल फंड हे युनिट स्वरुपात खरेदी-विक्री केले जातात (जसे शेअर्स हे एका शेअरप्रमाणे लक्षात घेतले जातात) उदाहरणार्थ – म्यु.फंडाच्या एका युनिटची किंमत, शेअरची अमुक दिवशी असलेली किंमत.
मुदत – म्यु.फंडाच्या योजना विविध मुदतीच्या असतात. अगदी अल्प कालावधीपासून ते दीर्घकालीन गुंतवणूक पर्याय आपल्याला उपलब्ध असतात.
उदाहरणार्थ – कमी कालखंड/मध्यम मुदत आणि दीर्घ मुदतीसाठी म्यु.फंड योजना असतात
म्यु.फंडाच्या विविध योजना आणि उत्पन्न मिळण्याचे मुख्य प्रकार –

- Advertisement -

कोणतीही गुंतवणूक ही अधिक उत्पन्न मिळावे, आपले मूळ भांडवल वाढावे – त्याची वृद्धी व्हावी याच मुख्य हेतूने केली जाते. त्यापाठोपाठ जोखीम, भविष्यकालीन तरतूद, ऐनवेळेची गरज, वाढत्या महागाईला तोंड देता येणे असे अनेक हेतू असतात. त्यासाठी बँक,म्यु.फंड,पोस्ट अशा अनेक योजना आपल्यासमोर असतात.

म्यु.फंडात पैसे गुंतवल्यास नेमके काय काय मिळते, मिळू शकते? हे पाहूया

लाभांश (Dividend) : नियमित उत्पन्नासाठी – शेअर्सप्रमाणे युनिटमागे लाभांश जाहीर केला जातो आणि उलाढालीचा खर्च वजा करून उरलेला ९० टक्के भाग हा त्या योजनेतील गुंतवणूकदारांना ‘लाभांश’ म्हणून दिला जातो. अर्थात, त्यासाठी आपण आधीच ठरवायला पाहिजे, की आपल्याला लाभांश देणार्‍या योजनेतच पैसे ठेवायचे आहेत.
लाभांशाची रक्कम ही आपल्याला आपल्या बँक खात्यात किंवा आपण जाहीर केलेल्या डिम्याट खात्यात जमा होऊ शकते.

आपल्याला गुंतवणुकीतून नियमित उत्पन्न हवे आहे असे निश्चित केले की लाभांश योजनेत पैसे ठेवता येतील. गुंतवणूकीतून वृद्धी (Growth) योजना – म्यु.फंडात उत्पन्नाचा आणखी एक पर्याय मिळतो, ते म्हणजे उत्पन्न हे पुन्हा त्याच योजनेत गुंतवले जाते. त्याद्वारे आपल्या मूळ गुंतवणुकीची वाढ होते. नित्य लाभांश आपल्या हाती न घेता, त्याचा विनियोग पुनर्गुंतवणुकीसाठी वापरला जातो. आणि आपल्याला आपली गुंतवणूक केलेली रक्कम आणि कमावलेले उत्पन्न एकत्रितपणे, एकदाच मुदत संपल्यावर मिळते.

लाभांश पुनर्गुंतवणूक (Dividend Reinvestment) योजना – आपल्याला लाभांश हातात घ्यायचा नसतो, मात्र तो पुन्हा त्याच योजनेत गुंतवून अधिक लाभ घ्यावा असे वाटत असते, तर असा पर्यायदेखील आपल्याला मिळू शकतो. आपली निकड आणि निकटची गरज ह्याचा विचार करून म्यु.फंडात पैसे गुंतवताना आपण उपयुक्त अशा योजनेत गुंतवून फायदा घेवू शकतो.

अजून दोन वेगळे प्रकार आहेत –

१) पद्धतशीर गुंतवणूक योजना -SIP-Systematic Investment Plan
२) पद्धतशीर परतावा योजना-SWP-Systematic Withdrawal Plan

मात्र या दोन पद्धतींची माहिती आपण अधिक तपशीलात पुढे पाहणार आहोत. कारण सध्या आपल्याला म्यु.फंडात पैसे गुंतवायचे असतील तर किमान काय माहिती हवी? ती आधी घेत आहोत.
एन.ए.व्ही. (Net Asset Value) निव्वळ मालमत्ता मुल्य – म्यु.फंडाची किंमत ही त्याच्या निव्वळ मालमत्ता मूल्यानुसार केली जाते, हे एका युनिटमागे मोजले जाते. एखाद्या योजनेतील एकूण मालमत्तेचे मूल्य काढून ते जाहीर केले जाते – एका युनिटमागे. रोज संध्याकाळी खरेदी-विक्रीचे व्यवहार पूर्ण झाल्यावर मालमत्तेचे मुल्यांकन केले जाते आणि ते म्हणजेच युनिटमागे असलेली किंमत. त्यानुसार एखाद्या एनएव्हीला एखाद्या म्यु.फंडाच्या एका युनिटचे खरेदी-विक्रीचे व्यवहार होऊ शकतात.

उदाहरणार्थ – अमुक तमुक म्यु.फंड – आजची किंमत = प्रत्येक युनिट प्रमाणे रु १६=५० याचा अर्थ अशा म्यु.फंडाची मूळ किंमत -दर्शनी मूल्य हे युनिट मागे रु.१०/- असते.

खुली योजना (Open Ended Scheme) कोणताही म्युच्युअल फंड एखादी नवीन योजना जाहीर करतो, तेव्हा स्कीमची सुरुवात करताना एन.एफ.ओ. म्हणजे नवीन फंडची ऑफर दिली जाते आणि गुंतवणूकदारांना आकर्षित केले जाते. तशी नित्य जाहिरात संपूर्ण माहिती देण्यासाठी केली जाते. आपल्याकडे अनेक म्यु.फंड अशाप्रकारची योजना आपल्या ग्राहकांसाठी आणतात.

ठळक वैशिष्ट्ये:-

जेव्हा अशी योजना जाहीर होते, तेव्हा एका युनिटचे दर्शनी मूल्य फक्त रु. १०/-इतके असते.
प्रारंभीच गुंतवणूक करणारा दर्शनी किमतीने म्हणजे प्रत्येक युनिटला रु. १०/- अशी किंमत देऊन विकत घेवू शकतो
त्यानंतर मात्र शेअर बाजारात दररोज जो एन.ए.व्ही. घोषित केला जातो, त्यावर आधारित किमतीला युनिटच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करता येतात. यात गुंतवणूकदाराला केव्हाही पैसे गुंतवून युनिट्स खरेदी करता येतात किंवा आपल्याकडील युनिटसची विक्री करता येते. कारण या योजनेला कालावधीचे बंधन नाही, नित्य-खुली असे तिचे स्वरूप आहे. या योजनेत सामील होणे आणि बाहेर पडणे सोयीचे असते.

पुढील भागात आपण ओपन एंडेडसह क्लोज्ड एंडेड म्यु.फंडाची तपशीलवार माहिती घेणार आहोत. शिवाय त्याची ओपन एंडेडशी तुलना करून पाहणार आहोत.म्हणजे आपल्याला म्यु.फंडाच्या दोन्ही योजनांतील बारकावे कळू शकतील.आणि आपल्याला आपल्या गरजेनुरूप आणि गुंतवणूक अपेक्षेनुसार डोळसपणे म्यु.फंडात आपले पैसे गुंतवता येतील.

 


– राजीव जोशी
(लेखक बँकिंग व अर्थ अभ्यासक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -