मुंबई : तीन वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करणार्या एका महिलेस वरळी पोलिसांनी अटक केली. दिपाली बबलू दास असे या महिलेचे नाव असून ती वरळी परिसरात राहते. तिच्या तावडीतून तीन वर्षांच्या मुलीची पोलिसांनी सुखरूप सुटका केली आहे. 32 वर्षांची तक्रारदार महिला ही वरळीतील प्रेमनगर परिसरात राहत असून तिला तीन वर्षांची मुलगी आहे. (a woman who kidnapped a three-year-old girl was arrested exposed in three hours)
ही मुलगी बुधवारी साडेबारा वाजता घरासमोर खेळत होती. यावेळी तिथे एक महिला आली आणि तिने तिला चॉकलेट आमिष दाखवून तिच्यासोबत घेऊन गेली होती. हा प्रकार एका मुलाच्या लक्षात आला. त्यानंतर त्याने मुलीच्या आईला हा प्रकार सांगितला. यावर तिने तातडीने मुलीचा शोध घेतला, मात्र तिची मुलगी कुठेच सापडली नाही. त्यामुळे तिने घडलेला प्रकार वरळी पोलिसांना सांगून अज्ञात महिलेविरुद्ध तक्रार केली. याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी संबंधित महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली.
हेही वाचा – Fraud : 18 कोटींच्या फसवणुकीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा, प्रोजेक्टऐवजी वैयक्तिक फायद्यासाठी पैशांचा वापर
सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी अवघ्या तीन तासांत दिपाली दास या महिलेस चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत तिनेच या मुलीचे अपहरण केल्याचे सांगून तिचा ताबा पोलिसांकडे सोपविला. तपासात दिपाली ही मूळची कोकलता येथील मेदीनीपूर, दासपूरची रहिवाशी असून सध्या वरळीतील प्रेमनगर परिसरात असून पेशंट सांभाळण्याचे काम करते.
तिनेच या मुलीचे अपहरण करुन तिच्या घरी आणले होते. अपहरणाच्या गुन्ह्यांत अटक केल्यानंतर तिला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे. तिची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या अपहरणामागे तिचा काय उद्देश होता याचा पोलीस तपास करत आहेत.
हेही वाचा – Bombay HC : दारूच्या बाटल्यांवरही आता कॅन्सरचा इशारा ? उच्च न्यायालयात याचिका
Edited by : Ashwini A. Bhatavdekar