Video: कपाळाला बंदूक लावून काढत होता सेल्फी; ट्रिगर दाबला आणि खेळ खल्लास

youth accidentally shoots himself
स्वतःवर गोळी झाडून घेतलेला सौरभ मावी

उत्तर प्रदेश राज्यातील ग्रेटर नोएडा येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका २२ वर्षीय युवकाने कनपट्टीवर बंदूक ठेवून सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. मात्र चुकून ट्रिगर दाबला गेल्यामुळे त्याला आपला जीव गमवावा लागला आहे. गोळी सुटल्यानंतर युवकाला त्याच्या मित्रांनी लगेचच रुग्णालयात हलविले. मात्र डॉक्टरांनी त्याला तेथेच मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या मृत युवकाच्या मित्राला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार धर्मपुरा गावातील सौरभ मावी नावाचा तरुण आपला मित्र नकुलसोबत ग्रेटर नोएडा येथे फिरण्यासाठी गेला होता. नकुलने सांगतिल्याप्रमाणे ते आपल्या मित्राकडे जात होते. दरम्यान गाडीतून जात असताना सौरभने आपल्या कपाळावर पिस्तुल ठेवून सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्याचवेळी पिस्तुलात गोळी असून ती चालू शकते, याचा अंदाज त्याला नव्हता आणि जे व्हायचे नाही तेच झाले. गोळी सुटली आणि सौरभ रक्ताच्या थारोळ्यात पडला. नकुलने लगेचच गाडी रुग्णालयाच्या दिशेने पळवली. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

पोलिसांनी नकुल शर्मा नावाच्या सौरभच्या मित्राला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे. सोबतच सौरभ ज्या पिस्तुलाला धरुन सेल्फी घेत होता, ती पिस्तुल नक्की कुणाची? आणि त्याचा अधिकृत परवाना आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.

पोलिसांच्या तपासानंतर या प्रकरणातील सत्य समोर येईलच. मात्र सध्या सेल्फीचे कारण समोर येत असल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तरुणाईमध्ये सेल्फी काढण्याचे जे क्रेझ पसरले आहे. त्यामुळे तरुणांचा जीव धोक्यात येत आहे. अनेकजण दरीच्या कड्यावर किंवा इतर धोकादायक परिस्थितीमध्ये सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतात. सेल्फीमुळे जीव गमावल्याच्या अनेक बातम्या अधूनमधून येत असतात. तरिही तरुणांमध्ये जागृती येत नसल्याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.