घरCORONA UPDATECorona Update : ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मात करणार 'ऑक्सिजन बॅंक'; महाराष्ट्र दिनी योजनेचा...

Corona Update : ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मात करणार ‘ऑक्सिजन बॅंक’; महाराष्ट्र दिनी योजनेचा शुभारंभ

Subscribe

या ऑक्सिजन बँकेत सुरुवातीला पाच लिटर क्षमतेचे १२० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ठेवण्यात येणार आहेत.

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांत चढ-उतार पाहायला मिळत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आला असून कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात बेड मिळेपर्यंत मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. या रुग्णांना तातडीने घरच्याघरी ऑक्सिजन मिळावा, यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑक्सिजन बॅंक योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी (आज) महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून या नवीन योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या ऑक्सिजन बँकेत सुरुवातीला पाच लिटर क्षमतेचे १२० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ठेवण्यात येणार असून कालांतराने १० लिटर क्षमतेचे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ठेवण्यात येतील, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

एमएमआर परिसरात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा आहे. अनेकदा ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळेपर्यंत त्यांची तब्येत खालावते. अशा गरजू रुग्णांना दिलासा देण्यासाठी ऑक्सिजन बॅंकेच्या माध्यमातून दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या ऑक्सिजन बँकेत सुरुवातीला पाच लिटर क्षमतेचे १२० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ठेवण्यात येणार असल्याचे एकनाथ शिंदेंनी सांगितले.

- Advertisement -

या ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर मशीन्सद्वारे हवेतील ऑक्सिजन शोषून घेऊन त्यातील नायट्रोजन वेगळा करुन रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येतो. डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन व शिवसेना वैद्यकीय कक्ष यांच्या माध्यमातून ही सेवा ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर येथील गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. गरजू कोविड रुग्णांच्या नातेवाईकांनी या ऑक्सिजन बँकेचा लाभ घेण्यासाठी शिवसेना वैद्यकीय कक्ष कार्यालय, मंगला हायस्कूल शेजारी, कोपरी ठाणे पूर्व येथे संपर्क साधावा, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले.

कोरोनाचा कहर वाढत असताना अनेक रुग्णांना ऑक्सिजनअभावी जीव गमवावा लागतो. अशात डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांनी सुरू केलेला हा उपक्रम निश्चितच पथदर्शी ठरेल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. या प्रसंगी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, खासदार राजन विचारे, आमदार रविंद्र फाटक, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे आणि त्यांची संपूर्ण टीम उपस्थित होती.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -